महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. धनंजय सावळकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. नुकताच त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते महानिर्मिती कंपनीच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) या पदावर कार्यरत होते.
प्रशासनाचा गाढा अनुभव असणारे डॉ. सावळकर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात अतिरिक्त जिल्हाधिकारी या मूळ पदाचे अधिकारी आहेत. १९९८ साली विक्रीकर निरीक्षक म्हणून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर २००१ साली त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. सुरुवातीला रायगड येथे परीविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर २००३ ते २००५ या कालावधीत उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) भांडूप, २००५ ते २००७ उपविभागीय अधिकारी अलिबाग, २००७ ते २००९ उपजिल्हाधिकारी (संजय गांधी योजना व करमणूक कर) मुंबई उपनगर, २००९ ते २०१३ उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) चेंबूर, २०१३ ते २०१६ उपविभागीय अधिकारी कल्याण, २०१९ ते २०२२ सहव्यवस्थापकीय संचालक पर्यटन आदी पदांवर त्यांनी सेवा बजावली आहे. २०१६ ते २०१९ या काळात त्यांनी तत्कालीन सामान्य प्रशासन आणि उर्जा विभागाच्या राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणूनही यशस्वीपणे काम पाहिले आहे.
साधारण २७ वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळात डॉ. सावळकर यांनी जुलै २००५मध्ये महापूर परिस्थितीदरम्यान नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कामकाज, केद्रीय लोकसेवा आणि राज्य लोकसेवा, परिक्षांचा समन्वय अधिकारी म्हणून काम, महसूल संबधित न्यायालयीन प्रशासकीय कामकाज, कोठडीतील मृत्यू, अपघात, चकमक ई-न्यायालयीन चौकशीचे कामकाज, संजय गांधी योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना यासारख्या सामाजिक योजनांची अंमलबजावणी कामकाज सेतू सुविधा केंद्र (नागरी सुविधा केंद्र) महा-ई सेवाकेंद्र यांच्यावर पर्यवेक्षणाचे काम, विक्रीकर, जमीन महसूल, करमणूक करबाबत कामकाज, लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक इत्यादीविषयक निवडणुकीचे कामकाज त्यांनी केले आहे. त्यांनी पर्यटन विभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. सावळकर उच्च विद्याविभूषित असून त्यांनी पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंगोपन पदव्युत्तर शिक्षणासोबत कायद्याची पदवी संपादित केली आहे. त्याचबरोबर रियल इस्टेट व्यवस्थापन पदविका शिक्षणदेखील पूर्ण केले आहे.