मुंबईतले गुजराती समाजाचे अध्वर्यू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. हेमराज शाह यांची विश्व गुजराती समाजाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विश्व गुजराती समाजाचे अध्यक्ष सी. के. पटेल यांनी डॉ. शाह यांना विश्व गुजराती समाज उपाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र पाठविले आहे.
विश्व गुजराती समाजाच्या स्थापनेपासून आपण या संस्थेशी जोडले गेले आहात आणि समाजाची स्थापना तसेच संस्थेची प्रगती होण्यात आपले योगदान महत्त्वपूर्ण आहे. विश्व गुजराती समाजाचे वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने संस्थेचा विस्तार, विविध गुजराती संस्था, संघटना यांच्यासमवेत समन्वय ठेवण्याची, इतकेच नव्हे तर गुजरात राज्याबाहेर या संस्थेची प्रगती घडविण्याची जबाबदारी आपण यशस्वी पणे पार पाडाल, असा विश्वास पटेल यांनी या नियुक्तीपत्रात व्यक्त केला आहे.
डॉ. हेमराज शाह गेल्या २५ वर्षांपासून गुजराती समाजासाठी कार्यरत आहेत. १९९६ साली प्रख्यात उद्योगपती मुकेश पटेल यांच्यासमवेत मुंबईमध्ये विश्व गुजराती समाजाच्या दुसऱ्या परिषदेचे त्यांनी यशस्वीपणे आयोजन केले होते. ही परिषद तीन दिवस चालली होती. सुमारे तीस हजार गुजराती बांधवांची उपस्थिती या परिषदेला लाभली होती. सुमारे १५ वर्षे महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यपदाचेही डॉ. शाह यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरणाच्या मुंबई रिपेअर बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

