शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची हत्त्या अजमल कसाबने केली नाही असे म्हणणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानचीच भाषा बोलत असूनही काँग्रेसशी आघाडी केलेले उद्धव ठाकरे यावर अजूनही गप्प आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपण वडेट्टीवार यांच्या आरोपाशी सहमत आहोत का, हे जाहीर करावे असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतल्या एका पत्रकार परिषदेत दिले.
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात ॲड. उज्ज्वल निकम यांनी बजावलेल्या भूमिकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र वडेट्टीवार निकम यांच्यावर बेछूट आरोप करत असताना मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले आहेत, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा नेता खुलेआम पाकिस्तानधार्जिणी वक्तव्ये करत असताना उद्धव ठाकरे मात्र मूग गिळून गप्प आहेत. हेमंत करकरे अजमल कसाबच्या गोळीनेच हुतात्मा झाले हे न्यायालयातही सिद्ध झाले असताना वडेट्टीवार पाकची भाषा बोलत आहेत. पाकिस्तानमधील कुणाच्या संपर्कात वडेट्टीवार आहेत, असा सवालही त्यांनी केला.
मुंबईवरील हल्ल्याबाबत न्यायालयात सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला पाकिस्तानचा कट होता आणि अजमल कसाबच्या गोळीनेच हेमंत करकरे हुतात्मा झाले हे न्यायालयामध्ये सिद्ध होऊन पाकिस्तान तोंडघशी पडले होते याचीही आठवण फडणवीस यांनी करून दिली. शेकडो मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या अजमल कसाबसोबत काँग्रेस असून भाजपा ॲड. उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.