राजस्थानमधील जोधपूर येथे दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत ‘कोकणातील कातळशिल्पे’ या विषयावर शोधनिबंध सादर करण्यासाठी महाराष्ट्राचे निवृत्त माहिती उपसंचालक व कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जोधपूर येथील जय नारायण व्यास विद्यापीठात ही पाचवी ‘आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी परिषद’ होणार आहे.
जय नारायण व्यास विद्यापीठाचा इतिहास विभाग आणि राजस्थानमधील ‘आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी काँग्रेस’ यांनी संयुक्तपणे या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी काँग्रेस’चे अध्यक्ष प्रा. बी. एल. भादोनी आणि विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. भगवान सिंह शेखावत यांनी एका पत्राद्वारे लळीत यांना या परिषदेचे निमंत्रण पाठवले आहे. या परिषदेत देशाच्या विविध भागातील पुरातत्वशास्त्रज्ञ, संशोधक, अभ्यासक आपले संशोधन शोधनिबंधाद्वारे सादर करणार आहेत. जोधपूर येथील जय नारायण व्यास विद्यापीठाची स्थापना १९६२ साली झाली. तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन् यांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे विद्यापीठ राजस्थानमधील एक अग्रगण्य विद्यापीठ आहे.
लळीत गेली २३ वर्षे कातळशिल्प या विषयाचा अभ्यास करीत असून त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यात अनेक कातळशिल्पस्थाने प्रकाशात आणली आहेत. ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हा त्यांचा संशोधनपर ग्रंथ प्रसिद्ध झाला असून त्यांनी याआधीही अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये या विषयावर शोधप्रबंध सादर केले आहेत. मार्च २०२२मध्ये ‘युनेस्को’च्या सांस्कृतिक समितीने सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडोपीसह गोव्यातील उसगाळीमळ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सात कातळशिल्प स्थानांचा समावेश ‘जागतिक वारसास्थळां’च्या प्राथमिक यादीत केला आहे. यामुळे देशातील पुरातत्वक्षेत्रात कोकणातील कातळशिल्पांबाबत कुतूहल वाढले आहे.
जोधपूर येथील या राष्ट्रीय परिषदेत लळीत ‘पेट्रोग्लिफ्स ऑफ कोकण’ म्हणजे ‘कोकणातील कातळशिल्पे’ हा शोधनिबंध आणि रत्नागिरी, सिंधुदूर्ग, गोव्यातील कातळशिल्पांचे सादरीकरण करतील. कर्नाटक आणि केरळमधील कातळशिल्पांचा धावता आढावाही त्यांनी आपल्या शोधनिबंधात घेतला आहे.