पोलीस दल संजूबाबाकडे दिले आहे का? बिष्णोईची चौकशी का नाही? की तो जावई आहे? इंस्टावरील गुन्हेगारी स्वरूपाच्या चाळ्यांना वाचा फोडून अवघे दोन दिवस उलटत नाही तोच इन्स्टावरच थोरथोर अभिनेते व मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील संशयित आरोपी संजय दत्त याची कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याला दिलेल्या धमकीची क्लिप अलगद इंस्टावरच मिळाली. खरंतर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्त्या होऊन आता काही महिने लोटले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. असं असताना सिद्दीकीच्या चाहत्यांकडून वा कुठल्यातरी गुंड टोळीकडून संजय दत्तची ही क्लिप इंस्टावर जाहीर केल्याचा संशय बळावत आहे. वास्तविक संजूबाबाने मित्र म्हणून सिद्दीकी कुटुंबाचे सांत्वन करणे वेगळे आणि कॅमेऱ्यासमोर उभे राहून बिष्णोईला धमकावणे वेगळे. आपण काय बोलतो यांचे भान संजूबाबाला असायला हवे होते.
गुंडटोळ्यांशी संबंध आल्याने बाबाने तुरुंगाची हवा खाल्ली होती. यातून तो सावरला व न्यायालयानेही बॉम्बस्फोटात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे स्पष्ट करून ताकीद देऊन सोडले होते. असा इतिहास जिवंत असताना बाबाला नव्याने xx खायची काय गरज होती? पण नाही. सलमान मेरा दोस्त है, बाबाभी मेरा अजीज दोस्त था, असे कीर्तन करायला त्याला कुणी सांगितले. हेही मित्रासाठी.. असे मान्य करू. पण त्याच्यापुढे जाऊन लॉरेन्सला धमकीवजा ‘डोस’ द्यायची काहीही गरज नव्हती. पण भेजा वापरेल तर तो संजूबाबा कसला? हे सारे पाहता संजूबाबा जाऊ दे. मीच एकदम फ्लॅशबॅकमध्ये गेलो. “ट्रिगर दबाया और खेल खल्लास. मुंबईपर राज करता हूँ राज.. पकडने की बात छोड.. अपूनको कोई हात भी नही लगा सकता.. इतनी वट है माँ.. ” (वास्तव) हा बाबाचाच डॉयलॉग एकदम डोक्यात घुसून बाहेर आला. दत्त कुटुंबियांना इतका त्रास सोसावा लागूनही बाबाचे पाय मात्र पुन्हा पाकमोडिया स्ट्रीटकडे वळले की काय असे वाटू लागले.

विषय निघालाच आहे तर सिद्दीकी हत्त्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले आहे. या आरोपपत्राबाबतही मनात बऱ्याच शंका आहेत. प्रमुख आरोपी बिष्णोईचा भाऊ अमोल असून तो अजून फरारच आहे. आणि आता बराच कालावधी लोटल्यामुळे संशयितही जामीनावर सुटण्याची शक्यता आहे. खरंतर मुंबई पोलिसांनी सिद्दीकी हत्त्येप्रकरणी साबरमती तुरुंगात असलेल्या गुंड लॉरेन्स बिष्णोईची चौकशी कशी केली नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्रीय गृहखात्याची परवानगी घेऊन खरंतर त्याला मुंबईला घेऊन येणे आवश्यक होते. घेऊन येणे सोडा, पण गुजरात येथे जाऊन त्याचा जाब नोंदवण्यात तर काहीच अडचण नव्हती. या प्रश्नाचे उत्तर पोलिसच देऊ शकतात.
“शेवाळलेल्या बंदिस्त डबक्यातून असे लहानमोठे खोमेनी उद्भवणारच..
त्यांच्यात, यांच्यात आणि आमच्यातही
सवाई खोमेनी होणं
थडग्यातून उठलेल्यांच्या निर्दालनासाठी
आपणही थडग्यात जाणं..
हाही एक असीम मूर्खपणाचं.” (कुसुमाग्रज)
या ओळी आठवल्या. तसेच “Crime is the price society pays for abandoning character” हे वचनही आठवते. त्याचप्रमाणे या काव्यओळी वा वचनावर आजचे जग चालत नाही असेही दिसत आहे. वचनामध्ये अडकून राहण्यापेक्षा संजूबाबाला वा त्याच्या सल्लगारांना इतकेही कळायला नको की याचे परिणाम काय होतील? माझी पोलिसांना विनंती आहे की इन्स्टावरील नजर वाढवा. कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करा, नाही तोंडावर पडण्याची पाळी येईल!
छायाचित्रः प्रवीण वराडकर
काळे सर तुम्हाला सलाम