Homeब्लॅक अँड व्हाईटनिवडणुकीत अपयश, तरीही...

निवडणुकीत अपयश, तरीही मराठी मनात मनसेचाच बोलबाला!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विसावा वर्धापनदिन मुंबईतील शिवतीर्थावर सालाबादाप्रमाणेच दिमाखदार साजरा झाला. मनसेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या वीस वर्षाxत विधानसभेत, महापालिकेत किंवा नगर परिषदांमध्ये फारसे यश लाभले नाही. नाशिक महापालिकेतील एकदा मिळालेली सत्ता वगळता नंतर कुठे फारशी चमकदार कामगिरी पक्षाने बजावली नाही. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हा पट्टा वगळता पक्षाने पक्षबांधणी आणि निवडणुका यावर फारसे गांभर्याने बघितले नाही. गेल्या २० वर्षांत पक्षाचे अनेक ताकदवान नेते मनसे सोडून भाजपा किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. मनसेमध्ये राजकीय भविष्य दिसत नसल्यानेच ते राज ठाकरे यांची साथ सोडून गेले. पण वीस वर्षांत राज ठाकरेंच्या सभांना गर्दी कायम राहिली. आज मनसे कुठे सत्तेत नाही आणि विरोधी पक्षातही प्रबळ नाही. पण मराठी मतदारांमध्ये मनसेचा बोलबाला कायम आहे. निवडणुकीच्या राजकारणात यश मिळत नसले तरी राज ठाकरे यांनी आपली जिद्द सोडलेली नाही. राज यांचा करिष्मा कमी झालेला नाही. राज यांच्या बदलत्या भूमिकांमुळे ते नेमके कुणाबरोबरआणि कुणाच्या विरोधात हा संभ्रम कायम असतो. तरीही शिवतीर्थावरील भाषणात त्यांनी भविष्यात आपण सत्ता हातात घेणार म्हणजे घेणार असा निर्धार व्यक्त करून मनसैनिकांना उर्जा देण्याचा प्रयत्न केला.

वीस वर्षांनंतर मनसेच्या वर्धापनदिन मेळाव्याला १९ मार्च रोजी गुढीपाडवा आला हा शुभसंकेत समजतो असे राज यांनी स्वत:च भाषणाची सुरूवात करताना म्हटले. आता पुढील निवडणुका तीन वर्षांनी म्हणजेच २०२९मध्ये आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुका त्याच वर्षी होतील. २०२९च्या निवडणुकीसाठी भाजपाने शतप्रतिशत अशी घोषणा दिली आहे. विधानसभेत भाजपा नंबर १ आहेच. नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, पंचायत समित्यांमध्ये भाजपाने वरचष्मा मिळवला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे बुरूज ढासळले आहेत. मुंबई, ठाण्याची महापालिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून निसटली आहे. २०२९मध्ये होणाऱ्या निवडणुकीत लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के महिला आरक्षण असणार आहे. हे सर्व लक्षात घेऊनच राज ठाकरे यांना मनसेची पक्षबांधणी करावी लागणार आहे.

या वर्षी झालेल्या मुंबई व अन्य काही महापालिका निवडणुकीत मनसेने उबाठा सेनेशी युती केली होती. पण ठाकरे बंधुंचा ब्रँड देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदे यांच्या युतीपुढे चालू शकला नाही. राज ठाकरे यांच्या पक्षाने महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युती करून लढवली. पण, निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबरोबर काही ठिकाणी हातमिळवणी केली. राजकारणात काहीही होऊ शकते त्याचे हे उदाहरण आहे. ठाकरे बंधू आजही एकत्र आहेत का, भविष्यात एकत्र राहणार आहेत का, या प्रश्नांची उत्तरे मनसेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात मिळाली नाहीत. महापालिका निवडणुकीत मसनेचा का पराभव झाला, यासंबंधी राज ठाकरे किंवा अन्य कोणी मेळाव्यात ब्रसुद्धा काढला नाही. पराभवानंतरही राज ठाकरे यांच्या सभांना लाखोंची गर्दी जमते, हे उल्लेखनीय आहे. पण पक्षाचे भविष्य काय हे कुणी सांगू शकत नाही. भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पक्षबांधणीचे काम वेगाने व गांभिर्याने चालू आहे, असेही दिसत नाही.

मनसे

एक पक्ष, एक नेता व सभांना मोठी गर्दी खेचणारे अशी महाराष्ट्रात तीन नावे आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे. हे तीनही नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सहवासातून व संस्कारातून वाढले आहेत. तिघेही आपल्या पक्षाच्या शिवाजीपार्क किंवा आजाद मैदानावर विक्रमी गर्दी जमविणाऱ्या सभा घेतात. या तीनही नेत्यांच्या सभांचे थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवरून होते. या तीनही पक्षांचे वर्धापनदिन नि दसरा मेळावा मुंबईत खुल्या मैदानावर साजरे होतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेत २० आमदार आहेत, एकनाथ शिंदे यांच्याकडे ६० आमदार आहेत तर राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकही आमदार विधानसभेत नाही. राज्यातील व महापालिकेतील सत्ता गमावल्यांतर उबाठा सेनेचे ६५ नगरसेवक मुंबईत निवडून आले, ही कौतुकास्पद बाब असली तरी ठाकरेंना देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेची सत्ता तीस वर्षांनी गमावावी लागली हाच मोठा पराभव आहे.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात इराणवर झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध करायला हवा होता, असे सुरूवातीलाच सांगितले. जो इराण आपल्याला इतके वर्षे साथ देत होता, त्याला आज आपण साथ द्यायला पाहिजे होती., खामेनेईंच्या हत्त्येनंतरही भारताने ब्रसुद्धा काढला नाही, जागतिक पातळीवर काश्मीरच्या मुद्यावर इराण नेहमीच भारताबरोबर राहिला. पण त्या देशावर हल्ला झाल्यावर आपण निषेध व्यक्त केला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अनेक स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधले. दक्षिणेतील सर्व राज्ये आपली भाषा व अस्मिता याविषयी खूप जागरूक असतात. पण आपले लोकप्रतिनिधी कंत्राटदारांकडून टक्केवारी कशी मिळवता  येईल यातच गुंतलेले असतात, असा त्यांनी टोला लगवला. शहरातील मैदाने, बागा, सर्वत्र वाहतुकीची कोंडी, उद्यागपतींकडून जमिनी विकत घेण्याचा सपाटा, वाढत्या गर्दीमुळे व  नियोजनाचा अभाव असल्याने कोसळत असलेली शहरे, शहरातून मुलांचे होणारे अपहरण अशा अनेक मुद्दयांकडे त्यांनी लक्ष वेधले. एका राष्ट्रीय अहवालाचा दाखला देऊन मुंबईतून दरवर्षी साडेपाच हजार मुलांचे अपहरण होते, त्यात लहान मुलींची संख्या मोठी आहे असे सांगताना गुन्हेगारांना कसलाच, कोणाचा धाक उरलेला नाही, याकडेही लक्ष वेधले. तीन-तीन वेळा कर्जमाफी देऊनही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्त्या का होत आहेत, असाही प्रश्न उपस्थित केला. विविध क्षेत्रात महाराष्ट्राचं फार मोठ योगदान असलेल्या सत्तर-पंचाहत्तर दिग्गजांची-महापुरूषांची नावेच त्यांनी वाचून दाखवली. देशात महाराष्ट्र खूप मोठा आहे, महाराष्ट्राची परंपरा व योगदान मोठे आहे, पण आपले लोकप्रतिनिधी कंत्राटदारांच्या टक्केवारीत रस घेण्यात गुंतलेले आहे, हे भेदक वास्तव त्यांनी मांडले.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून मोदी, शाह, फडणवीस कुणावरही टीका केली नाही. मात्र शरद पवारांचा उल्लेख आदराने करताना फलोत्पादनात त्यांनी महाराष्ट्रात क्रांती घडवून दाखवली हे अभिमानाने सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संशयास्पद मृत्यू किंवा भोंदूबाबा अशोक खरातच्या राजकीय लागेबांधेविषयी मेळाव्यात कुणीच काही बोलले नाही. नव महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकांच्या सुचना व प्रस्ताव ऐकण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट, ही नवीन वेबसाईट सुरू करीत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. या वेबसाईटवर जय महाराष्ट्र किंवा तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, अशा पोस्ट टाकू नका, त्या तत्काळ डिलीट होतील अशीही तंबी त्यांनी दिली. करमणुकीच्या गटारगंगेतून व मोबाईलच्या जोखडातून बाहेर या असे त्यांनी आवाहन केले. मनसेची वेबसाईट विचारांना चालना देणारी ठरावी, अशी अपेक्षा.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अंतिम निर्णय राजसाहेबांचा! मग दुसरी फळी हवी तरी कशाला?

दि. ९ मार्च २०२६, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे)चा २०वा वर्धापनदिन. या दिवशी  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सकाळीच रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन मनसेच्या सदस्यनोंदणीला त्यांनी प्रारंभ केला. राज यांच्या पत्नी शर्मिलाही याप्रसंगी उपस्थित होत्या. महाराष्ट्राला हेवा वाटणारा भूतकाळ...

महाराष्ट्रातले विरोधी पक्ष देवाभाऊंच्या दावणीला?

‌‌महाराष्ट्रात गॅस सिलिंडरसाठी सर्वसामान्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. मुंबईसह सर्व लहानमोठ्या शहरांत व ग्रामीण भागात गॅस सिंलिंडरची प्रतिक्षायादी रोज वाढत आहे. दुसऱा सिलिंडर पंचवीस दिवसांनी नोंदवता येईल अशा सूचना असल्यातरी ग्रामीण भागात हीच अट ४५ दिवसांची आहे. वृत्तपत्रातून रिकामे...

फडणवीसांचे एका दगडात तीन पक्षी!

 राज्यसभेवर महाराष्ट्रातून झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवनाते, ज्योती वाघमारे, पार्थ पवार आणि शरद पवार यांची पुढील सहा वर्षांकरीता खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली. गेली सात वर्षे संसदीय कारकिर्दीपासून दूर असलेल्या विनोद तावडेंना भाजपाने...
Skip to content