Homeटॉप स्टोरीएमआयडीसीवर सायबर हल्ला;...

एमआयडीसीवर सायबर हल्ला; सरकारकडेच खंडणीची मागणी!

मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी ठेवण्याच्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातले अधिकारीच सहभागी झाल्याचे दिसून आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या एमआयडीसी म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला करण्यात आला असून हल्लेखोरांनी महामंडळाच्या माध्यमातून सरकारकडेच खंडणीची मागणी केल्याचे धाडस केले आहे.

२१ मार्च २०२१ रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास रॅन्समवेअरचा सायबर हल्ला झाला. त्यामुळे महामंडळाची संपूर्ण संगणक यंत्रणा बंद पडली असून हल्लेखोरांनी खंडणीची मागणी ईमेलद्वारे केली आहे, असा खुलासा महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आला आहे.

एमआयडीसीच्या सर्व प्रणाली ESDS (Cloude सेवा प्रदाता) आणि महामंडळाअंतर्गत स्थानिक सर्व्हरवर होस्ट केलेल्या आहेत. तसेच सुरक्षा व देखरेखीसाठी Trend Micro अँटी-व्हायरसचा वापर केला जातो. SYNack या रॅन्समवेअरने महामंडळाच्या मुख्यालयात होस्ट केलेल्या लोकल सर्व्हर सिस्टीम आणि डेटा-बेस सेवांवर परिणाम केला आहे. तसेच राज्यातील प्रादेशिक कार्यालयांमध्ये असलेल्या संगणकांनाही बाधा पोहोचली आहे. हल्लेखोरांनी केलेल्या ईमेलमध्ये हल्ल्याची माहिती दिलेली आहे. मात्र खंडणीच्या रक्कमेचा थेट उल्लेख केलेला नाही, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.

सायबर हल्ल्यानंतर संगणीकीय यंत्रणेत व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी नेटवर्कवरून संगणक तातडीने डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. महामंडळाची एक खिडकी योजना, इआरपी, बीपीएएमएस, संगणकीय भू-वाटप प्रणाली व पाण्याची देयके या यंत्रणांच्या बॅकअप फाइल्स वेगळ्या नेटवर्कवर संग्रहीत केल्या असून त्या सर्व सुरक्षित आहेत, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

महामंडळाचे संकेतस्थळ, एक खिडकी योजना (एसडब्ल्युसी), बीपीएएमएस या ग्राहकाभिमुख सेवा योग्य सुरक्षा तपासणी करून चालू करण्यात आल्या आहेत. तसेच ईआरपी – पाण्याची देयक यंत्रणा (इआरपी-डब्ल्युबीएस), इंटिग्रेटेड फाईल मॅनेजमेंट सिस्टम (आयएफएमएस) या यंत्रणा आजपर्यंत, ३१ मार्च २०२१पर्यंत पुन्हा कार्यान्वीत करण्यात येतील, असेही सांगण्यात आले.

हा हल्ला नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार कार्यवाही सुरू आहे. प्रकरणाची तक्रार मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हेगारी कक्षाकडे करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कळविले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content