कोविडच्या काळात पर्यटनाला जाऊ न शकलेल्या ग्राहकांच्या विमान तिकिटांचे पैसे परत करण्याकरीता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या रेट्यानंतर यात्रा, या ऑनलाईन मंचाकडून त्यांच्या ग्राहकांचे थकवण्यात आलेले तब्बल 26 कोटी परत केले.
कोविडमुळे पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडू शकले नाहीत. परिणामी त्यांनी यात्रा, या ऑनलाईन मंचामार्फत बूक केलेल्या विमान तिकिटांचे पैसे परत मागितले. पण, विमान कंपनी आम्हाला पैसे परत करत नसल्याचे कारण देत या कंपनीने पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू ठेवली. त्यानंतर अनेक ग्राहकांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावरून (1915-टोल फ्री क्रमांक) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रारी नोंदविल्या. कोविड-19च्या लॉकडाऊनच्या काळात रद्द केलेल्या विमान तिकिटांच्या रकमेचा परतावा अद्याप न मिळाल्याच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या. विमान कंपन्यांनी परतफेड न केल्याने ही रक्कम देऊ शकत नसल्याचे कारण अनेक पर्यटन कंपन्यांनी दिल्याचे ग्राहकांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.
याचा पाठपुरावा सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने प्रवासी लीगल सेल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (W.P.(C)D.No.10966 of 2020)मध्ये 01.10.2020 रोजी दिलेल्या निर्णयात असे म्हटले की, “जर कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात पर्यटन संस्थेमार्फत प्रवासासाठी तिकिटांचे आरक्षण केले असेल, तर अशा सर्व प्रकरणांमध्ये विमान कंपन्यांनी ताबडतोब पूर्ण रकमेची परतफेड करावी. अशी परतफेड झाल्यानंतर एजंटद्वारे प्रवाशांना ही रक्कम ताबडतोब पाठवली जावी.”
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोविड-19 लॉकडाऊनमुळे रद्द कराव्या लागलेल्या विमान तिकिटांच्या रकमेची परतफेड करण्यासाठी यात्रा, या ऑनलाईन पर्यटन मंचावर कारवाई केली. या पर्यटन कंपनीला 9 मार्च 2021 रोजी कोविड-19मुळे प्रभावित आरक्षणाच्या परताव्याबाबत झालेल्या विलंबाबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. नंतर याचा पाठपुरावा करण्याकरीता अनेक सुनावण्या घेतल्या.यात्रा ऑनलाईन लिमिटेडचे वर्ष 2021मध्ये, 36,276 तिकीट आरक्षणांचे 26 कोटी25 लाख 82,484 रुपयांचे परतावे प्रलंबित होते. प्राधिकरणाच्या पाठपुराव्यानंतर कंपनीकडून 31439 ग्राहकांचे तब्बल 23 कोटी 72 लाख 95386 रूपये परत करण्यात आले. 21 जून 2024पर्यंत ही रक्कम अदा करण्यात आली. परत केली गेलेल्या रकमेची टक्केवारी 87 टक्के आहे. आता 4,837 आरक्षणासाठी 2 कोटी 52 लाख 87,098 रूपयांचे परतावे प्रलंबित आहेत. ते परत करण्यासाठीही प्राधिकरण पाठपुरावा करत आहे.
वर्ष 2021मध्ये, विमान कंपन्यांशी संबंधित एकूण 5,771 आरक्षणांसाठी 9,60,14,463 रुपयांचे परतावे प्रलंबित होते. वर्ष 2024पर्यंत यात घट होऊन यात्रा कंपनीने ही संख्या विमान कंपन्यांशी संबंधित 98 आरक्षणांपोटी 31,79,069 रुपयांवर आणली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 27 जून 2024च्या आदेशाद्वारे यात्रा कंपनीशी निगडित उर्वरित 22 विमान कंपन्यांना ग्राहकांना 31,79,069 रुपयांची रक्कम त्वरित परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्राधिकरणासमोर झालेल्या सुनावणीत मेक माय ट्रिप, इझ माय ट्रिप, क्लिअर ट्रिप, इक्सिगो आणि थॉमस कूक यासारख्या इतर अनेक प्रवासी मंचांनी, कोविड-19 लॉकडाउनमुळे ज्या ग्राहकांची तिकिटे प्रभावित झाली त्या ग्राहकांना संपूर्ण रक्कम परत केली.
ग्राहकांना वेळेवर आणि सुलभरित्या परतावा मिळावा यासाठी प्राधिकरणाने 27 जून 2024 रोजी आदेश जारी केला आहे. त्यानुसार यात्रा कंपनीला राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन इथे समर्पित व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड-19 लॉकडाउनशी संबंधित कारणांमुळे रद्द झालेल्या विमानांसाठी त्यांची प्रलंबित परताव्याची रक्कम दिली जाईल, ही माहिती उर्वरित 4,837 ग्राहकांना कळवण्यासाठी त्यांना फोन करण्याकरिता राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन येथे पाच विशेष जागांची तरतूद करणे यात्रा कंपनीसाठी आवश्यक आहे. या कामासाठी समर्पित या पाच कर्मचाऱ्यांचा पूर्ण खर्च यात्रा कंपनीने करणे आवश्यक असून हेल्पलाईनचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेकडे थेट भरणा करणे आवश्यक आहे.