येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले असून त्या माध्यमातून पक्षासाठी काही कोटींचा निधी उभारण्याचे ठरवले असल्याचे समजते. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्षनिधीसह १० ऑगस्ट २०२४पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुंबईतले मुख्यालय टिळक भवन कार्यालयात पोहोचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे यांनी केले आहे.
उमेदवारीअर्ज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई येथे व सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज पक्षनिधीसह टिळक भवन दादर, मुंबई येथे सादर करावा. सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी २० हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती व महिला इच्छुक उमेदवारांना १० हजार रुपये पक्षनिधी अर्जासोबत भरावा लागणार आहे. जे इच्छुक उमेदवार जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज करतील त्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाने १० ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले अर्ज प्रदेश कार्यालयाला सादर करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून किमान १० इच्छुक उमेदवार अर्ज करतात. आता तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ज्या पद्धतीने यश मिळाले ते पाहता यावेळी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या दुपटीने वा तिपटीने वाढण्याची शक्यता आहे. हे सर्व उमेदवार मागासवर्गीय वा महिला असल्याचे गृहित धरले तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून काही लाख रूपये गोळा होतील. महाराष्ट्रात २८८ विधासभा मतदारसंघ आहेत. ही संख्या लक्षात घेतली तर या इच्छुकांच्या माध्यमातून काँग्रेस काही कोटी रूपयांचा निधी उभारणार असल्याचे दिसून येते.
मतदारयाद्या अद्ययावत करण्यावर भर द्या..
मतदारयाद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून २५ जून ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदारयाद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदारांची नावे यादीत आहेत का? ते पाहवे. नसल्यास ती नावे पुन्हा यादीत सामाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच नाव, पत्ता यात काही बदल करावयाचा असल्यास ती सर्व कामे करून मतदारयादीत जास्तीतजास्त पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया करून घ्यावी. ज्या युवक, युवतींनी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत, त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यावरही भर द्यावा, अशी सूचना काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रातांध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली आहे.