ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन बॅडमिंटन असोसिएशनने नुकत्याच आयोजित केलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत वयस्कर मास्टर्स विभागात ३५ वर्षांवरील वयोगटात मुंबईच्या चिन्मय ढवळे, ज्यूड वर्नकुला जोडीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील लढती “राऊंड रॉबिन” पद्धतीवर घेण्यात आल्या. त्यामध्ये १० जोड्यांचा समावेश होता. त्यामध्ये चिन्मय आणि ज्यूडने आपले सर्व सामने जिंकून अव्वल क्रमांक मिळवला. त्या जोरावर या जोडीला जेतेपद बहाल करण्यात आले. उपविजेतेपद धर्मतेजा मानसिंग आणि संदीप गवाणकर या जोडीला मिळाले.
सुरुवातीच्या काळात आयकर खात्याचे माजी बुजूर्ग आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मिलिंद पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन चिन्मय ढवळेला मिळाले होते. चिन्मयचे वडिल चांगले क्रिकेटपटू असून ते टाइम्स ढाल, कांगा लिग क्रिकेट स्पर्धेत खेळले आहेत. या स्पर्धेत काही नामवंत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सहभाग होता. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अश्या ५ गटात सामने खेळवण्यात आले.