ऑस्ट्रेलिया येथे क्वीन्स लँड बॅडमिंटन असोसिएशनने नुकत्याच आयोजित केलेल्या एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे,अजय कृष्णन यांनी बाजी मारली.
या स्पर्धा ओपन ए, बी, सी व डी ग्रुपमध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे, मुंबई व अजय कृष्णन, केरळ यांनी “बी” ग्रुपमध्ये दुहेरीचे विजेतेपद मिळवले. या गटात 14 जोड्यांनी भाग घेतला होता. एक गेम 31 पॉईंटचा होता. स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यातून प्रथम चार जोड्यांनी उपांत्य फेरी गाठली.
चिन्मय व अजयने उपांत्य फेरीत पहिले मांनांकन देण्यात आलेल्या लुकान लान व दवे नऊंग जोडीचा सनसनाटी पराभव केला. त्यांनी अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या मानांकित सुमित पुरी, राजेश वर्गीस जोडीवर सहजरीत्या मात करून दुहेरीचे विजेतेपद पटकावले. चिन्मय ढवळे मुंबईचा असून त्याला सुरुवातीच्या काळात आयकर विभागाचे माजी निरीक्षक व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मिलिंद पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन लाभले होते. चिन्मयने गेल्या महिन्यातसुद्धा 35 वर्षांवरील दुहेरीच्या गटात जुड वर्णकुला यांच्या साथीने विजेतेपद मिळवले होते.