Monday, December 23, 2024
Homeडेली पल्सछत्रपती शिवाजी महाराज:...

छत्रपती शिवाजी महाराज: एक आदर्श शासनकर्ता!

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले तथा छत्रपती शिवाजी महाराज, एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात.

शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल साम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजी महाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा.. असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले. पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला. महाराजांनी साध्या-भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला. स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले. महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले. नवे निर्माण केले. योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला.

महाराजांनी आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला. सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था.. अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली.

महाराजांनी राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला. विविध कलांना राजाश्रय दिला तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. या सर्व गोष्टी महाराजांनी साध्य केल्या. अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात!

वयाच्या केवळ १६व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच पातशाह्यांच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले.

खिस्ताब्द १६७४मध्ये त्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदू धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले.

शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या कार्यातून ‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीची प्रेरणा घेऊया. छत्रपती महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. हिंदूंनी त्यांचे गुण आत्मसात करायला हवेत. हीच शिवरायांना त्यांच्या जन्मदिनी खरी आदरांजली ठरेल.

Continue reading

तथाकथित पर्यावरणवाद्यांचा नाद सोडा, शाडूच्या गणेशमूर्तीच आणा!

चिकणमाती किंवा शाडूची माती यापासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची...

चला चाळवूया क्रांतीवीर मदनलाल धिंग्रांच्या स्मृती!

भारतीय क्रांतिकारकांचा इतिहास पाहिला तर, पंजाबमधील आद्य क्रांतीकार म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मदनलाल धिंग्रा यांचा आज म्हणजेच 17 ऑगस्ट हा बलीदानदिन! त्यांच्याविषयी थोडेसे. मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी, 1883 साली पंजाबमधील एका क्षत्रिय घराण्यात झाला. सन 1906मध्ये ते आगबोटीवर काम करुन...

चला.. सुराज्य स्थापनेचा संकल्प करूया!

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी असीम त्याग करून आणि आपल्या प्राणांचे बलिदान देऊन इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला सोडवले, यामुळेच आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू शकत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आपल्याला स्वराज्य मिळाले. मात्र, सुराज्य...
Skip to content