Thursday, November 7, 2024
Homeहेल्थ इज वेल्थस्वच्छतेने साजरा करा...

स्वच्छतेने साजरा करा जागतिक आरोग्य दिन!

७ एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्थापन झालेल्या जाग‍तिक आरोग्‍य संघटनेमध्ये जगातील जवळजवळ १९२ देश सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरील उपाय यावरच मर्यादित न राहता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो.

नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे, इत्यादी कामे या संघटनेमार्फत केली जातात. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमाध्यमे आदींमार्फत त्याविषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते.

आज संपूर्ण जग कोविड-१९सारख्‍या भयंकर महामारीचा मुकाबला करत आहे. महाराष्‍ट्रात या साथीने हाहाःकार माजवलेला असून दररोज मोठया संख्‍येने कोविड रुग्‍णांचे निदान होत आहे. कोरोनाची साखळी खंडीत करण्‍याचे मोठे आव्‍हान आज यंत्रणांसमोर उभे आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकांनी आपल्‍या आरोग्‍याची योग्‍य काळजी घेण्‍याची गरज प्रकर्षाने निर्माण झालेली आहे. कोरोना साथीला हददपार करण्‍यासाठी लोकांची सावधगिरी अत्‍यंत गरजेची आहे. शासनाने घालून दिलेल्‍या नियमांचे पालन केले तर या आजाराला आपल्‍यापासून व इतरांपासूनदेखील दूर ठेवता येईल.

सार्वजनिक स्‍थळी वावरताना सदासर्वदा मास्‍क परिधान करणे, सोशल डिस्‍टंसींग पाळणे याबरोबरच वैयक्‍तिक स्‍वच्‍छतेला अपार महत्त्‍व देणे गरजेचे आहे. शासनाच्‍या माध्‍यमातून आज अनेक आरोग्‍य सेवा व योजना गरीब, गरजू लोकांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. सदर योजनांची व्‍यापक प्रसिद्धी व प्रचार होणे गरजेचे आहे, जेणेकरुन जास्‍तीतजास्‍त लोकांपर्यंत हया आरोग्‍य सेवा पोहोचतील.

लोकांच्‍या बदललेल्‍या जीवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्‍म घेत असून त्‍यावरील उपचारपद्धती व खर्चाची व्‍याप्‍तीदेखील वाढत आहे. हया आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वात मोठी काळजी घ्‍यावी लागेल ती स्‍वच्‍छतेची. वैयक्तिक व सामाजिक स्‍वच्‍छता ही माणसाच्‍या आरोग्‍यावर विपरित व दूरगामी परिणाम करते. सार्वजनिक स्‍वच्‍छतेची सुरुवात वैयक्तिक स्‍वच्‍छतेपासून होते. प्रत्‍येकाने आपले घर व परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत.

शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व स्‍वच्‍छता हा विकासाचा अविभाज्‍य भाग आहे. आपल्‍या घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्‍तिक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्‍येकाने करणे व त्‍यायोगे “स्वच्छतेतून समृद्धीकडे” ही संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छतेअभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पीडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे स्‍वच्‍छतेतून लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी शासनही प्रयत्नशील आहे.

आरोग्यि

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यासारख्‍या योजनांमध्‍ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन स्‍वच्‍छतेचे महत्त्व पटविण्‍यात येत आहे. परदेशात जाऊन आल्‍यानंतर आपण तेथील शहरांची स्वच्छता पाहून त्यांचे गुणगान गातो. मात्र तेथील स्वछता, शिस्त, सौंदर्यसृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच, हेदेखील विसरता कामा नये. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, पण परिसराशी आपल्‍याला काही देणेघेणे नसते. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे.

आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उदयान, रस्‍ते याठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्‍य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नदया व नाले या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनली आहेत. कचऱ्याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग अस्वच्छतेमुळे होत आहेत.

आपल्‍या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपण केवळ वैयक्तिक स्वच्छतेवरच भर न देता सामुदायिक पातळीवर एकत्र येऊन काम केल्यास आपले शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास व वृध्दींगत होण्यास मदत होईल. स्‍वच्‍छतेमुळे आपण केवळ वैयक्तिक स्वार्थ साधत नाहीतर, ती एक मोठी देशसेवा व निसर्ग सेवाही आहे. आपल्‍या सभोवतालचा परिसर स्‍वच्‍छ राखण्‍यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्‍टी करता येतात.

आजकाल जागोजागी पसरलेल्‍या कचऱ्यामध्‍ये सर्वात मोठया प्रमाणावर दिसणारा घटक म्‍हणजे प्‍लॅस्टिक. एकतर प्‍लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्‍लॅस्टिकचा कचरा आरोग्‍यासाठी खूप घातक आहे. त्‍यामुळे आपण सर्वांनी प्‍लॅस्टिक पिशव्‍या व प्‍लॅस्टिकचे आवरण असलेले खादयपदार्थ वापरणे बंद करायला हवे, तसेच प्‍लॅस्टिकचे विघटनदेखील योग्‍य मार्गाने करायला हवे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्‍या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील कचऱ्याची योग्‍य त्‍या ठिकाणी ओला–सुका वर्गीकरण करुन विल्‍हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व तेव्‍हा परिसराची स्‍वच्छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्‍यासाठी प्रवृत्‍त करायला हवे.

केंद्र शासनाने आणलेली स्‍वच्‍छ भारत संकल्‍पना देशाला अधिक समृध्‍द व सुंदर बनवणारी असून यासाठी आपला सर्वांचाच सहभाग अत्‍यंत मोलाचा आहे. आज जागतिक आरोग्‍य दिनाच्‍या निमित्‍ताने आपण स्‍वच्‍छतेची शपथ घेऊन आपला परिसर व घर स्‍वच्‍छ राखण्‍याचा संकल्‍प करुया. स्‍वच्‍छतेतून कोरोनोमुक्‍ती सहज शक्‍य आहे. त्‍यामुळे आपण आपली व्‍यक्‍तीगत, घराची व परिसराची स्‍वच्‍छता अबाधित ठेवून संसर्गाला अटकाव करुया व कोविड साथीचा एकजुटीने मुकाबला करुया.

जागतिक आरोग्‍य दिनाच्‍या सर्वांना आरोग्‍यमय शुभेच्‍छा. मास्‍क वापरा, काळजी घ्‍या, सुरक्षित राहा!    

Continue reading

आनंदात वचन तर रागात निर्णय नेहमीच घातक!

आनंदात वचन तर रागात निर्णय घेऊ नये, असे म्हणतात. ते नेहमी घातक ठरते. यासाठीच लागते मनावर नियंत्रण. १० ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्‍य दिन म्‍हणून साजरा केला जातो. आरोग्‍य हा आपल्‍या प्रत्‍येकाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत जिव्‍हाळयाचा व संवेदनशील विषय...

सहकारी बॅंकामधील ठेवी किती सुरक्षित?

शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्‍याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून सहकारी बँकांमधून मोठे घोटाळे उघड झाले आहेत. त्‍यामध्‍ये लाखो ठेवीदारांच्‍या ठेवी अडकलेल्‍या असून त्‍याचा...

करूया संकल्प लोकसंख्या नियंत्रणाचा!

आज ११ जुलै, जागतिक लोकसंख्‍या दिन. सन 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटींच्या घरात होती. सन 1987 साली ही लोकसंख्या दुप्पट म्हणजे 500 कोटी झाल्याने वाढत चाललेल्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने 11 जुलै 1987पासून जागतिक लोकसंख्या दिन...
Skip to content