Homeमाय व्हॉईसमुंबईतले बसडेपो म्हणजे...

मुंबईतले बसडेपो म्हणजे ‘बेस्ट’साठी काळीमाच!

बेस्ट बससेवा वाचवण्याची मोहीम काही राजकीय पक्षांनी तसेच नागरिकांनी चालवलेली आहे. चांगले आहे. बेस्ट हा सार्वजनिक वाहतूक सेवेतील मुकूटमणी आहे. तो वाचवलाच पाहिजे, त्यात दुमत असण्याचे कारणच नाही. परंतु या बेस्ट सेवेत असलेल्या कामगार-कर्मचारी-अधिकाऱ्यांचे हाल हल्ली कुत्राही खात नाही अशी अवस्था आहे. अधिकारी आपल्यावरील अन्याय वा हाल सुधारून घेण्यास समर्थ आहेत. पण बिचाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांचा मात्र कुणीच वाली नाही, असे चित्र सध्यातरी दिसत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही तर हे चित्र अधिकच गडद होण्याची शक्यता आहे. पगाराव्यतिरिक्तही कामगार, कर्मचाऱ्यांच्या व्यथा असतात हे आपल्या कामगार संघटनांना अजून पुरेसे कळलेले नाही, असे खेदाने नमूद करावे लागत आहे.

बेस्टचे मुंबई शहरात व उपनगरात मिळून सुमारे शंभरहून अधिक लहानमोठे डेपो आहेत. कुलाबा डेपो तोही बेस्ट भवनला (बेस्टचे मुख्यालय) लागून असल्याने धड अवस्थेत आहे. मात्र हा एकमेव डेपो सोडला तर बाकीचे सर्व डेपो ‘बकवास’ या एकाच शब्दात वर्णन करावे असेच आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वच्छ मुंबई मोहिमेचा शुभारंभ धारावी विभागातून केलेला होता, हे सर्वांना आठवत असेलच. तर मीही आज या बकवास डेपोची कहाणी शीव डेपोपासून सुरू करणार आहे.

“एक कडक चहा

समभावाचा

एक पाव घे राष्ट्रीयतेचा

नि त्यावर मस्का लाव

खुशामतीचा

एवढा नास्ता पुरेसा आहे तुला

तग धरण्यासाठी” (बागवे)

मुद्दामच चहापासून सुरुवात केली. कारण बेस्टच्या चालक-वाहकांना तसेच डेपोतील अधिकाऱ्यांना चहाचे भयंकर व्यसन आहे. चहाबरोबर पाव, खारी, बिस्किटे पोटात गेली की ही माणसे दिवसन् दिवस न कुरकुरता काम नित्यनेमाने व प्रामाणिकपणे करत असतात. तर अशा कॅन्टीनमध्ये फुल ताट मिळाले नाही तरी त्यांना मिसळ वा अन्यपदार्थ मिळाले तरी चालतात. तर अशी छोटी कॅन्टीनही आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जी बंद पडलेली नाहीत ती लवकर बंद पडावीत म्हणून पडद्याआड अधिकाऱ्यांना हाताशी धरून निविदा न काढताच ‘आपडो’ माणसांना देण्याचे घाटत आहे.

महापालिका प्रशासन व बेस्ट यंत्रणा हल्ली या कॅन्टीनना अनुदान देत नसल्याने कुणी कॅन्टीन चालवायला पुढेच येत नसल्याचे समजले. संतापजनक बाब म्हणजे कामगारांना आवश्यक असणाऱ्या या गोष्टीबाबत अजूनपर्यंत कुठल्याच कामगार संघटनेने आवाज उठवलेला नाही. खरे तर कामगारांसाठी चालवण्यात येणाऱ्या कॅन्टीनना शिधापत्रिकेप्रमाणे शिधा पुरवला जातो. तसा नियमही आहे. परंतु सर्व नियमांची पायमल्लीच करणे आजकाल सुरु असल्याने कामगारांची कुणाला काळजीच नाही. तर अशा परिस्थितीत शीव डेपोतही चहा, बिस्किटे, मिसळ वगैरेशिवाय काहीच मिळत नाही. नाही म्हणायला वेफर्सची स्वस्त मिळणारी पाकिटे मात्र मुबलक मिळतात.

डेपोची दयनीय अवस्था

या डेपोला दोन मोठे दरवाजे (न दिसणारे) आहेत. सुरक्षाराक्षकांच्या नावाने मोठी बोंब आहे. डेपोत येणाऱ्या व डेपोतून बाहेर जाणाऱ्या मार्गावर मला तरी अजूनपर्यंत एकही सुरक्षारक्षक दिसलेला नाही. यामुळे रात्री दहा वाजल्यानंतर अनेक खासगी गाड्या, पावभाजीच्या टपऱ्या येथे आणून पार्क केल्या जातात. डेपोच्या एक मजली इमारतीची पुरेशी दुर्दशा झालेली आहे. सुमारे 20/ 25 वर्षे तरी या छोट्या इमारतीकडे ना प्रशासनाचे लक्ष गेले ना कार्यसम्राट म्हणवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधीचे! डेपोतील रस्ता तर बिघडला म्हणण्यापलीकडे बिघडलेला आहे. ठिगळे मात्र लावलेली आहेत.

सर्वात संतापजनक बाब म्हणजे चालक-वाहकांचा विश्रांतीकक्ष व त्यालाच लागून असलेले स्वच्छतालय / प्रसाधनगृह. या दोन्ही गोष्टी इतक्या बकाल झालेल्या आहेत की बकालपणा म्हणजे काय असतो ते पाहण्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी व महाव्यवस्थापक सिंघल साहेब या दोघांनी संयुक्तपणे या डेपोला भेट देण्याची गरज आहे. इतकी घाण अवस्था रेल्वेच्या प्रसाधनगृहातही नसते. गुरेढोरेही अशा अवस्थेत कुणी ठेवणार नाही अशी परिस्थिती स्वतःला बेस्ट म्हणवणाऱ्या प्रशासनाने आणलेली आहे.

या डेपोसाठी नेमलेल्या सफाई कामगारला कुणीही पाहिलेले नसल्याचे समजले. अधिक खोदून विचारले असता दररोजच्या 50/100 रुपयांवर सफाई कामगार ठेवल्याचे समजले. प्रशासनाकडून मात्र कंत्राटी कामगारांचे यापेक्षा कितीतरी जादा पैसे मंजूर झालेले असतात, असे एका ज्येष्ठ वाहकाने सांगितले. येथूनच ठाणे शहराकडे जाणारी बस सुटत असते. या बसला नेहमीच गर्दी असते. या बसच्या थांब्यासाठी शेड नाही, प्रवाशांना बसण्यासाठी बाकडी नाहीत. गेली अनेक वर्षे हे अबालवृद्ध प्रवासी उनपावसात असेच उभे असतात.

ही बस सेवा रात्री 11 वाजेपर्यंत असते असे बेस्ट भवन सांगते. मात्र डेपो मात्र वेगळेच सांगतो. डेपो रात्री 10चाच वायदा करतो. ठाणे शहरासाठी ही बस सेवा उपयुक्त असल्याने ठाणे येथील दादलानी पार्कमध्ये एक सुसज्ज डेपो बांधण्यात यावा, अशी चालक-वाहकांची मागणी आहे. तेथे विश्रांती कक्षही निर्माण केल्यास चालक-वाहकांच्या आरामाची चिंताही सुटेल, असे एका ज्येष्ठ चालकाने सूचित केले. सिमेंटच्या बांधकामास उशिर होतो हे गृहीत धरून तेथे सध्या कंटेनर डेपो सुरू करावा अशी मागणीही त्यांनी केली. दादालानी पार्कमध्ये बरीच जागा असून ठाणे महापालिकेशी संपर्क करून जागेचा प्रश्न सोडवता येऊ शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content