भारतातल्या ‘प्रोजेक्ट चित्ता’च्या पुढच्या टप्प्यासाठी बोट्स्वानाकडून आठ चित्त्यांची भेट मिळाली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत बोट्स्वानाच्या मोकोलोडी अभयारण्यात या चित्त्यांची प्रतिकात्मक सुटका करण्यात आली. राष्ट्रपती मुर्मू यांनी, बोट्स्वानाचे अध्यक्ष डुमा गिडियन बोको यांच्यासह काल सकाळी बोट्स्वानामधल्या मोकोलोडी अभयारण्याला भेट दिली. यावेळी भारत आणि बोट्स्वानातल्या तज्ज्ञांनी घांझी प्रदेशात पडकलेले चित्ते विलगीकरण सुविधा क्षेत्रात सोडले जात असल्याची प्रक्रिया प्रत्यक्षात अनुवभवली. प्रोजेक्ट चित्ताअंतर्गत बोट्स्वानाकडून भारताला आठ चित्ते दिले जाणार आहेत. त्याची प्रतीकात्मक कृती म्हणून या उपक्रमाचे नियोजन केले गेले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात भारत आणि बोट्स्वानातल्या परस्पर सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला.

यानंतर राष्ट्रपती मुर्मू वेगवेगळ्या बैठकांमध्ये सहभागी झाल्या. या बैठकांअंतर्गत त्यांनी बोट्स्वानाचे उपराष्ट्राध्यक्ष न्डाबा गाओलाथे आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री डॉ. फेन्यो बुटाले यांची भेट घेऊन चर्चा केली. बोट्स्वानातून भारतासाठी रवाना होण्यापूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गॅबोरॉने इथे भारताच्या उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सहभागी झाल्या. तिथे त्यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केले. या समारंभात केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना आणि संसदेचे सदस्य प्रभभाई वसावा, तसेच डी. के. अरुणा उपस्थित होते.

हे सर्वजण भारताचे खरे सांस्कृतिक राजदूत आहेत, कष्ट, प्रामाणिकपणा आणि सलोखा या मूल्यांचे ते प्रतिनिधित्व करतात आणि हीच भारत तसेच बोट्स्वाना या दोन्ही देशांची वैशिष्ट्ये आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. इथल्या भारतीय समुदायाने बोट्स्वानाच्या प्रगतीसाठी योगदान देत असतानाच भारतासोबतचे आपले नातेही अधिक दृढ करावे, असे आवाहनही त्यांनी केले. परदेशस्थ भारतीयांसाठीची योजना आणि अनिवासी भारतीय दिन यांसारख्या उपक्रमांचाही लाभ घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.
बोट्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष बोको यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, भारत आणि बोट्स्वाना हे दोन्ही देश व्यापार, शिक्षण, आरोग्य, डिजिटल तंत्रज्ञान, कृषी आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपल्यातील परस्पर सहकार्याचा विस्तार करणार असल्याचा निर्णय झाल्याची माहितीही राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली.

