बिग बॉस मराठी, या करमणुकीच्या नव्या सीझनला आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी, या दूरचित्रवाणीवरच्या चॅनलवर सुरुवात होत आहे. यावेळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख. शंभर दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात बिग बॉसच्या घरात कोण कोण राहणार हे अजूनही पूर्ण स्पष्ट झालेले नसले तरी घरातल्या पाहुण्यांच्या त्यांच्या दैनंदिन सहभागावर लक्ष ठेवण्यासाठी 100 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. Jiocinema वर कधीही हा कार्यक्रम पाहता येणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्यांदाच येतेय एक ‘परदेसी गर्ल’
‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा पहिल्यांदाच एका ‘परदेसी गर्ल’ची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. आपल्या हटके फॅशनने समृद्ध करणारं तिचं व्यक्तिमत्त्व, किलर लूक आणि घायाळ करणाऱ्या अदा… आत्मविश्वाच्या जोरावर जिंकेल का मराठमोळ्या ‘बिग बॉस’प्रेमींची मने? ग्लॅमरस परदेसी गर्ल ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कशी करतेय जगण्याची कसरत हे लवकरच पाहयला मिळेल.
येतोय सुरांचा बादशाह
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा नॉन रिव्हिल प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमोत झळकणारा हा सदस्य कोण? हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. या सुरांच्या बादशाहमुळे घरातील राधा बावऱ्या होणार आहेत, हे मात्र निश्चित.
बिग बॉस मराठी, हा एक असा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये बिग बॉस म्हणजेच रितेश देशमुख त्याच्या घरामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा हालचालींवर, लकबीवर बारकाईने लक्ष ठेवून त्याप्रमाणे कोणाला किती दिवस ठेवायचे याचा निर्णय घेणार आहे. हा पूर्ण माईंड गेम आहे जो सर्वांना प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, बिग बॉसचा हा नवा कार्यक्रम सादर करण्यास मी फार आतूर आहे. गेली अनेक वर्षं बिग बॉसचा हा कार्यक्रम मी फार जवळून आणि काळजीपूर्वक पाहत आलो आहे आणि आता हा कार्यक्रम सादर करताना मी फारच उत्साही आहे. ही एक नवीन जबाबदारी आहे जी मला पार पाडायची आहे. एक नवीन स्टाईल आणि नव्या पद्धतीने बिग बॉसचा हा नवा सीजन मला प्रेक्षकांसमोर सादर करायचा आहे.
कलर्स मराठी चॅनलचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे म्हणाले की, बिग बॉस मराठी हा एक फार भव्य कार्यक्रम आहे व दोन वर्षांनंतर आता पुन्हा सादर होतोय. हा कार्यक्रम एक नवी कोरी सुरुवात घेऊन येईल. हा कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी आम्ही रितेश देशमुखवर टाकली आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या विविध भागांमधल्या लोकांना सहभागी झालेले पाहता येईल. त्यांचे टॅलेंट आणि लोकप्रियता बिग बॉसच्या नव्या सीजनमध्ये सर्वांच्या लक्षात राहील.