अक्षय ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा साठा या क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्याबद्दल भारतरत्न प्राध्यापक सी. एन. आर राव यांना ‘ऊर्जा फ्रंटीयर अवार्ड’ या नावाने परिचित असलेला आंतरराष्ट्रीय इनी पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे. अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार ऊर्जा संशोधन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
प्रा. राव हायड्रोजन ऊर्जा, या मानवतेच्या कल्याणासाठी असलेल्या एकमेव उर्जा स्त्रोताच्या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. हायड्रोजनचा साठा, हायड्रोजनचे फोटोकेमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल उत्पादन, हायड्रोजनचे सौर उत्पादन आणि अधातू उत्प्रेरक या सगळ्यावर त्यांनी संशोधन केले आहे.
रोमच्या क़्विरिनल पॅलेसमध्ये 14 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या अधिकृत समारंभात त्यांना हा इनी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असेल.
ऊर्जा आणि पर्यावरण संशोधन क्षेत्रात, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणून मान्यता मिळालेल्या या पुरस्काराचा उद्देश, ऊर्जा स्त्रोतांचा सुयोग्य वापर करण्यास प्रोत्साहन आणि नव्या पिढीला या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी पाठबळ तसेच प्रोत्साहन देणे आहे. इनीने वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेषाला दिलेले महत्त्व यातून अधोरेखित होते. रोख रक्कम आणि सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.