राज्य कृषी विभागामार्फत आयोजित यंदाच्या शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण यांची युरोप गट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. १५ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा हा एकूण १४ दिवसांचा अभ्यास दौरा आहे. या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी ६ गटांमध्ये राज्यातील एकूण १८० शेतकऱ्यांची निवड झाली होती. यापैकी युरोप दौऱ्याकरीता राज्यातील ५५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्पैयाकी ४१ शेतकऱ्यांनी स्वारस्य दाखविले. युरोप व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या ४१ शेतकऱ्यांची अंतिम निवड झाली आहे.

या दौऱ्यामध्ये युरोप समुहातील फ्रान्स, स्विझर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांतील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फलोत्पादन, दुग्धोत्पादन, बीज पक्रिया आदींशी संबंधित मान्यवर विद्यापीठांना भेटी देऊन माहिती घेण्यात येणार आहे. कृषी विभागाने या परदेशी दौऱ्यातील ज्ञानाचा उपयोग संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना करुन देण्याच्या उद्देशाने ६ परदेशी गटांमधून या दौऱ्याची आखणी केली आहे. या दौऱ्यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एकूण ५ शेतकऱ्यांची वेगवेगळ्या गटांतून निवड झाली आहे. यापैकी काही शेतकरी गट या अभ्यासदौऱ्यासाठी यापूर्वीच रवाना झाले आहेत.
युरोप अभ्यासदौऱ्यासाठी कोकणातील ८ शेतकरी
या युरोप दौऱ्यासाठी ठाणे येथील गुरुनाथ कांबळे, बबन हरणे, विष्णू म्हात्रे, पालघर येथील वैजनाथ पाटील, रायगड येथील सुरेंद्र विचारे, नुपूर भापकर, रत्नागिरी येथील मधुरा इनामदार आणि सिंधुदुर्गातील गणपत चव्हाण असे कोकणातील ८ शेतकरी रवाना होत आहेत.

