Wednesday, March 12, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजसावधान! स्मृतिभ्रंश होणाऱ्यांची...

सावधान! स्मृतिभ्रंश होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय!!

केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक संपन्न देशांमध्ये स्मृतिभ्रंश होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. यातच या रोगाविषयी तज्ज्ञांचे मत असे आहे की, अशा लोकांची संख्या आता वाढतच जाणार आहे. अत्यंत प्रगत मानल्या जाणाऱ्या एका देशात या रोगाने ग्रस्त लोकांची संख्या येत्या काही वर्षात दुप्पट होऊ शकते असे अनुमान केले गेले आहे. याच संशोधनात असेही म्हटले गेले आहे की स्मृतिभ्रंश रुग्णांच्या संख्येतील ही वाढ जगातील अनेक देशांमध्ये आढळून आली आहे. सध्या अनुमानित स्मृतिभ्रंश होण्याचे वय साधारण ५५ मानले गेले आहे, असे न्यूयॉर्क विद्यापीठातील साठीच्या रोगांचे तज्ज्ञ जोसेफ कोरेश यांनी म्हटले आहे. स्मृतिभ्रंश होण्याची सध्याची जोखीम ४२ टक्के असून ती गेल्या काही वर्षांत वाढती राहिली आहे. ७५ वर्षे वयाच्या वरील नागरिकांसाठी हीच टक्केवारी ५० टक्के होते.

या संशोधनात असे आढळले की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये स्मृतिभ्रंश अधिक प्रमाणात आढळतो आणि एकूणच याविषयी निदान वेळेवर होत नसल्याने विकार बळावतो. ज्या लोकांच्या शरीरात एका विशिष्ट अशा एपीओई४ या जनुकाची एक प्रत हवी त्याऐवजी दोन प्रती असतात त्यांच्याबाबतीत जोखीम ५९ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. सधन लोकांच्याबाबतीत किमान वैद्यकीय निदान होत असले तरी आर्थिक विवंचनेत असलेल्या लोकांपर्यंत ते पोहोचत नाही आणि साहजिकच तेथे स्मृतिभ्रंशाचे प्रमाण वाढलेले आढळते. खरेतर जनगणना करीत असताना यावर विचार केला गेला आणि वरिष्ठ नागरिकांच्याबाबतीत स्मृतिभ्रंश हा प्रश्नही नोंदवून घेतला गेला तर त्यांना अधिक चांगली आरोग्यसेवा मिळू शकेल.

स्मृतिभ्रंश हा विकार निर्माण होण्याच्या कारणांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित रोग यांचा समावेश केला गेला आहे. त्यावर योग्यवेळीच उपचार केले गेले तर स्मृतिभ्रंशाचे प्रमाण कमी होऊ शकेल. त्यातली अतिशय सोपी बाब म्हणून तज्ज्ञांनी यामध्ये ‘हिअरिंग एडस’ मोठ्या प्रमाणात आणि परवडतील अशा किंमतीत दिले जावेत असे मत व्यक्त केले आहे.
स्मृतिभ्रंश हा विकार बाहेरून दिसत नसला तरी तो माणसाला आणि त्याच्या परिवाराला पोखरून काढतो आणि घरातल्या लोकांनाही काय करावे ते कळत नाही. योग्य निदान आणि उपचार याच मार्गाने आपण जगात आणि देशात स्मृतिभ्रंशाची लागण कमी करू शकतो.

हे मूळ संशोधन नेचर औषधोपचार या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. १४० कोटींच्या भारतामधील वरिष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे असे दिसून आले आहे. वरिष्ठ नागरिकांची संख्या सन २०५०पर्यंत म्हणजे आणखी २५ वर्षांत २० टक्के वाढून जागतिक पातळीवर अशा ६० वर्षांवरील नागरिकांमधले आपले प्रमाण १५.४ टक्के असू शकेल. १९६०मध्ये भारतातील जनतेची आयुष्यमर्यादा ४२.९ वर्षे होती. ती २०२०मध्ये ७०.४ वर्षे झाली आहे. स्मृतिभ्रंशाच्याबाबतीत विचारात घेतला जाणारा सर्वात महत्त्वाचा घटक अर्थातच वय हा असतो. भारतात ६० वर्षे वयाहून अधिक लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण ७.४ टक्के असून एकूण ८८ लाख लोक या विकाराने ग्रस्त असावेत असे मानले जाते. मात्र येथे ग्रामीण क्षेत्रात याची लागण अथवा ओळख उशिरा झाल्यामुळे तेथे हे प्रमाण शहरांपेक्षा अधिक असणे स्वाभाविकच मानले जायला हवे.

Continue reading

आई-बाबा आणि मुलांमधला संवाद संपत चाललाय का?

समाज एकसारखा राहत नाही. त्यात बदल होत असतो आणि हा बदल अनेकदा त्यावेळी पालक असलेल्या लोकांच्या लक्षात येतो तेव्हा ते सर्वात अगोदर कुणाची काळजी करीत असतील तर आपल्या मुलांची. हे तर जागतिक सत्य म्हणावे लागेल. आज जरी आई आणि...

श्वासाचा संबंध बुबुळांशीही…

श्वासाचा संबंध शरीरातील कोणत्या गोष्टीशी असतो असा प्रश्न असेल तर उत्तरे प्रत्येकाच्या आकलनानुसार असतील. कुणी म्हणेल शरीरासाठी प्राणवायू आवश्यक. तो श्वासातून मिळतो. कुणी म्हणेल की ठसका लागून क्षणभर जरी श्वासाला त्रास झाला तर आपण हडबडतोच, पण आपल्यासमोर जे कुणी...

सावधान! शहरांतले उंदीर वाढताहेत…

शहरांचे उष्णतामान वाढते आहे आणि त्यासोबतच ग्रामीण भागातून आणि इतर ठिकाणांहून लोक शहरात काम मिळवण्यासाठी येतच राहणार. ताजे संशोधन असे सांगते की, यामधून शहरातील उंदरांची संख्या वाढत राहणार आहे. कुणी म्हणेल की यात नवीन ते काय सांगितले? शहराची लोकसंख्या...
Skip to content