राज्यातली उपहारगृहे, बार (मदिरालये) आणि मॉल तसेच सर्व प्रकारची दुकाने येत्या १५ ऑगस्टपासून आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र, शाळा-महाविद्यालये, सिनेमा तसेच नाट्यगृहे आणि सर्व प्रकारची प्रार्थनास्थळे (देवालये) सध्यातरी बंदच राहतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज संध्याकाळी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ ऑगस्टपासून हॉटेल व रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. तेथील सर्व कर्मचाऱ्यांचा लसीची दुसरा डोस होणे आवश्यक आहे. वेटर्स तसेच वेटिंगमधले ग्राहक यांनी तोंडाला मास्क लावलेला हवा. शॉपिंग मॉलही रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र, त्यात लसींचे दोन डोस घेऊन १५ दिवस झालेल्यांनाच परवानगी असेल. १५ ऑगस्टपासूनच इनडोअर स्टेडिअम तसेच व्यायामशाळाही ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, असे त्यांनी सांगितले.
लग्नाचे हॉलही १५ ऑगस्टपासून ५० टक्के क्षमतेने किंवा जास्तीतजास्त १०० जण तसेच खुल्या मैदानातले विवाह समारंभ ५० टक्के क्षमतेने किंवा जास्तीतजास्त २०० जणांच्या उपस्थितीत सुरू होऊ शकतील. प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह मात्र सध्यातरी बंदच राहतील, असे टोपे यांनी सांगितले.
शाळा-महाविद्यालयांना टास्क फोर्सचा विरोध
लहान मुलांचे लसीकरण अद्याप झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत पाठवण्यास कोविडविषयक टास्क फोर्सचा विरोध आहे. याच फोर्सच्या अधिकाऱ्यांची आज रात्री मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. त्यात याबाबतचा अंतीम निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
तिसरी लाट येताच कडक लॉकडाऊन
सध्या आपण तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी करत आहोत. सध्या आपल्याकडे १३०० मेट्रिक टन इतका वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा दरदिवसासाठी उपलब्ध आहे. तो २००० मेट्रिक टनापर्यंत वाढवता येईल. मात्र, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा साठा दुसऱ्या लाटेच्या उच्चतम पातळीच्या दीडपट असावा. त्याचाच अर्थ तो ३५०० मेट्रिक टनापर्यंत असणे गरजेचे आहे. केंद्र सरकारला इतर राज्यांनाही ऑक्सिजन द्यावा लागणार आहे. त्यामुळे इतका ऑक्सिजन उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळेच आम्ही, ज्या दिवशी ७०० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन लागायला सुरूवात होईल तेव्हा राज्यभर कडक लॉकडाऊन जाहीर केला जाईल, असा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे, असे टोपे यांनी सांगितले.