अगरबत्तीमध्ये काही कीटकनाशक रसायने आणि कृत्रिम सुगंधी पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मानवी आरोग्यासाठी, घरातील हवेच्या गुणवत्तेसाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतील, अशी ही किटकनाशके आणइ कृत्रिम सुगंधी पदार्थ आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल अगरबत्तीसाठी बीआयएस अर्थात भारतीय मानक ब्युरोद्वारे विकसित करण्यात आलेले, भारतीय मानक ‘आयएस 19412:2025 – अगरबत्ती’, तपशीलासह जारी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात हे मानक प्रकाशित करण्यात आले. या मानकांमध्ये अगरबत्तीत वापरण्यासाठी प्रतिबंधित पदार्थांची यादी नमूद करण्यात आली आहे.
नवीन अधिसूचित मानकांमध्ये ग्राहकांची सुरक्षितता, घरातील हवेची गुणवत्ता, पर्यावरणीय शाश्वतता आणि नियामक अनुपालन तसेच जागतिक स्तरावर काही सुगंधी संयुगे आणि रसायनांवर असलेले निर्बंध लक्षात घेण्यात आले आहेत. हे मानक अगरबत्तीचे यंत्रनिर्मित, हाताने बनवलेल्या आणि पारंपरिक मसाला अगरबत्ती, असे वर्गीकरण करते. ग्राहकांसाठी सुरक्षित उत्पादने आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अगरबत्तीसाठी वापरलेला कच्चा माल, त्याची ज्वलन गुणवत्ता, सुगंध कार्यक्षमता आणि रासायनिक मापदंड याची आवश्यकताही हे मानक नमूद करते. या मानकांचे पालन करणारी उत्पादने बीआयएस मानक चिन्ह धारण करण्यासाठी पात्र असतील. यामुळे ग्राहकांना विचारपूर्वक तसेच माहितीपूर्ण निवड करता येईल. IS 19412:2025 च्या अधिसूचनेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल, नैतिक आणि शाश्वत उत्पादन पद्धतींना चालना मिळेल, पारंपरिक उपजीविकेचे संरक्षण होईल आणि भारतीय अगरबत्ती उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेत प्रवेश वाढेल अशी अपेक्षा आहे.
भारत हा अगरबत्तीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. या उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे 8,000 कोटी रुपये असून, 150 हून अधिक देशांमध्ये सुमारे 1,200 कोटी रुपयांची निर्यात होते. हे क्षेत्र ग्रामीण आणि निमशहरी भागात, विशेषतः कारागीर, एमएसएमई आणि सूक्ष्म उद्योजकांच्या मोठ्या परिसंस्थेला समर्थन देते आणि विशेषतः महिलांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देते. अगरबत्ती भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा अविभाज्य भाग आहे व घरे, प्रार्थनास्थळे, ध्यान केंद्रे आणि स्वास्थ्य केंद्रांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. योग, ध्यान, अरोमाथेरपी आणि सर्वांगीण स्वास्थ्य यामध्ये जागतिक स्तरावर वाढत्या रूचीमुळे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अगरबत्ती उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

