Homeकल्चर +अतुल पेठे, मनोहर...

अतुल पेठे, मनोहर गोलांबरे यांना ‘ध्यास सन्मान’!

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन विलक्षण कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा ऍड फिजच्या ‘चैत्र चाहूल’ने यंदाही जपली. विनोद आणि महेंद्र पवारांनी गेल्या सोळा वर्षांपासून ही समृद्ध परंपरा जपली असून १७वे ‘ध्यास सन्मान’ वर्ष नुकतेच साजरे केले. ज्येष्ठ प्रयोगशील रंगकर्मी अतुल पेठे यांना ज्येष्ठ भाषा अभ्यासक राजीव जोशी यांच्या हस्ते आणि लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते हे सन्मान प्रदान करण्यात आले. विनायक गवांदे व डॉ. नीना सावंत यावेळी उपस्थित होते. यापूर्वी अरुण काकडे, संजना कपूर, माधुरी पुरंदरे, कांचन सोनटक्के, अरुण होर्णेकर, चंद्रकांत काळे, प्रदीप मुळ्ये अशा अनेक मान्यवरांना हा ध्यास सन्मान मिळाला आहे.

यावेळी अतुल पेठे म्हणाले की, पाण्याने भरलेलं तळं पाहिल्यानंतर माणसाला नैसर्गिकरित्या जितका आनंद होतो तितकाच आनंद मला प्रेक्षकांनी भरलेलं नाट्यगृह पाहिल्यावर होतो. नाट्यगृह किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वजण जाणतोच! रामानंद शाहिरांनी आत्माराम पाटलांचं जे गीत गायलं त्यामध्ये त्यांनी मनुष्याच्या जाती म्हणजे काय? याविषयी सांगितलं. खरं तर इतका जबरदस्त कार्यक्रम झाल्यानंतर अजूनही आपण त्या भावनांनी उद्रेक झालेल्या किंवा भावनोद्दिपीत झालेल्या अवस्थेत आहोत. मी मात्र जरा शांतच बोलणार आहे. कारण प्रायोगिक नाटक म्हणजे आधी नाटक, मग प्रायोगिक नाटक आणि त्यातला अधिक प्रायोगिक नाटक म्हणजेच ‘A minority within a minority’ म्हणजेच अल्पसंख्यांक मधला अल्पसंख्यांक असं आमचं नाटक असेल. कारण प्रायोगिक नाटक काहीतरी वेगळं असतं, ते अधिक कशाचा तरी खोल वेध घेत असतं.

रामानंद शाहिरांनी जे गीत गायले ते इतकं महत्त्वाचं आहे, त्यांनी वर्णन केलेल्या मनुष्याच्या १०८ जाती ऐकता, एका अर्थाने ते माणसांचे केलेले १०८ भेद आहेत. म्हणजे ब्राह्मण आहे, साळी आहे, कोष्टी आहे, माळी आहे… आलाना आहे … फलाना आहे. पण खरी जात ही आहे की माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे, जे आताच्या काळात दुर्लभ झाले आहे किंवा मुद्दामहून दुर्लभ केले जात आहे. सांगण्याचा हेतू आहे की, फक्त परंपरा म्हणजे नुसतं दणादणा वाजवून आपलं भावनांनी उद्दीपित होणं नव्हे. त्या परंपरांमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो. त्याच परंपरा राहतात आणि ज्याला परंपरा माहित आहेत तोच नवतेचा वेध घेऊ शकतो. आमचं नाटक या नवतेचा शोध घेणारं आहे, असेही पेठे म्हणाले.

लोककलावंत, अभ्यासक आणि संगीतकार मनोहर गोलांबरे यांनाही हा पुरस्कार मिळाला. त्यांनी शाहीर आत्माराम पाटील यांचे कवन गायले. त्यामुळे आपली भाषिक आणि राजकीय समृद्ध परंपरा समोर आली. कार्यक्रमात सुरुवातीला जालन्याचे शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांचा ‘महाराष्ट्राची लोकगाणी’ हा लोकसंगीताचा कार्यक्रम सादर झाला. रामानंद यांची गायनातील ऊर्जा आणि त्यासोबत त्यांचा चपखल अभिनय रसिक प्रेक्षकांना मोहित करणारा होता.

या कार्यक्रमाला प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक अरुण होर्णेकर, शफाअत खान, प्रदीप मुळ्ये, निळू दामले, श्रीकांत बोजेवार, रघुनंदन गोखले, प्रमोद पवार, मुकुंद टाकसाळे, अवधूत परळकर, रोहिणी गोविलकर, अरुण कदम, विजय चव्हाण, जयप्रकाश लब्दे, श्याम शिंदे आदींची उपस्थिती होती.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content