Homeन्यूज ॲट अ ग्लांसयाला बसवा खाली.....

याला बसवा खाली.. नंतर निलेश राणे व भास्कर जाधवांमध्ये तूतू-मैमै!

लक्षवेधी सूचनांच्या विषयावरून झालेल्या गदारोळाच्या वेळी आमदार भास्कर जाधव आणि आमदार निलेश राणे यांच्यात तूतू-मैमै झाली. भास्कर जाधव तालिका अध्यक्षांची परवानगी घेऊन बोलत असताना या गदारोळातच राणे यांनी भास्कर जाधव यांना उद्देशून, याला खाली बसवा, असे शब्द उच्चारले. त्यामुळे संतापून भास्कर जाधव यांनी माझा एकेरी उल्लेख कसा केला, अशी विचारणा केली. त्यानंतर राणे यांनी तुझ्यासारखे शंभर बघितले आहेत, असे वाक्य उच्चारले. त्यावर तालिका अध्यक्षपदी असलेल्या योगेश सागर यांनी राणे यांना नाव घेऊन समज देत बजावले की, नव्या सदस्यांनी सभागृहाचा मान कसा राखावा, याचे धडे आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांकडून घ्यावेत.

विधिमंडळाच्या नियमांच्या पुस्तकात दर दिवसाला तीन लक्षवेधी सूचना घ्याव्यात, असं सांगितलेलं असतानाही विधानसभेत ३०-३५ लक्षवेधी कामकाजात दाखवल्या जातात, यावरून सर्वपक्षीय आमदारांनी टीका केली. भारतीय जनता पार्टीचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तर विधान भवन हे नाव बदलून लक्षवेधी भवन करावे, अशी उपहासात्मक सूचनाही केली.

जाधव

विधान भवनात विधानाविषयीचे कामकाज एक टक्का होते आणि बाकी फक्त लक्षवेधी सूचनांवरच चर्चा होते, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली. सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे आमदार असूनही मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जणू काही विरोधी पक्षनेत्याचीच भूमिका बजावली आहे. त्यामुळे माथाडी कामगार कायद्यातील बदल सुचवणाऱ्या विधेयकावर बोलतानाही त्यांनी मंत्री आकाश फुंडकर यांना शालजोडीतले मारणे म्हणजे काय, याचा प्रत्यय दिला. माथाडींच्या संदर्भातील समिती करताना ती अधिकाऱ्यांची करू नका कारण अधिकारी आता आपल्यालाच काय, कुणालाच भीत नाहीत, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, विधान परिषद हे अभंग सभागृह आहे. त्या धर्तीवर आमदारांची अभंग समिती करा, तरच कायद्यात अभिप्रेत बाबी होत आहेत की नाही याची खातरजमा करणे शक्य होईल.

त्याआधी आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात नियमांची ऐशीतैशी केली जात असल्याचा आरोप केला. तातडीची घटना असेल तर लक्षवेधी सूचना मांडली जाते. पण जुन्या किंवा भूतकाळातील घटनांवर लक्षवेधी कशा मांडल्या जातात, असा सवालही त्यांनी केला. नियमांच्या पुस्तकात दिवसाला तीन लक्षवेधी घ्याव्यात, असे सांगितले असतानाही सध्या रोज पंधरा-वीस- पंचवीस अशा संख्येने लक्षवेधी सूचना कामकाजात घेतल्या जात आहेत. ही गोष्ट केवळ सभागृहातील सदस्य आमदारांना खूष करण्यासाठी केली जात आहे, असा आरोप करून जयंत पाटील म्हणाले की, आज तर तीस-पस्तीस लक्षवेधी कामकाजात दाखवण्यात आल्या आहेत. असे असेल तर मग नियम २९३अन्वये असलेली हक्काची चर्चा चार वेळा न घेता ती एका दिवशी घ्यायची, असे प्रकार केले जात आहेत. त्यामुळे नियमांची ऐशीतैशीच आपण करणार असू तर चार-चार तास चर्चांमधे भाग घेऊन उपयोग काय, असा सवालही पाटील यांनी केला.

जाधव

विधानसभेच्या शुक्रवारच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली. क्रमांक एक ते आठ असे सर्व प्रश्न नगरविकास विभागाशी संबंधित असल्याने आणि खात्याचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे किंवा त्यांचे राज्यमंत्रीही सभागृहात नसल्याने अध्यक्षांनी प्रश्न क्रमांक नऊ सभागृहात पुकारले. त्यानंतर सत्ताधारी तसेच विरोधी बाजूच्याही आमदारांनी मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाज तहकूब करावे लागणे, ही नाचक्की समजली जाते. पण, त्याबद्दलही फारशी नाराजी व्यक्त केली गेली नाही आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मंत्री सभागृहात आल्यानंतरही न मिळाल्याने माहिती घेऊन पटलावर ठेवतो, अशी ऐकावी लागली.

Continue reading

शनिशिंगणापूरच्या देवस्थानालाच शनिपीडा…

शनिचा कोप झाला तर भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडते, असे शनिकृपा किंवा शनिकोपावर विश्वास असलेले सांगतात. पण, प्रत्यक्ष शनिवरच शनिपीडा होण्याची वेळ आली तर... प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमधील मंडळींनी सरेआम लूट करत देवस्थानच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे आणि देवस्थानवरच शनिपीडा आणली आहे,...

सुधीरभाऊंचे स्थान मुख्यमंत्री फडणवीसांच्या मनःपटलावर खूप वरचे!

सुधीरभाऊ यांचे स्थान आमच्या मनःपटलावर खूप वरचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्तृत्त्वाच्या योग्यतेची जागा दिली जाईल. नुसतेच भत्ते दिले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टिप्पणी केली की, मुख्यमंत्रीमहोदय तुम्ही...

महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्येच!

राज्यातील २९ महापालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील तर त्याआधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे नगरपरिषदा-नगरपंचायती आणि जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. कोरोना साथीच्या काळापासून राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदती उलटून गेल्यानंतरही झालेल्या...
Skip to content