हास्य अभिनेते आणि महाराष्ट्राची हास्यजत्राफेम कलाकार अरुण कदम जवळपास अडीच दशकानंतर पुन्हा रंगभूमीवर सक्रीय होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून आनंदांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
भद्रकाली प्रॉड्कशन आणि प्रसाद कांबळी निर्मिती `वस्त्रहरण’ या नाटकातून ते पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आले असून या नाटकाचे पहिली तीन प्रयोग हाऊसफुल्ल झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राची लोकधारा, या कार्यक्रमाने त्यांनी महाराष्ट्रातील रसिकांना आपली ओळख करून दिली.
त्यानंतर नटरंग या नाटकाने त्यांना सरी ग सरी, अशी बायको हवी, एकदा पाहवं करून, भटाच्या साक्षीने, पैसाच पैसा, भ्रमाचा भोपळा, बापाचा बाप, प्रतिक्रिया अशी नाटके मिळवून दिली.
काफिला हा त्यांचा हिंदी चित्रपटदेखील गाजला आहे. जुगाड, येरे येरे पैसा, लोणावळा बायपास, हृदयनाथ, घंटा, बाहुलीचे लगीन, धावाधाव, जनता जनार्दन अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. हत्यार, चलो दिल्ली, थँक्स माँ अशा काही हिंदी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने ते घराघरात पोहोचले आहेत. देश-विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. आता ते पुन्हा एकदा रंगमंचावर रसिकांना हसवण्यासाठी येत आहेत.