Saturday, July 6, 2024
Homeहेल्थ इज वेल्थसूरतमधल्या ११ वर्षांच्या...

सूरतमधल्या ११ वर्षांच्या मुलाला केईएममध्ये मिळाले जीवनदान!

निकामी झालेले यकृत.. मूत्रपिंड कार्यरत नसल्‍याने सुरू असलेले डायलिसिस.. त्‍यातच हृदयविकार.. यामुळे जगण्‍याची उमेद गमाविलेल्‍या ११ वर्षीय मुलाला बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या राजे एडवर्ड स्‍मारक (केईएम) रूग्‍णालयामुळे जीवनदान मिळाले आहे. रूग्‍णालयाच्‍या वैद्यकीय चमूने सर्व अडचणींवर मात करत या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्‍त्रक्रिया नुकतीच केली. एव्हढेच नव्‍हे तर, त्‍याच्‍या हृदयात ‘पेसमेकर’देखील बसविले आहे. प्रकृती स्थिर झाल्‍यामुळे या मुलाला नुकतेच घरी सोडण्‍यात आले आहे.

सूरत (गुजरात) येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या ११ वर्षीय मुलास अपस्‍माराचा (फिट) आजार होता. या आजारावर सूरतमध्ये अनेक ठिकाणी उपचार करण्‍यात आले. मात्र, फेब्रुवारीपासून फिट येण्याचे प्रमाण वाढले. औषधांच्‍या विपरित परिणामांमुळे मुलाचे यकृत निकामी झाल्‍याचे निदान झाले. त्यानंतर सूरतमधील डॉक्‍टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्‍ला दिला. तसेच मुंबईच्या केईएम रूग्‍णालयात यकृत प्रत्‍यारोपणाची सुविधा उपलब्‍ध असल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर मुलाच्‍या पालकांनी त्याला उपचारासाठी तातडीने या रूग्‍णालयात धाव घेतली.

केईएम रुग्णालयात पोटविकारतज्ज्ञ (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट) डॉ. आकाश शुक्‍ला यांनी या मुलाची वैद्यकीय तपासणी केली. औषधांच्‍या विपरित परिणामांमुळे मुलाचे यकृत निकामी झाले होते. त्याच्या हृदयाचे ठोकेदेखील नियमितपणे सुरू नव्हते. मूत्रपिंड कार्यरत नसल्‍याने डायलिसिस सुरू होते. अखेरीस, पालकांच्‍या संमतीने सुरूवातीला मुलावर यकृत प्रत्‍यारोपणाची शस्‍त्रक्रिया करण्‍याचा निर्णय डॉ. चेतन कंथारिया यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील वैद्यकीय तज्‍ज्ञांनी घेतला.

ते म्‍हणाले की, शरीरामध्ये हृदय, मेंदू, फुप्फुसे याबरोबरच यकृत हादेखील एक महत्त्वाचा अवयव असतो. यकृत हा पोटातील सर्वात मोठा अवयव आहे. चयापचयाच्या क्रियेमध्ये यकृत अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका करते. ढोबळ मानाने उजवा अर्धा आणि डावा अर्धा असे यकृताचे दोन विभाग असतात. यकृत पूर्णत: निकामी होते तेव्हा यकृत प्रत्यारोपण हीच एक संजीवनी असते. ज्या रुग्णाचे यकृत पूर्णत: निकामी झाले आहे, त्याचे निकामी यकृत काढून टाकून त्या जागी दुसरे यकृत बसविणे म्हणजे यकृत प्रत्यारोपण होय. यासाठी एखाद्या जिवंत, निरोगी व्यक्तीच्या शरीरातील अंशत: काढलेले किंवा मृत व्यक्तीच्या शरीरातून पूर्णत: काढलेले यकृत वापरले जाते. यकृत प्रत्यारोपण ही एक अतिशय गुंतागुंतीची, किचकट आणि महागडी शस्त्रक्रिया आहे.

पालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या विशेष प्रयत्नांतून, या मुलाची अवयव प्रत्यारोपण समितीकडे ‘सुपर अर्जंट’ गटात नावनोंदणी करण्‍यात आली. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात एका ४२ वर्षीय रुग्णाने अवयवदान केले होते. या व्यक्तीचे यकृत केईएम रूग्‍णालयाकडे सुपूर्द करण्‍यास अपोलो रूग्‍णालय व्‍यवस्‍थापनाने मान्‍यता दिली. ‘ग्रीन कॉरिडॉर’ने हे यकृत केईएममध्ये आणण्‍यात आले. वैद्यकीय चमूने मुलाच्‍या निकामी यकृताची शस्त्रक्रिया केली आणि नव्या यकृताचे प्रत्यारोपण केले. ही शस्त्रक्रिया आठ तास चालली. भूलतज्ज्ञ अमला कुडाळकर, डॉ. प्रेरणा श्रॉफ, डॉ. चेतन कंथारिया, एचएन रिलायन्स रुग्णालयामधील डॉ. रवी मोहंका यांनी ही शस्त्रक्रिया केली.

यकृत प्रत्यारोपण झाल्यावर १० दिवसानंतर हृदयरोगतज्‍ज्ञ डॉ. अजय महाजन यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील पथकाने या मुलावर पेसमेकर बसवण्याची शस्त्रक्रिया केली. सर्व विभागांच्या समन्वय आणि अनुभवाने हे प्रत्यारोपण यशस्वी झाले. रुग्णालयाच्या अधिष्‍ठाता डॉ. संगीता रावत म्‍हणाल्‍या की, अवघ्या ११ वर्षीय मुलावर यकृत प्रत्‍यारोपण करणे अत्यंत आव्हानात्मक होते. अल्‍पवयीन मुलामध्ये यकृत प्रत्यारोपण करणे जोखमीचे होते; परंतु ते आव्हान पेलून डॉक्टरांनी त्‍याला जीवनदान दिले. वैद्यकीय पथकाने यकृत प्रत्यारोपण, पेसमेकर बसविण्‍याची लागोपाठ शस्‍त्रक्रिया यशस्‍वी केली, ही आनंदाची आणि वैद्यकीयदृष्ट्या अभिमानाची बाब आहे. या मुलाला नुकतेच घरी सोडण्‍यात आल्‍याचेही डॉ. रावत यांनी नमूद केले. 

Continue reading

आता भटक्या-विमुक्तांना स्वयंघोषणापत्रावर मिळणार शिधापत्रिका

भटके आणि विमुक्तांना ओळखपत्र वा वास्तव्याचा पुरावा नसला तरी त्यांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासननिर्णयदेखील निर्गमित करण्यात आला आहे. कोणतेही कागदपत्र व आधारकार्ड उपलब्ध नसल्यास अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र भरुन घेण्यात येणार असून त्याआधारे त्यांना शिधापत्रिका देण्यात...

क्रिकेटरसिक गेल्यानंतर मरीन ड्राइव्हवर सापडले ५ जीपभर जोडे

टी-२० क्रिकेट विश्वचषकविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्हवर उसळलेल्या जनसागरानंतर गुरूवारी रात्रभर मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत तब्बल पाच जीप भरून चप्पल-बूट तसेच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्यात आल्याचे वृत्त आहे. पालिकेच्या ए विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सुमारे...

आनंद घ्या नंदिनी वर्माच्या ‘फ्लो ऑफ लाईफ’चा!

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईच्या काळाघोडा येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. 'फ्लो ऑफ लाईफ' हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत खुले राहणार आहे.
error: Content is protected !!