Saturday, December 21, 2024
Homeमाय व्हॉईसएकनाथरावांच्या पांढऱ्या कपड्यांना...

एकनाथरावांच्या पांढऱ्या कपड्यांना अजितदादांची गुलाबी किनार!

गेल्या काही दिवसांपासून ‘गुलाबी’ उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून लांब राहत आहेत. त्यांची ही दूरी नेमके काय सुचवते आणि त्यातून दादा साध्य तरी काय करणार हे अनेकांना पडलेले कोडे आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवात मुंबईत आले. लालबागच्या राजाचे दर्शन त्यांनी घेतले. पण अजितदादा त्यांच्यासोबत फिरलेच नाहीत. ते आपले त्यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमातच दंग होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही जोडी शाह यांच्या दिमतीला होती. बरे, दादांना लालबागच्या राजाला जायचे नव्हते असेही नाही. अगदी अखेरच्या दिवशी मुंबईत गणेशदर्शनाच्या मोहिमेची सुरूवात दादांनी लालबागच्या राजाच्या दर्शनानेच केली. राजाचे दर्शन घ्यायचेच होते तर मग अमित शाहंच्या बरोबर घेतले असते तरी चालले असते. पण त्यांनी तसे केले नाही. मुंबईतच कोस्टल रोडचा वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा टप्पा नुकताच कार्यान्वित झाला. या लोकार्पणाच्या कार्यक्रमालाही दादांनी दांडी मारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडला. एकंदर पाहिले तर सरकारमध्ये राहून सहकारी मित्रपक्षांच्या नेत्यांपासून लांब राहणे हा एकमेव फंडा अजितदादांनी सध्या स्वीकारला आहे.

दादांना या निवडणुकीत खरे आव्हान आहे ते त्यांच्या काकांकडून, म्हणजेच शरद पवारांकडून. लोकसभा निवडणुकीत काकांनी बाजी मारल्यानंतर दादांचे दुसऱ्या फळीतले अनेक मोहरे काकांच्या गळाला लागत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, दादांकडून ही गळती थोपविण्यासाठी कोणतेही जाहीर प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच मग प्रश्न पडतो तो दादांच्या मनात नेमके आहे काय? राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद राज्यातल्या काही ठराविक भागातच आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे याच भागावर खास लक्ष आहे. आणि याच भागात काका पुतण्याला एकापाठोपाठ राजकीय हादरे देत आहेत. अशावेळी अजितदादा मात्र अत्यंत संयम राखत आपले पूर्वनियोजित कार्यक्रम करत आहेत. जनसन्मान यात्रा करत आहेत. जाहीर सभा घेत आहेत.

अजित

अजितदादांच्या विविध सभांमधून गुलाबी रंगाची उधळण होत असताना जशी दिसते तशी महाराष्ट्र शासनाने जनसामान्यांकरीता राबविलेल्या विविध योजनांची यादीही ठळकपणे लावण्यात येते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना. महिलांना दरमहा दीड हजार रूपये देण्याची ही योजना. जनतेचे, खासकरून महिलांचे जसे भले करणारी ही योजना, तसेच विधानसभा निवडणुकीत महायुतीचे भले करू शकणारी ही योजना. त्यामुळेच सत्तेतले तीनही मोठे पक्ष याचे क्रेडिट आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात दिसतात. याची सुरूवातही दादांनीच केली. त्यांनी या योजनेच्या नावातला मुख्यमंत्री, हा शब्दच काढून टाकला. इतकेच नव्हे तर दादांच्या विविध सभांच्या वेळी लागणाऱ्या बॅनरमधून ही फक्त राष्ट्रवादीचीच योजना असल्याचा आभास निर्माण करण्यात येतो. याही पलीकडे अनेक बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रेही दिसत नाहीत. दादांच्या या भूमिकेनंतर शिवसेना तसेच भाजपाकडून तशाच स्वरूपाचे उत्तर देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या बॅनरवरून अजितदादांचा फोटो गायब करण्यात आला आहे तर भाजपाकडूनही फक्त देवाभाऊंनाच प्रोजेक्ट केले जाऊ लागले आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते, दुसऱ्या फळीतले नेते परस्परांवर टीका करण्याचे प्रमाणही हल्ली वाढले आहे. त्यामुळे महायुतीतल्या सहकाऱ्यांपासून अंतर राखणारे विधानसभा निवडणुकीत एकला चलो रे.. तर करणार नाहीत ना, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडू लागला आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यात दादांच्या दुराव्याबद्दल त्यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी दादा नाराज नसल्याचे आवर्जून सांगितले. दादांच्या गुलाबी आऊटफिटबद्दल विचारले असता मला गुलाबी रंगापेक्षा पांढरा रंग जास्त आवडतो. त्यामुळे मी पांढऱ्या रंगाचेच कपडे वापरतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. पांढरा रंग कशातही मिसळतो आणि दुसऱ्या रंगाला फेंटही करतो. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याचा टोन दादांवर कुरघोडी करणारा होता. त्यामुळेच काही माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना गुलाबी रंग पसंत नसल्याच्या बातम्या रंगवल्या. याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला आणि निवडून येण्याची शक्यता जास्त असे सूत्र जागावाटपात असेल, असे सांगितल्याने विधानसभा निवडणुकीत शिवसेना जास्त जागा मागणार अशी शक्यताही दिसू लागली आहे, कारण लोकसभा निवडणुकीत भाजपापेक्षा शिवसेनाच स्ट्राईकरेटमध्ये अव्वल होती.

अजित

याच गणेशोत्सवात मुंबईकडे पाठ करत पुण्यातल्या गणपतींचे दर्शन व आरती करण्यात गुंग झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सव संपतासंपता अचानक मुंबईचा रस्ता धरला. ते थेट लालबागच्या राजासमोर अवतरले. राजाच्या दर्शनानंतर चिंतामणी व इतर काही गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाचेही दर्शन घेतले. याच दर्शनयात्रेत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे वर्षा, हे शासकीय निवासस्थान ओलांडत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर, या शासकीय निवासस्थानी जात त्यांच्या बाप्पाचे दर्शनही घेतले. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षावरील गणपतीचे दर्शन घेणे त्यांनी टाळले. यावरून दादांना काय दाखवून द्यायचे होते हे त्यांना आणि शिंदेंनाच कळले. पण आपण आणि फडणवीस यांच्यात कोणताही दुरावा नाही हे त्यांनी प्रामुख्याने जनतेला दाखवून दिले.

याच दौऱ्यात त्यांना माध्यमांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी गुलाबी रंगाबद्दल केलेल्या टिपण्णीबद्दल विचारले. योगायोगाने गणेशदर्शनासाठी निघालेल्या दादांनी पांढराशुभ्र पायजमा-कुर्ता परिधान केला होता. तेव्हा हसतहसत दादाही उत्तरले- स्वच्छ, पांढराशुभ्र रंग केव्हाही चांगलाच. मीही घातलाय बघा.. दादांचे हे म्हणणे जरी मिश्किल वाटत असले तरी मुख्यमंत्र्यांबरोबरही आपण जुळवूनच घेत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. इतकेच नव्हे तर एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वाखाली आम्ही विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यामुळे काहीशी गोची झाली असली तरी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर फडणवीस यांनीच पुढच्या निवडणुका आम्ही शिंदे साहेबांच्याच नेतृत्त्वाखाली लढणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु एकदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेले फडणवीस यांचे पुन्हा त्या खुर्चीकडे लक्ष असणारच. अशा स्थितीत दादांनी केलेली त्यांची पंचाईत फडणवीसांना नक्कीच अडचणीची ठरणार. शिंदेच्या पांढऱ्या कपड्यांना दादांनी दिलेली ही गुलाबी किनार भाजपाला चांगलीच झोंबणार हे नक्की!

अजित

Continue reading

एकनाथ शिंदेंचा भाजपाने केला ‘करेक्ट कार्यक्रम’?

नाकापेक्षा मोती जड.. चाय से किटली गरम.. अशा काही म्हणी माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. त्यातलीच एक म्हण काल शिवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठवली असावी. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही इथपासून उपमुख्यमंत्रीपद...

विनोद तावडेंचे प्रयत्न फेल, फडणवीसच मुख्यमंत्री! पंकजाही बाहेर!!

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांच्या प्रयत्नांनंतरही महाराष्ट्रात मराठा चेहरा डावलून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्त्वाने मान्यता दिली. उद्याच्या शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री म्हणून सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

एकनाथ शिंदेंचे सरेंडर? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि मिळालेल्या पाशवी बहुमतानंतरही महायुतीला तब्बल आठ दिवस सरकार बनवता आले नाही ते केवळ मावळते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच! मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृह खात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीपुढे सपशेल...
Skip to content