Homeमाय व्हॉईसआज गरज आहे...

आज गरज आहे मृणालताईंच्या आंदोलनाची!

गेल्या 10/15 वर्षांत दैनंदिन जीवनातील सर्वच जीवनावश्यक वस्तूंची इतकी जबरदस्त भाववाढ झाली आहे की, गरीब आणि मध्यमवर्गाचे कंबरडेच मोडले आहे. अशा या महागाईच्या काळात मृणालताई गोरे यांच्या महागाईविरोधी लढ्याची आठवण होणे साहजिकच आहे. शिधापत्रिकेवर एखादा जिन्नस मिळत नसे तेव्हा महागाईविरोधी लढ्याच्या महिला मुंबई, ठाणे आदी परिसर दणाणून सोडत असत. आता तर कधी नव्हे इतकी महागाईविरोधी लढ्याची गरज भासू लागली आहे. पण, दुर्दैवाने तशी हिम्मत दाखवण्याची रग कुणात राहिलेली नाही..

गेल्या वर्ष-सव्वा वर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय जनता कसे जीवन ढकलत आहे हे त्यांनाच बापुडे माहीत.. कोरोना काळात अनेकजण घरीच बसले आहेत. काहींना अर्धा पगार देतात. काहींना वाट पाहण्यास सांगितले आहे. तर अनेकांना महिन्याच्या 15 तारखेपर्यंत कधीतरी पगार मिळतो.. तोही तुटपुंजा!

कोरोना काळात शिधापत्रिकेवर तांदूळ आणि गहू जादा प्रमाणात देण्यात येत असले तरी या शिधेबरोबर इतरही जिन्नस लागतात. आणि ते मिळाल्याशिवाय अन्न तयार होत नाही. कोरोना काळात आतापर्यंत केवळ दोन वेळाच डाळी पुरवण्यात आल्या आहेत. त्यानंतर रेशन दुकानांतून डाळी हद्दपार झाल्या. त्या आजतागायत कोणी पहिल्याच नाही. तीच गोष्ट साखरेची.. गेल्या अनेक वर्षांपासून शिधापत्रिकेवर साखर देणे बंद केले गेले आहे. साखर का बंद करण्यात आली हे मात्र कुठलेच सरकार स्पष्ट करत नाही.

पूर्वी निळ्या रंगाचे घसलेटही कुटुंबामागे देण्यात येत असे. काही वर्षांपूर्वी पाम तेलही मिळत असे. हळूहळू तांदूळ आणि गहू सोडून इतर जिन्नस कधी गायब झाले ते आता सरकारलाही सांगता येणार नाही.

“जनतेच्या पोटामध्ये आग आहे.. आग आहे..

जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे..

जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे..

जनतेच्या हातामध्ये भविष्याची भेट आहे..

जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे..

जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे..”

कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांच्या या ओळी आठवल्या आणि मुठी वळवण्यासाठी आजूबाजूला कोणी विश्वासू व्यक्ती नसल्याची खंत कधी नव्हे इतकी होते.

आज सरकार सांगेल की आम्ही गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. सत्य आहे. परंतु शिवभोजन काही ठराविक ठिकाणीच उपलब्ध होते. एका घरातील तीन-चार जणांना तेथपर्यंत काय चालत घेऊन जाणार? बसने गेले तर 15/20 रुपये एका वेळेस खर्च होणार.  इतका खर्च हाताला काही काम नसताना परवडेल का? याचा साधा विचारही सरकारी अधिकारी करत नाहीत. घासलेटचे दरही खुल्या बाजारात 70/80 रुपये प्रति लिटर आहे. शिधापत्रिकेवर ते सवलतीच्या दरात देता येईल.

कोरोना काळात सर्वांचीच आबाळ होत असल्याने कुपोषणही वाढले असल्याचा बातम्या विविध ठिकाणांहून येत आहेत. कुपोषणाप्रमाणेच मध्यमवर्गात हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी होत असल्याचे डॉक्टरवर्गाचे म्हणणे आहे. यासाठी रोजच्या जेवणात प्रथिने असण्याची गरज आहे. आणि ही प्रथिने डाळी आणि कडधान्ये यात सहज उपलब्ध असतात. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने आपापले राजकीय अहंगंड बाजूला ठेवून रेशनवर गहू, तांदुळाबरोबर साखर, आलटूनपालटून डाळी, कडधान्ये, घासलेट आणि पाम तेल देण्यास तातडीने सुरुवात करावी. यासाठी बैठकांचे गुऱ्हाळ नको. अन्यथा प्रत्येक गोष्टीसाठी मार्ग हा निघतोच! तो जनतेने काढण्यापेक्षा सरकारने काढलेला केव्हाही चांगला!!

Continue reading

ठाणे परिसरात दिसतोय ‘उडता पंजाब’!

ठाणे पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांविरुद्ध मोहिमा राबवून कित्येक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत असले तरी अंमली पदार्थांच्या व्यापाराचा 'आका' त्यांना अद्यापी मिळालेला नाही. ठाणे रेल्वेस्थानक परिसरात (पूर्व + पश्चिम) हे गर्दुल्ले ठाण मांडून बसलेले दिसत...

गुजरात विकासाचे असेही ‘विकसित वास्तव (मॉडेल)’!

मुंबईसारखीच परिस्थिती ठाणे शहर व आसपासच्या परिसराची झाली आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये! ती परिस्थिती म्हणजे परप्रांतीयांची घुसखोरी! हल्लीच्या भाषेत परप्रांतीय व स्थलांतरित या शब्दांना 'ग्लोबल' वेष्टन लावून विकण्याची पद्धत आहे. पण जे हे ग्लोबल लेबल...

उपायुक्त पाटोळेवरच्या धाडीनंतर झाली ‘मांडवली’?

दसऱ्याच्या आदल्यादिवशी जोरशोरसे सांगून ५० लाख रुपयांच्या लाचेच्या आरोपाखाली ठाण्याचे पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांना केलेली अटक वा कारवाई ही एक 'फार्स' ठरणार असल्याची माहिती काल सुमारे दोन-अडीच तास ठाणे महापालिका मुख्यालयात फेरफटका मारला असता हाती आली. तक्रारदार मुलुंड...
Skip to content