Homeमाय व्हॉईसआदित्य ठाकरेंचे तोंड...

आदित्य ठाकरेंचे तोंड उघडून अवलक्षण!

हात दाखवून अवलक्षण… आणि मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार लागतंय म्हणणं… या दोन्ही मराठी म्हणींची आठवण आज, मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कामकाजाच्या वेळी झाली. रस्ते अपघातांच्या प्रश्नावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवराज आदित्य ठाकरे यांनी आपल्या नवखेपणाचा प्रत्यय दिला आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडलेल्या प्रश्नांचीच पुनरावृत्ती केली. पण, उत्तर देत असलेले राज्यमंत्री शंभूराज देसाई बाळासाहेबांच्या शिवसेनेचे असल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांना चोख उत्तर देत त्यांच्यावर अनवस्था प्रसंग भर सभागृहात आणला आणि त्यांच्यावर तोंड उघडून अवलक्षण, अशी वेळ आली.

रस्त्यांना खड्डे पडतात, या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई-सूरत रस्त्यावरून मध्ये काही माणसे पळून गेली. त्या रस्त्याचेही काम केले पाहिजे… वेळ पडली तर या रस्त्याने त्यांना पुढे गुवाहटीलाही जाता येईल…

शिवसेनेत झालेले बंड, ४० आमदारांना घेऊन बाहेर पडत एकनाथ शिन्दे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडले, हा ताजा इतिहास. यामुळे या प्रश्नाला राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने उत्तर देत सांगितले की, आमदार आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई-सूरत रस्त्याची चांगलीच धास्ती घेतलेली दिसतेय. त्यांनी त्यांच्याबरोबर उरलेल्या आमदारांवर या सूरत रस्त्याचा वापर करायची वेळ आणू नये….

शंभूराज देसाई यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर गुगलीच टाकला. मंत्रिमहोदय शंभूराज देसाई यांना उद्देशून ते म्हणाले की, मंत्रिमहोदय आपण ज्येष्ठ आहात. आदित्यजी बोलले तर उत्तर द्यायची काय गरज आहे…. तेवढ्यात संतप्त आविर्भावात मंत्री गुलाबराव पाटील उठले आणि त्यांनी प्रतिप्रश्न केला की, त्यांनी प्रश्नामध्ये सूरत, गुवाहटी कशाला आणले… गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत टिप्पणी केली की, गेले ना.. आता सगळे, संपलाय विषय तुमचा!

आदित्य

आदित्य ठाकरेंनीच आणलेय मुंबई महापालिकेला अडचणीत…

रस्त्यांवरील अपघाताच्या लक्षवेधी सूचनेवरून आदित्य ठाकरे अडचणीत आल्यानंतर त्यांनी अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा स्वतःच्याच पक्षाला अडचणीत आणलं. तीन-चार सूचना करतो, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी काही सूचना केल्या आणि सूचना संपवताना या सर्व कामांमध्ये, सिमेंट-डांबर यामध्ये काही घोटाळा होणार नाही, हेही बघा, अशी टिप्पणी केली.

त्यांच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. आयआयटी आणि व्हीजेटीआयसारख्या संस्थांचे अहवाल, त्यातले मुद्दे यांची माहितीही ठाकरे यांनी दिली होती. तसेच रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील जमिनींमुळे निर्माण होणारे प्रश्न, याचाही त्यांनी उल्लेख केला होता. तो धागा पकडून आशिष शेलार यांनी ठाकरे यांनी नवे काहीही मांडलेले नाही, असे सांगितले. मुंबई महापालिकेला हे अहवाल दिलेले आहेत आणि चौकशी करायचीच असेल तर गेल्या २५ वर्षांत झालेल्या विविध कामांतील डांबर-सिमेंट घोटाळ्याची केली जावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत जोरदारपणे केली. त्यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाची गेली अनेक वर्षे सत्ता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सिमेंट-डांबराबद्दल केलेल्या अनावश्यक टिप्पणीमुळे आज भाजपाला नव्याने मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करण्याची संधी विधानसभेत मिळाली.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content