Sunday, September 8, 2024
Homeमाय व्हॉईससीमाताईंना अखेरचा निरोप!

सीमाताईंना अखेरचा निरोप!

काही मृत्यू विलक्षण पेचात टाकतात. ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली याचं दुःख मानायचं की ती यातनाचक्रातून सुटली याचा आनंद मानायचा हेच कळत नाही. सीमा देव, सीमाताईंचा मृत्यू तसा आहे.

२०१९ साली व्यास क्रिएशन्सच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाला त्या शेवटच्या भेटल्या. तेव्हाही त्यांची तब्येत चांगली नव्हती आणि मानसिक स्थिती तर फारच खराब असल्याचं लक्षात आलं होतं. त्याच आठवड्यात अजिंक्यने सीमाताईंना अल्झायमर झाला असल्याचे जाहीर केले आणि मग त्यानंतर त्यांना भेटणे अशक्य झाले. त्यांची अवस्था वाईट होती. ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं त्या रमेश देव यांच्या निधनाची बातमीसुद्धा त्यांच्या मनापर्यंत पोहोचू शकली नाही, इतकी दुर्दैवी होती. पण तरीही त्या आहेत हा दिलासा होता. या रोगातून त्या बऱ्या होणार नाहीत हेही माहीत होतं… पण तरीही वेडी आशा असतेच ना… ती काल संपली!

सीमाताई दिगंताच्या प्रवासाला निघून गेल्या.

२०१६ साली आम्ही मैत्रेय प्रकाशनामार्फत त्यांच्या सुवासिनी या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती काढली. त्यानिमित्ताने साधारण २०१४मध्ये त्यांची माझी ओळख झाली. पुस्तकाच्या निमित्ताने गाठीभेटी होतच होत्या. पण त्या मनाने इतक्या निर्मळ होत्या आणि लहान मुलासारख्या इतक्या उत्साही होत्या की त्यांच्याशी मैत्री जमायला वेळ लागला नाही. त्यांच्या रूपात मला एक मातृवत मैत्रीण लाभली. एवढ्या मोठ्या अभिनेत्री होत्या… वयाने माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, पण मैत्रिणीपाशी सगळं शेअर करावं तसं त्या करायच्या. त्यांना असलेल्या ग्लॅमरचा जराही अंश त्यांच्या वागण्यात नव्हता.

उत्तम अभिनेत्री म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण त्या व्यतिरिक्तही इतर अनेक कलांचा वरदहस्त त्यांना लाभला होता. या सगळ्याबाबतच त्या खूप उत्साहाने बोलायच्या. एवढ्या मोठ्या अभिनेत्री असतानाही त्या संगीतकार गोविंद पोवळे यांच्याकडे विधिवत परीक्षा देऊन तब्बल चार वर्षे गाणे शिकल्या. त्यांचं गाणं ऐकायचं भाग्य मला लाभलं.

त्या उत्तम चित्रकार होत्या. संगीताप्रमाणेच लहानपणापासून त्यांना चित्रकलेची हौस होती. पण आधी परिस्थितीमुळे आणि नंतर कामामुळे त्यांना ते शिकता आलं नव्हतं. त्यामुळे चित्रपटातलं काम सोडल्यावर संगीताप्रमाणेच त्या चित्रकलेकडे वळल्या. त्यांना पवार नावाचे एक शिक्षक लाभले. त्यांच्याकडून चित्रकलेची बेसिक लाईन शिकण्यापासून सगळं त्यांनी एखाद्या आदर्श विद्यार्थिनीप्रमाणे केलं. त्यांची उत्तम पेंटिंग्स त्यांच्या घरात लावलेली बघायला मिळतात. त्यांच्या बेडरूममध्ये असलेलं संध्याकाळी घरी निघालेल्या गाडीवानाचं पेंटिंग तर अप्रतिम आहे. विशेष म्हणजे त्यांनी डांबर वापरून एक थ्रीडी पेंटिंगसुद्धा केलं होतं. डांबर लगेच वाळतं. त्यामुळे हे जिकिरीचं काम होतं. पण सीमाताईंनी ते केलं.

मात्र त्यांची एक गंमत होती. एखादी गोष्ट शिकायचा, नवीन काही करून बघायचा त्यांना जेवढा उत्साह असायचा, तेवढाच ती गोष्ट जमायला लागल्यावर करण्याचा कंटाळासुद्धा असायचा… मला त्या लहान मुलासारख्या वाटायच्या ते त्याचमुळे… पेंटिंगसुद्धा जमायला लागलं म्हटल्यावर त्यांनी ते सोडून दिलं…

तसंच त्यांना लिखाणाची खूप हौस होती. त्यांच्याकडे सांगण्यासारखं पण खूप होतं. पण लिखाणाचा सराव नसल्याने ते लिहायचं कसं हे त्यांना कळायचं नाही. मग त्या विचारायच्या आणि ‘हे असं असं लिहा’ असं त्यांना सांगितलं की त्या उत्साहात तसे लिहून काढायच्या. त्यांनी एक वही केली होती. त्यात त्यांचं हे सगळं लिखाण चालायचं. उत्तम लिहायच्या. अगदी लहान मुलासारख्या होत्या. त्यांना लिखाणाची दिशा मिळाली आणि लिहिता आलं की खूप आनंद व्हायचा. त्यांच्या आयुष्यात आलेल्या राजा परांजपेंपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सगळ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांबद्दल त्यांनी लिहावं असा माझा आग्रह होता. त्यांनी ते काम सुरू पण केलं होतं. पण ते पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही.

त्यांच्या अनेक आठवणींनी आज मनात गर्दी केली आहे. त्यांना नंतरच्या काळात भेटता न आल्याची खंतही खूप जाणवत आहे… आता ती खंत आणि त्यांच्या आठवणी हेच घेऊन जगायचं!

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Continue reading

वो भूली दास्तां.. लो फिर याद आ गयी…

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कालच वाढदिवस झाला. खरं तर दुर्दैवाने आता वाढदिवस म्हणता येणार नाही; कारण शरीराने त्या आपल्यात नाहीत. म्हणून जयंती म्हणायचं... बाकी त्यांच्या सुरांच्या / आठवणींच्या रूपात त्या आपल्याचबरोबर आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी रोजच मनात पिंगा घालतात....

जिव्हाळ्याची बेटं?

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई गेल्यानंतर लिहिलेला माझा लेख खूप व्हायरल झाला. प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक ग्रुपमध्ये त्यावर चर्चा झाल्या. कोणी त्याचं अभिवाचन केलं व स्वतःच्या म्हणण्यासकट त्यांच्या त्यांच्या ग्रुप वर टाकलं.... एकूण यानिमित्ताने जे विचारमंथन झालं किंवा सुरू झालं...

ग्लॅमर मागचा अंधार…. हास्यामागची उदासी…..

ग्लॅमर मागचा अंधार.... हास्यामागची उदासी..... एकाकी मृत्यू..... गेल्या काही काळातल्या वेगवेगळ्या नामवंतांच्या बातम्या बघितल्या तर हेच लक्षात येतं.... कारणं वेगवेगळी असतील पण एकाकीपणा... उदासी... वैफल्य या काही गोष्टी यात समान दिसतात.... ती व्यक्ती आपल्या किती जवळची होती.... आपला कसा मित्र होती हे सांगणारे आणि...
error: Content is protected !!
Skip to content