सिंगापूरस्थित मराठी साहित्यिका मोहना कारखानीस यांच्या ‘टेक ऑफ’ (कथासंग्रह), ‘चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’ (लेखसंग्रह)) आणि `चंद्रकळा’ (कवितासंग्रह) या पुस्तकांवर आधारित ‘पुस्तकावर बोलू काही’ हा परिसंवाद मुंबईतल्या कांदिवलीत मान्यवर साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत नुकताच रंगला. त्यांचे साहित्य हे सहज हळूवार भावविश्वांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यातून समाजमनाला त्या आपल्या जाणीवांचा प्रत्यय देत असतात, असा सूर यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

परिसंवादात साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर देवेंद्र भुजबळ, गौरी कुलकर्णी, कोमसाप अध्यक्षा नमिता कीर, अशोक मुळे (डिंपल प्रकाशन), लता गुठे (भरारी प्रकाशन) यांनी भाग घेतला. यावेळी त्यांच्या ‘टेक ऑफ’ कथेचे अभिवाचन गौरी कुलकर्णी यांनी केले. यानंतरच्या सत्रात ‘गोवा आणि मराठी साहित्य’ या विषयावर प्रिया बापट यांनी आपले विचार व्यक्त केले. अखेरच्या सत्रात निमंत्रित कवयित्रींचे काव्यवाचन झाले. यात गौरी कुलकर्णी, हेमांगी नेरकर, प्रतिभा सराफ, संगीता अरबुने, लता गुठे, ज्योती कपिले, फरझाना इक्बाल, मेघना साने, कविता मोरवणकर यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे निवेदन अश्विनी भोईर यांनी केले.

मोहना कारखानीस यांची तिन्ही पुस्तके यापूर्वी सिंगापूर येथे साहित्यव्रती आशा बगे यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहेत.


