Homeन्यूज अँड व्ह्यूजतीन हात नाक्यावर...

तीन हात नाक्यावर बेस्ट चालक-वाहकाचा ‘मोला’चा विचार!

स्थळ- तीन हात नाका, ठाणे शहरातला एक प्रमुख मोठा चौक! जवळजवळ दिवसाचे २४ तास गजबजलेला!! नाताळाच्या आदल्या दिवशी गर्दीत जरा वाढच (गाड्यांच्या हो…). आकाशातल्या मायबापाला विनवण्यासाठी जणू सर्वांचीच धडपड! लाल बहाद्दूर शास्त्री मार्गाजवळील सिग्नलजवळ एक म्हातारबुवा चबुतऱ्याच्या आधाराने उभा आहे. रस्ता ओलांडायच्या प्रतीक्षेत आहे. पण चाहूबाजूंनी येणाऱ्या भरधाव गाड्यांनी त्या म्हातारबुवांचं मन विचलित होतंय असं मला दिसत होतं. कारण मीही त्यांच्याच समांतर रेषेत म्हटलं तर दूर, म्हटलं तर जवळ असं आडनाड्या हिशेबात उभा होतो. मलाही रस्ता ओलांडायचा होता.

तसा मी बराचसा निशाचरच! ठाणे काय, मुंबई काय? ही शहरे जवळून पाहायची असतील तर रात्रीशिवाय पर्याय नाही! सर्व गल्ल्या व बऱ्याचदा मोठे रस्तेही मनाप्रमाणे ‘नजरेखालून’ घालता येतात! पदपथावर कुठे दगड ठेवून कोण उद्या सकाळसाठी जागा ‘अडवून’ गेला आहे तेही समजते. मात्र, बराच धीर धरण्याची आणि समोरच्याला ‘कटिंग’ देण्याची दानत असावी लागते. कधीकधी ‘बिडी’ही द्यावी लागते. हे सर्व पुन्हा कधीतरी.. आधी त्या विचलित झालेल्या म्हातारबुवांची चौकशी करूया. दोन-तीन मिनिटांतच गाड्यांचा अंदाज घेत मीही म्हातारबुवांच्या जवळ गेलो. इतक्या रात्री कुठून? सहज प्रश्न गेला. शीववरून येतोय. ४९१ नंबरच्या बसने! पण मग इथे कुठे? नाही हो, बस तीन हात नाक्यापर्यंत होती. अरे मग बसथांबा तर सिग्नलनंतरच आहे. मध्ये कुठे उतरलात? बुवा या प्रश्नांची वाटच पहात होते. उसळून ते म्हणाले- बसच्या चालक-वाहकांनी येथेच उतरून घ्या, थांब्यापर्यन्त गेलो तर बस वळवण्यासाठी थेट कॅडबरी चौकपर्यंत गाडी न्यावी लागेल. (डिझेल किंवा वीज वाचवण्यासाठी किती ‘मोलाचा’ विचार)…

तीन हात

बुवा बोलतच होते- खरंतर बसमध्ये आम्ही १५/२० प्रवासी होतो. बस बाळकूम दिशेकडे जाणाऱ्या सिग्नलला थांबली होती. याचा गैरफायदा घेत चालकाने ‘चला आता येथेच उतरून घ्या, थांब्यावर बस जाणार नाही. येथेच आम्ही वळवणार व माघारी जाणार’ असे वरच्या पट्टीत सांगितले. म्हातारबुवा म्हणाले की बस तर तीन हात नाका, थांब्यापर्यंत आहे ना? तेथे सोडा, महिलांवर्ग व ज्येष्ठ नागरिक रस्ता कसा ओलांडतील? ते मी कसं सांगू? उलट जबाब… अहो येथे मागूनही बाईक्स व रिक्षा येत असतात, सांगण्याचा निष्फळ प्रयत्न.. बघा सर्व उतरून गेलेही, तुमचेच नखरे… चला लवकर उतरा… फर्मानच सुटले म्हणा ना! मुकाट्याने खाली उतरलो.. रखडत रखडत.. कारण, गाड्यांचे प्रखर दिवे व बाईक्स कधी पायावरून जातील याचा नेम नसल्याने अधिक सावध! दहा मिनिटे झाली. काही सुधरत नव्हते, म्हणून स्वस्थ उभा होतो. तोच तुम्ही आलात. तुम्हीही ‘आजोबा’च दिसताय! (माझी विकेट गेलीच). मला सवय आहे हो.. रात्री-बेरात्री फिरायची. माझी काळजी करू नका. चला आपण दोघे मिळून रस्ता ओलांडू!

रस्ता ओलांडून बुवांना बसथांब्यापर्यंत सोडले. पण अनेक प्रश्न बेस्ट प्रशासनासाठी मनात आले. प्रवासी बसमध्ये असताना केवळ बस सिग्नल नाही म्हणून थांबली असताना प्रवाशांना उतरवणे वाहक-चालकाला शोभते का? बेस्ट परिवहनाच्या कोणत्या नियमात हे बसते, याचा खुलासा बेस्ट प्रशासन किंवा मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी करणे गरजेचे आहे. बेस्ट परिवहन हा महापालिकेच्या अख्त्यारीत येत असल्याने त्यांनीच याप्रकरणी काही कारवाई करावी. कारवाई अशासाठी हवीय की कुणीही कुणाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये तसेच नियमांचे पालन करावे. जशी अपेक्षा प्रवाशांकडून केली जाते, तीच नियमावली कर्मचाऱ्यांनाही लावावी. सुमारे ८० वर्षांच्या म्हातारबुवांना आम्ही भेटलो. असे नशीब सर्वांचेच थोडे असणार आहे. उद्या आम्हाला कोण भेटले तर बरे…

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पंकजराव, ठाणेकरांना असते शिस्तीचे कायम वावडे!

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण,...

महाराष्ट्रात या दोन ‘घंटागाडयां’ना घेऊन किती काळ फिरू?

अर्थविषयक घडामोडीच्या मागोवा घेणाऱ्या आघाडीचे वर्तमानपत्र इकोनॉमिक टाईम्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंकात भाजप आणि राज्यात आघाडी वा युती केलेल्या तीन राज्यांचा धावता आढावा घेतलेला आहे. भाजप आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम, महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर...

३ महिने झाले तरी फिर्यादीचा पत्ता नाही, आरोपी मात्र ‘चक्की पिसिंग..’!

पोलीस आणि गुन्हेगारी जगताविषयी वाचलेले एक वचन आठवले "Police are here to create disorder, they are here to preserve disorder" समाजात शांतता राखण्याचे काम जसं पोलीस करतात तसंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त वेळा पोलिसी अन्यायाच्या कथाच वर्तमानपत्रातून वाचायला मिळत असतात....
Skip to content