भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने समुद्रात एका समन्वित अभियानाद्वारे 3300 किलो प्रतिबंधित (3089 किलोग्रॅम चरस, 158 किलोग्रॅम मिथाॲंफिटामाईन आणि 25 किलो ग्रॅम मॉर्फिन) अंमली पदार्थ वाहून नेणारी एक संशयित नौका नुकतीच ताब्यात घेतली आहे.
याबाबत भारतीय नौदलाच्या सागरी टेहळणी विमानांकडून गुप्त माहिती मिळाली होती. तसेच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने या गुप्त माहितीची शहानिशा केली होती. या माहितीच्या आधारावर, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अंमली पदार्थांसह भारतीय जल सीमेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयास्पद नौकेला अडवण्यासाठी भारतीय नौदलाने आखलेल्या मोहिमेत एका युद्धनौकेद्वारे कारवाई केली. या नौकेला रोखून अलिकडच्या काळात अंमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळाले आहे. त्यानंतर, ताब्यात घेण्यात आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने जवळच्या भारतीय बंदरात खेचून नेले आणि त्यावरील कर्मचारी तसेच प्रतिबंधित अमली पदार्थांचा साठा कायदे अंमलबजावणी संस्थेच्या हवाली केला.
ही कारवाई केवळ जप्त केलेल्या अवैध मालाचे प्रमाण आणि मूल्य या दृष्टीनेच महत्वपूर्ण आहेच शिवाय मकरान किनाऱ्यावरून निघणाऱ्या आणि विविध दिशांना तसेच हिंद महासागर क्षेत्रातील देशांना जाणाऱ्या प्रतिबंधित अमली पदार्थांच्या तस्करीचे मार्ग ध्वस्त करण्यासाठी भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहयोगी प्रयत्नांना अधोरेखित करते. ही यशस्वी समन्वित मोहीम, विशेषत्वाने भारताच्या सागरी सीमा क्षेत्र परिसराचा बेकायदेशीर कृत्यांसाठी वापर करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय नौदलाची मजबूत वचनबद्धता आणि संकल्प दर्शविते.