६ डिसेंबर १९९२! श्रीराम भक्तांनी अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंह भंडारी यांना पत्रकारांनी विचारले की, यह बाबरीका विवादास्पद ढाँचा किसने गिराया? तेव्हा भंडारी यांनी सरळ आपल्या काखा वर करीत, नहीं वह बीजेपी के नहीं थे, वे आर एस एस के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, व्हीएचपीके नहीं थे, शायद शिवसेना के होंगे, असे उत्तर दिले. त्याचवेळी मुंबईच्या वांद्रे येथून वाघाने डरकाळी फोडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले की, बाबरी उद्ध्वस्त करणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. आणि त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट हा किताब लोकांनी बहाल केला. शिवसेना आणि भाजप यांची युती होती आणि हिंदुत्वाचे तुफान साऱ्या हिंदुस्थानात घोंघावत होते. या वातावरणामुळे १९९० साली थोडक्यात हुकलेली शिवसेना-भाजप युतीची सत्ता १९९५ साली महाराष्ट्रात अधिकारारुढ झाली. १४ मार्च रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. दादरच्या शिवाजी पार्कवर ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
शिवशाही सरकार जरी असले तरी भाजप स्वस्थ बसू शकत नव्हता. बाळासाहेब ठाकरे सरळसोट नेते होते. राजकारणातले छक्केपंजे त्यांना माहित नव्हते. जे ओठात, ते पोटात आणि जे पोटात तेच ओठात, अशी त्यांची नियत आणि नीती होती. त्याचा गैरफायदा भाजपवाले पुरेपूर उठवत होते. १९९१ साली जेव्हा छगन भुजबळ यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला, तेव्हा युतीचा नेता म्हणून मी विरोधी पक्षनेता राहू शकतो, असे मनोहर जोशी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचवेळी प्रेमकुमार शर्मा यांनी भाजपचे प्रतोद म्हणून विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्याकडे पत्र देत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सामनामधून ‘लोणी, बोका आणि सिंक’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. १९९९ साली बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या गळ्यातून मुख्यमंत्रीपदाची माळ नारायण राणे यांच्या गळ्यात घातली. राणे भाजपच्या दृष्टीने उपयोगी ठरले. उपमुख्यमंत्री मुंडे यांच्यामार्फत राणे यांनी १९९९ साली लोकसभेबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घेण्याची सूचना प्रमोद महाजन यांच्याकरवी ठाकरे यांच्याकडून मंजूर करवून घेतली. या निवडणुकीत भाजपच्या हाती सत्ता यावी अशी रणनीती आखण्यात आली. शिवसेना आणि भाजप, या दोघांच्या नेत्यांनी एकमेकांचे ६९ उमेदवार पाडले. ही यादी तत्कालीन गृह राज्यमंत्री बाळा नांदगावकर यांच्याकडे होती, असे सांगण्यात येते. फाजील आत्मविश्वास आणि असुरी महत्त्वाकांक्षा यामुळे शिवसेना-भाजप युतीचे सरकार १९९९ साली पायउतार झाले.
भाजपच्या प्रवृत्तीचा वारंवार अनुभव येऊनही शिवसेनेच्या नेत्यांनी धडा घेतला नाही. पण आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सगळे हिशेब चुकते करण्याचा विडा उचललाय. भाजपसोबत शिवसेनेची युती घडविण्याचे म्हणविण्यात येणारे ‘शिल्पकार’ प्रमोद महाजन यांनी भले १९८९पासून युती केली असेल तरी त्यांचा ‘शतप्रतिशत’चा धोषा १९९९पासून सुरूच होता. १९९२ साली बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर सर्वत्र दंगली उसळल्या. पण मुंबई, महाराष्ट्रात शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू बांधवांचे तारणहार ठरले होते. शिवसेनाप्रमुखांनी ऑटोरायडर्सचे मुकेश पटेल यांना राज्यसभेवर पाठविले. चंद्रिका केनिया यांना राज्यसभेवर पाठविले. हे दोघेही गुजराती भाषिक होते. मुकेश पटेल यांना मातोश्रीचा मार्ग दाखविणारेही हेमराज शाह होते. मुकेश गांधी यांनी शिवसेनेत असताना त्यांनी बिर्ला क्रीडा केंद्रात एक भला मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. दीपचंद गार्डी यांच्यासारखे दिग्गज गुजराती भाषिक उद्योगपती/उद्योजक यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ‘जो ना होता शिवाजी, तो सुन्नत होती सबकी’ याची आठवण करुन देत या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपाने खरा हिंदू हितरक्षक लाभला असल्याचे आवर्जून नमूद केले.
महाराष्ट्रात राहणारा मराठी, गुजरातमध्ये राहणारा गुजराती, बंगालमध्ये राहणारा बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, ही साधी, सोपी हिंदुत्वाची व्याख्या बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितली. याच हिंदुत्वाच्या साक्षीच्या आधारे मनोहर जोशी यांची ११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्दोष मुक्तता झाली. विलेपार्ले येथील डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडणुकीत हिंदुत्व अधिकृतपणे समोर आले. बाळासाहेब ठाकरे यांना सहा वर्षे मतदानापासून वंचित राहवे लागले. परंतु ठाकरे यांनी कधी परिणामांची तमा बाळगली नाही. केवळ हिंदूधर्मीयच नव्हे तर साबीर शेख हे कडवे मुस्लिम आमदार ठाकरे यांनी विधानसभेत पाठविले. त्यांना कामगार मंत्रीसुद्धा बनविले. अंजुम अहमद यांना नागपाड्यात विधानसभा उमेदवारी दिली. अँथनी ब्रिटो हे ख्रिस्ती बांधव स्थायी समितीत होते. राजूल पटेल या रणरागिणी प्रारंभापासूनच सक्रीय आहेत. अब्दुल सत्तार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत तर गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया विधान परिषदेत आहेत. गोपीकिशन बाजोरिया यांनी नगराध्यक्षपदही भूषविले आहे. किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल यांना विधिमंडळात पाठविले. अनेकांना महापौर बनविले. सुरेश प्रभू, बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेशदादा जैन यांना लाल दिव्याच्या गाड्या बाळासाहेब ठाकरे यांनी मिळवून दिल्या. हंसाबेन देसाई, संध्या दोशी यांनी नगरसेवकपद भूषविले. राजेश दोशी, बिरेन लिंबाचिया, जयंती मोदी, अश्विन शाह अशी महाराष्ट्रात असंख्य उदाहरणे देता येतील, ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेची शिडी उपलब्ध करुन दिली. पण अनेकांनी या शिडीचा वापर करुन ती फेकून दिली.
अनेक दगडांना शेंदूर फासले. पण आपणच देव आहोत असा भ्रम अनेकांमध्ये निर्माण झाला. आग्री, कोळी, साळी, माळी, मराठा, शहाण्यव कुळी, ब्याण्ण्यव कुळी, मराठी, गुजराती, हिंदी, नेपाळी अशी सर्वधर्मीय सर्वभाषिकांना सोबत घेऊन जातपात न मानता, कर्तृत्त्व, कर्तबगार, क्षमता अशा गुणवत्तापूर्ण व्यक्तींना हेरुन रत्नपारखी नजरेने ठाकरे यांनी शिवसेना वाढविली. प्रितीश नंदी, संजय निरुपम या अमराठी लोकांनासुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी संसदेचे दरवाजे उघडून दिले. सहा पत्रकार संसदेत पाठविले. ‘रिकाम्या हाताला काम आणि रिकाम्या पोटाला अन्न’ ही बाळासाहेब ठाकरे यांची संकल्पना होती आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र होते. बाबरी पडल्यावर काखा वर करुन पळपुटेपणा दाखविणारे रणछोडदास बाळासाहेब नव्हते. शंकरसिंह वाघेला गुजरातमध्ये भाजप सोडून शिवसेनेचे मुख्यमंत्री व्हायला तयार होते. परंतु नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्ही वाघ आहोत, वाघेला नाही, असे मातोश्रीवर आलेल्या वाघेलांना ठणकावून सांगणारे बाळासाहेब होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म म्हणून मोदी यांना गुजरातचे नेतृत्त्व सोडण्याची सूचना बोलून दाखविली. पण लालकृष्ण अडवाणी यांच्याकरवी ‘नरेंद्र मोदी को गुजरात से मत हटाओ. मोदी गया तो समझो गुजरात से भाजपा गया, हे वाजपेयी यांच्याकडे परखडपणे निरोप पाठविणारे बाळासाहेब ठाकरे होते.
गुजराती बांधवांना बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये आपला कैवारी वाटत होता, मसीहा वाटत होता. याच्या अगदी उलट भाजपची चाल होती. भाजपचे नेते प्रकाश मेहता मंत्री असताना त्यांनी मुंबई, महाराष्ट्रातील गुजराती बांधवांसाठी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेल्या सूचनांना पद्धतशीरपणे वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मुंबईत सहा गुजराती वर्तमानपत्रे प्रसिद्ध होत असताना मुख्यमंत्री फडणवीस आपल्या अखत्यारीतील माहिती खात्यात साधा गुजराती विभाग सुरू करू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला गेलेल्या हेमेंद्र मेहता यांना गोपाळ शेट्टी यांनी भाजपमध्ये आणले. पण चाणाक्ष विनोद तावडे यांनी आपली जागा सुरक्षित राहावी म्हणून गुजरातीबहुल बोरीवली मतदारसंघात स्वतः उभे राहून प्रकाश सुर्वे, प्रवीण दरेकर, सचिन सावंत या उमेवारांच्या साठमारीमध्ये मागाठाणे मतदारसंघात हेमेंद्र मेहतांना बळीचा बकरा बनविला. बोरीवलीमध्ये शिवसेनेने उत्तमप्रकाश अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव करुन मीरा भाईंदरच्या जायंट किलर ठरलेल्या अपक्ष (भाजप बंडखोर) गीता जैन यांनीसुद्धा आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी ‘शिवबंधन’ बांधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. २०१४पासून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नावाखाली भाजपने गुजराती बांधवांचा निव्वळ वापर करुन घेतला. गुजराथी बांधवांच्या कोपराला फक्त गूळ लावण्याचे काम केले. जीएसटीमुळे संत्रस्त झालेल्या गुजराती, मारवाडी, जैन व्यापाऱ्यांना बेहाल करुन टाकले.
‘हे फडणवीस यांच्या काळात झाले’, ‘ते फडणवीस यांच्या काळात झाले’ म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्यांनी १२ नोव्हेंबर २०१४पासून ५ डिसेंबर २०१४पर्यंत विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेला केवळ २२ वर्षांत जी बदनामी सहन करावी लागली. नाही तेवढी बदनामी शरद पवार यांच्या अदृष्य हाताच्या न मागितलेल्या समर्थनामुळे सहन करावी लागली, असा कबुलीजबाब देणाऱ्या फडणवीस यांना आपली खुर्ची पाच वर्षे बिनधास्तपणे भरभक्कम राहवी म्हणून चंद्रकांत पाटील आणि धर्मेंद्र प्रधान यांना मातोश्रीच्या दरवाजावर पाठवावे लागले. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून फडणवीस यांच्या सहकार्यासाठी पुढे केलेल्या हाकेला साद देत सहकार्याचा हात त्यांच्या हाती दिला. शिवसेना नेते, आमदारांना मंत्रीपदे तर दिली, परंतु त्यांना अधिकार किती दिले, याची खातरजमा रामदास कदम, दिवाकर रावते, सुभाष देसाई आदींकडून बेलाशक करुन घ्यावी. फडणवीस यांची पाच वर्षे खुर्ची भक्कम ठेवण्याचे श्रेय निव्वळ शिवसेनेचे असताना आताशा सकाळपासून आदळआपट करणाऱ्यांची दृष्टी हीन झाली की काय, असा प्रश्न पडतो. सोबतच्या मित्रांचा फक्त वापरच करुन घ्यायचा असतो, एवढेच ज्यांना कळते त्यांना बिच्चारे विनायक मेटे काय, सदाभाऊ खोत काय, महादेव जानकर काय, हे नेते कशा परिस्थितीत राजकीय कारकीर्द घडवीत आहेत, हे त्यांनाच विचारा. उद्धव ठाकरे, नाना पटोले, राजू शेट्टी हुशार निघाले. ‘बॉम्बे’चे मुंबई, औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याचा प्रस्ताव मनोहर जोशी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९९५ सालीच मंजूर करवून घेतला होता. पण न्यायालयात काही जण गेल्यामुळे संभाजीनगर आणि धाराशिव मार्गी लागू शकले नाही, हे भाजपच्या नेत्यांना पुरेपूर माहित आहे. पण निव्वळ राजकारण करुन शिवसेनेवर आगपाखड करण्यात ते धन्यता मानत असतील तर मानू देत बापुडे. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुळका आलेल्या भाजपने २०१४पासून संसदेत स्पष्ट बहुमत असताना भारतरत्न किताब का दिला नाही? संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सावरकर यांचे चंद्रकला कदम या प्रसिद्ध चित्रकर्तीने काढलेले तैलचित्र मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष असताना लावून घेतले. राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. तेव्हा ‘राम’ वाजपेयी यांचे ‘लक्ष्मण’ प्रमोद महाजन का हजर नव्हते, याची माहिती डंका वाजविणाऱ्यांनी मिळवावी. ‘अजान सेना’, ‘औरंगजेब सेना’ असे हिणविणाऱ्यांनी भाजपच्या मुख्तार अब्बास नकवी, शहानवाज हुसैन यांच्यासमवेत फरच्या टोप्या घालून शीरकुर्मा खातानाचे आणि जनाब ए दावतचे पोस्टर, छायाचित्रे बाहेर काढून, हिरवी किनार असलेला आपला झेंडा हाती घेऊन हिंदुत्वाची जपमाळ खुशाल ओढत बसावे. अनेक बाबी आहेत. त्यामुळे शिवसेनेला कुणी ‘हिंदुत्व’ शिकविण्याची आवश्यकता नाही. तूर्तास इतकेच!