HomeArchiveमोदी अखेर बोललेच!

मोदी अखेर बोललेच!

Details
मोदी अखेर बोललेच!

    03-Jan-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com

२०१२-१३ मध्ये जेंव्हा राजधानी दिल्लीवर स्वारी करण्यासाठी नरेंद्र मोदींचा रथ अहमदाबादेतून सुटला होता, तेव्हा त्यांच्या प्रत्येक सभेत, “मोदी! मोदी! मोदी!!” असा जयघोष ऐकू येत होता. जनतेचा तो उत्स्फूर्त उत्साह आता हरवला आहे काय, असा सवाल तयार झाला आहे. पंतप्रधान होण्यासाठी उत्सुक असणारे मोदी आणि पंतप्रधानपदाची चाडे चार वर्षे पूर्ण केलेले मोदी यात जनतेला मोठे अंतर दिसत आहे. “तुम्ही काय काय बोलला होतात? ते सारे खरे का करून दाखवत नाही?” हा एक प्रश्न मोदींच्या समर्थकांनाही छळत होता आणि विरोधक तर याच प्रश्नावर डोळा ठेवून होते. “तुमची आश्वासने तुम्ही पूर्णच करू शकत नाहीत, हे एकदा कबूल करा! जनता तुमच्या जुमलेबाजीला कंटाळलेली आहे..” असे नव्याने स्वर सापडलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गंधी जसे म्हणत आहेत तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्वात जुने व एकेकाळी सर्वात जवळ रहिलेल्या मित्रपक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, हेही म्हणत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही पत्रकार परिषदेला सामोरे जात नाहीत. पत्रकारांच्या प्रश्नांपासून लांब पळतात असेही विरोधी पक्षाचे नेते म्हणत होते. त्या आरोपांची धार पाच राज्यांच्या निकलांनंतर अधिकच तीव्र झालली होती. मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगडमधील सत्ता गमावल्यानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षांची मान व आवाज अधकिच उंच झाला होता आणि मोदी समर्थकांच्या माना झुकू लागलेल्या होत्या. “मोदी तुम्ही बोलत का नाहीत?” हा सवाल त्यांचे समर्थक अधिक चिंतेने, अधिक कळजीने विचारू लागले होते आणि ज्यांना सतत मौनीबाबा पंतप्रधान असे भाजपाने चिडवले होते ते, ‘अपघाताने पंतप्रधान झालेले’ डॉ. मनमहोन सिंह हेही चक्क मोदींना टोमणे मारू लागले होते की “मी बुवा भेटत होतो पत्रकरांना! प्रश्नांपासून कधीच लांब पळालो नाही..” गंमत म्हणजे त्यांच्या ‘अपघाती पंतप्रधानपदा’विषयी आलेल्या सिनेमाचा प्रश्न परवाच काही टीव्ही पत्रकार डॉ. सिंह साहेबांना विचारू लागले तेव्हा मात्र मान फिरवून निघून जाताना हेच डॉ. मनमोहन सिंह दिसले..!

“अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर” या संजय बारू यांच्या ग्रंथावर आधारीत त्याच नावाचा सिनेमा येऊ घातला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत, अस्वस्थही झाले आहेत. या साऱ्या टीका-टिप्पणीच्या व चिंतांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय व राजकीय प्रश्नांची थेट उत्तरे दिली. पण अर्थात त्यांनी जाहीर पत्रकार परिषद न घेता एका टीव्ही न्यूज एजन्सीला मुलाखत दिली व त्या एजन्सीकडून ही मुलाखत बहुतेक सर्वच राष्ट्रीय-आंतरराष्टरीय वृत्तवाहिन्यांनी घेतली. त्या मुलाखतीचे अंश वृत्तपत्रांतूनही आजच झळकले आहेत. एएनआय ही वृत्तवाहिन्यांना माहिती व दृष्ये पुरवणारी वृत्तसंस्था आहे. त्यांचे स्वतःचे चॅनेल नाही. पण सर्व चॅनेल त्यांच्याकडून दृकश्राव्य चित्रणे घेत असतात. एकेकाळी इंदिरा गांधी, जनाब अंतुले असे नेते फक्त वृत्तसंस्थांच्याच पत्रकारांचा समावेश आपल्या दौऱ्यात करत असत. मोदींनी तसेच धोरण ठेवले आहे. त्यांच्या दौऱ्यात, त्यांच्या कार्यक्रमांच्या बातम्या देण्याची जबाबदारी दूरदर्शन व एएनआय या दोनच संस्थांवर टाकलेली असते. कधीमधी पीटीआयसारख्या वृत्तसंस्थेचाही समावेश त्यात असतो. पण अन्य खाजगी वृत्तवाहिन्या व छापील वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींची पंतप्रधानांशी थेट भेट दुरापास्त असते. मनमोहन सिंह व राहूल गांधींनी मोदींना टोकले होते ते तुम्ही पत्रकार परिषदेतील वेड्यावाकड्या प्रश्नांच्या भडिमाराला सामोरे जात नाही, याविषयी होते. ती टीकेची बाब या टीव्ही मुलाखतीनंतरही कायमच राहते.

मोदींनी प्रश्नांना उत्तरे दिली व प्रश्नही बऱ्यापैकी निष्पक्ष होते, निर्भीडही होते. पण तरीही ती पत्रकार परिषद नव्हती. तर एक विशिष्ट व तुम्हीच निवडलेल्या वृत्तसंस्थेशी केलेली बातचीत होती. पण ते काही असले तरीही अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर पंतप्रधान बोलले हे उत्तम झाले. टीकेच्या विविध मुद्दयांचा त्यांनी त्यांच्या शांत व स्पष्ट शैलीत समाचार घेतला. राफेलपासून राममंदिरापर्यंत आणि काँग्रसपासून महागठबंधनापर्यंत अनेक मुद्द्यांचा समाचार त्यांनी घेतला. त्यामुळे मोदी व भाजपा समर्थकांचा जीव भांड्यात पडावा, कार्यकर्त्यांना बळ यावे व नेतेमंडळींच्या अंगात उत्साह संचारावा असे बरेच त्यात होते. अर्थातच विरोधकांना त्यात टीकेचेही काही मुद्दे गवसणारच आहेत. त्यावर ते बोलतही राहणार आहेत. पण मोदींनी तीन-चार महत्त्वाच्या मुद्द्यांचा पारमर्श जो घेतला त्यातील प्रमुख व देशात सर्वत्र औत्सुक्य तसेच चिंतेचा मुद्दा आहे तो राममंदिराचा. रामाचा जन्म अयोध्येत विशिष्ट ठिकाणी झाला, तिथे दशरथाचा महाल होता. रामायणातील अयोध्या या ठिकाणी होती.. हे सारे मोठ्या जनसमुदायाच्या श्रद्धेचे विषय आहेत. परंपरेने तसे मानले आहे. बाळ रामाच्या, ज्याला उत्तरेत रामलल्ला म्हटले जाते, मंदिराच्याच जागी बाबराने मशीद बांधली. त्यामुळे बाबरी हटवा व राम मंदिर बांधा ही एक मोठी चळवळ उभी राहिली. त्यात सुरूवातीला धार्मिक नेतेच होते. कालांतराने राजकीय नेतेही चळवळीत उतरले. पण तो सारा विषय चौदा याचिकांच्या माध्यमांतून सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे. वादग्रस्त जागेचा ताबा कुणाला द्यायचा, हिंदू विश्वस्त मंडळाला की सुन्नी वक्फ बोर्डाला याचा निर्णय जानेवारीच्या पहिल्या, दुसऱ्या सप्ताहात सर्वोच्च न्यायालयात होणे अपेक्षित आहे. हा निर्णय एकदा येऊद्यात, नंतर केंद्र सरकारला आवश्यक असणारी कारवाई करता येईल असे मोदींनी या मुलाखतीत म्हटले ते महत्त्वाचे आहे. भारतीय जनता पार्टीचा जो हिंदुत्ववादी समर्थक आहे त्याला गोंजारण्याचा हा प्रयत्न आहे. “अध्यादेश काढून कायदा करून राम मंदिराचे बांधकाम सुरू करा” या एकीकडे रा. स्व. संघ व दुसरीकडे शिवसेनेसारख्या मित्रपक्षांच्या आग्रहाचेही समाधान या उत्तराने होणे शक्य आहे. त्यावर लगेचच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रियाही आलेली आहे. “घटनात्मक चौकटीत राम मंदिराचा विषय सोडवण्याचे जे आश्वासन मोदींनी जाहीरनाम्यात दिले होते त्याच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल या मुलाखतीत पडले आहे.”, असे रा. स्व. संघाने म्हटले आहे. त्याच मुद्द्यावर बोलताना मोदींनी काँग्रसवरही दोन-चार दुगाण्या झाडून घेतल्या आहेत व त्याचवेळी काँग्रेसच्या पूर्व पंतप्रधानांनी या विषयात केलेल्या कामगिरीचाही ऋणपूर्वक निर्देश केला आहे. राजीव गांधींनी अयोध्येतील वादग्रस्त जागेतील रामाच्या मंदिराचे दरवाजे उघडले होते तर नरसिंहरावांच्या कारकिर्दीत या प्रश्नासाठी केंद्र सरकारने बऱ्याच बैठका घेतल्या होत्या, पुढाकारही घेतला होता. त्याचवेळी कपिल सिब्बल यांच्यासारखे काँग्रेसचे वकील नेते सर्वोच्च न्यायालयात हा वाद अधिक रेंगाळावा असे प्रयत्न करीत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला आहे. तोही गंभीर आहे.

काँग्रेसमुक्त भारत ही मोदींच्या मागील लोकसभा निवडणुकीतील एक महत्त्वाची घोषणा होती. त्याची पूर्तताही होते आहे असे वाटू लागले होते. कारण अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही. १९७७ च्या जनता लाटेतही महाराष्ट्राने काँग्रेसला तगवले होते. पण यावेळी, २०१४ मध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसचे फक्त दोन खासदार विजयी झाले तर राष्ट्रवादीचे चार. त्यामुळे त्या घोषणेचा मोठाच धसका काँग्रेसजनांनी घेतला होता. २०१८ ची अखेर होताना काँग्रेसचे पुनरागमन दणक्यात झालेले दिसले. त्यासंदर्भात मोदींनी आपल्या काँग्रेसमुक्त घोषणेला जे, “जर–तर”चे पैलू पाडले आहेत ते पाहवे लागतील! आता ते म्हणत आहेत की काँग्रसमुक्त भारत याचा अर्थ काँग्रेस या संस्थेची अखेर असा नव्हता तर त्या संस्थेतील वाईट विचारांपासून मुक्त भारत करायचा असा अर्थ होता. जातीयता, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, म्हणजे काँग्रेस हे सूत्र बदलणे काँग्रसजनांनाही आवश्यक आहे. तो पक्ष, ती संस्था राहिली तरी, त्यातील वाईट भाग गेला तर त्या वाईट काँग्रेस विचारांपासून भारत मुक्त झाला असे होईल..! मोठ्या चलाखीने मोदींनी या वादग्रस्त ठरलेल्या मुदद्याला एक निराळे वळण दिले आहे.

मोदींच्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीमधील त्यांच्या अनेक विषयांतील कामगिरीची चर्चा पुढच्या काही महिन्यात होणारच आहे. पण जनतेला सर्वात भावलेला व काँग्रेससह संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अन्य पक्षांना नेत्यांना डाचलेला विषय होता तो, “सर्जिकल स्ट्राइक” हा. अशाप्रकारे पाक सीमेत घुसून यापूर्वी आमच्या काळातही, भारतीय सैन्याने कामगिरी केली. पण आम्ही त्याचा डंका पिटला नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले होते. “अशी कारवाई झालेलीच नाही, हा मोदींचा पब्लिसिटी स्टंट आहे,” असेही काही नेत्यांनी त्यावेळी सांगितले होते. शरद पवारांसारख्या मित्रपक्षांनीही त्याची री ओढली होती. त्यासंदर्भात मोदींनी जे भावपूर्ण विवेचन मुलाखतीत केले ते महत्त्वाचे ठरावे. ऊरीमधील लष्करी तळावर जो भीषण हल्ला पाकने केला होता, त्या घटनेनंतर देशात संताप होता. पाक दहशतवाद्यांनी वाईट पद्धतीने आपल्या सैनिकांची हत्त्या केली होती. मोदी सांगतात की, “मी स्वतः खूप असवस्थ होतो. ऊरीनंतर मी केरळमध्ये गेलो होतो. तिथे जाहीर सभेत बोलताना मी कठोर कारवाईविषयी बोललो. मी स्वतःला रोखू शकलो नाही..” मोदींनी लष्कराला संगितले होते की, तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने कारवाई करा. पण, आपल्याला पाकला उत्तर द्यायचेच आहे. या कारवाईचे नियोजन काटेकोरपणाने झाले होते. त्यात भाग घेणाऱ्या जवानांच्या सुरक्षेची मी फार काळजी करत होतो. ते सारे सुरक्षित परतले पाहिजेत हे ठरवले होते. या जवानांनाची निवड काळजीपूर्वक केली गेली. त्यांचे विशेष प्रशिक्षण केले गेले. त्यांना सूचनाही दिलेली होती की “यश मिळो वा अपयश मिळो, कारवाई आटोपून सूर्योदयापूर्वी परत या”. सुरक्षेच्या कारणांसाठी ती तारीख दोन वेळा बदलावी लागली. मोदींनी नमूद केले आहे की, जेव्हा कारवाई झाली तेव्हा मला प्रत्येक मिनिटाची खबर येत होती. मी ती माहिती सतत घेत होतो कारण मी अस्वस्थ होतो. आपले सारे जवान सुखरूप परत आलेच पाहिजेत हे वाटत होते. मध्येच कारवाई करणाऱ्या तुकडीच्या हालचालीची माहिती येणेच बंद झाले.

सूर्योदयाची वेळ आली, पण जवान परतले नाहीत. दोन तास काहीच माहिती कळत नव्हती. ते क्षण माझ्यासाठी फराच कठीण होते. अखरे सूर्योदयानंतर तासाभराने खबर आली की, जवान परतीच्या मार्गावर आहेत व ते सुरक्षित टप्प्यात पोहोचले आहेत.. पण, शेवटचा जवान परत येईपर्यंत मला खबर देत राहा हे मी सांगितले. मोदींनी नमूद केले आहे की, अखेर सारे जवान सुरक्षित भारतीय सीमेत पोहोचल्यानंतर आम्ही पाकला माहिती दिली व नंतरच भारतीय जनतेला मीडियाच्या माध्यमांतून सर्जिकल स्ट्राईकची माहिती देण्यात आली. आणि लक्षात घ्या हा विषय कधीही राजकीय करण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. कोणा मंत्र्याने वा पंतप्रधानांनी ही माहिती देशाला संगितली नाही. सर्जिकल स्ट्राईकची माहिती लष्करी अधिकाऱ्यांची जनतेला सांगितली. पण ती माहिती जाहीर होताच विरोधी पक्षांनी निराळा सूर लवला. त्यांनी पाकच्या विधानांवर विश्वास ठेवण्याच्या गोष्टी केल्या. हे दुर्भाग्य होते. हे वाईट होते. त्यांनी सैनिकांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उभे केले हे वाईट होते. पंतप्रधांनानी या मुलाखतीमधून आपल्या २०१९ च्या प्रचार मोहिमेचा बिगुलच फुंकलेला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्याच मुद्द्यांची चर्चा लगेचच सर्व विरोधी पक्षांनी सुरू केल्यामुळे प्रचारात या टप्प्यात मोदींनी आघाडीच घेतली आहे. अर्थातच, दिल्ली अद्याप बहोत दूर आहे!!”
 

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content