‘राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?’ असा प्रश्न कृष्णाने कर्णाला विचारला. त्याच्या रथाचे चाक जमिनीत रूतल्यावर कर्ण जेव्हा धर्माच्या बाता करू लागला तेव्हा कृष्णाने हा प्रश्न विचारला होता. कालचा बंद बघताना त्याचीच आठवण आली.
ज्या उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये महाराष्ट्रात सत्तारूढ असलेल्या महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाचं फारसं अस्तित्त्व नाही, त्या लखीमपूरमध्ये घडलेल्या शेतकऱ्यांच्या हत्त्याप्रकरणी या महाविकास आघाडीने आपलीच सत्ता असलेल्या महाराष्ट्राला काल वेठीस धरलं. सत्तारूढ असलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारी मालमत्तेचं नुकसानसुद्धा केलं. ज्यांनी कायद्याची घडी बसवायची त्यांनीच कायदा हातात घेतला तर कसं होणार?
हे करताना त्यांना सोयीस्करपणे काही गोष्टींचा मात्र विसर पडला! नागपूरमध्ये शांततेत मोर्चा काढलेल्या गोवारींच्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार करून त्यांचं निर्मम हत्याकांड केलं त्यावेळी महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती?
पालघरमध्ये दिवसाढवळ्या निःशस्त्र साधूंचं हत्त्याकांड करण्यात आलं तेव्हा महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती?
मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करून त्यांना ठार मारण्यात आलं तेव्हा महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती?
तेव्हा ज्यांच्या कातडीवरचा केससुद्धा हलला नाही ते आज दूर उत्तर प्रदेशात असलेल्या लखीमपूरच्या हत्त्याकांडाच्या विरोधात आधीच हवालदिल झालेल्या महाराष्ट्राला वेठीला धरत आहेत ही कमाल आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या बहुतेकांचं कंबरडं मोडलं आहे. रोजगाराअभावी अनेक लोक गुन्हेगारीकडे वळायला लागल्याने गुन्हेगारी वाढली आहे. बलात्काराच्या… सामूहिक बलात्काराच्या बातम्या तर रोजच येत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था हा प्रकार नावालाही उरलेला नाही.
त्यात कोळशाचं संकट गडद झाल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्र अंधारात जाईल अशी भीती आहे. त्याचा विपरीत परिणाम उद्योगावर अर्थातच होणार आहे. मात्र तरीही त्यासाठी काहीही न करता लखीमपूरच्या हत्त्याकांडापायी महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात बंद करावा हा हास्यास्पद प्रकार आहे. जो प्रश्न कर्णाला केला गेला तोच प्रश्न याही सरकारातल्या घटकपक्षांना करावासा वाटतो. तेव्हा कुठे गेली होती तुमची संवेदना? आता कुठे आहे तुमची संवेदना? ज्यांनी तुम्हाला मते देऊन सत्तेत पोहोचवलं त्यांच्यासाठीही संवेदनात जागू द्या!
आणखी एक!
लखीमपूरमधली संशयित… अगदी केंद्रीय मंत्र्याचा मुलगासुद्धा अटकेत आहे. महाराष्ट्रात मात्र, माजी गृहमंत्रीच (अनिल देशमुख) आणि मुंबई महानगराचे माजी पोलीस आयुक्त (परमबीर सिंह) फरार आहेत. महाविकास आघाडीचं ‘कर्तबगार’ सरकार सत्तेत असताना यांना फरार व्हायला कोणी मदत केली? आजही जनता उत्तराच्या प्रतीक्षेत आहे!