Friday, December 27, 2024
Homeडेली पल्सकोरोनात असा साजरा...

कोरोनात असा साजरा करा गणेशोत्सव!

आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने हिंद धर्मशास्त्रात सांगितलेला पर्याय म्हणजे आपद्धर्म! सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. यामुळे हिंदूंचे विविध सण, उत्सव आणि व्रते नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. कोरोनासारख्या आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदू धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. ‘आपद्धर्म’ म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः।’ म्हणजे ‘आपत्काळात धर्मशास्त्राला मान्य असलेली कृती.’

या काळातच श्री गणेशचतुर्थीचे व्रत आणि गणेशोत्सव येत असल्याने संपत्कालात सांगितलेल्या पद्धतीने यावेळी उत्सव स्वरूपात, म्हणजे सामूहिक रूपाने हा उत्सव साजरा करण्यास मर्यादा आहेत. यादृष्टीने प्रस्तुत लेखात ‘सध्याच्या दृष्टीने धर्माचरण म्हणून गणेशोत्सव कसा साजरा करता येऊ शकेल?’, याचा विचार करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, हिंदू धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे यातून शिकायला मिळते. यातून हिंदू धर्माचे एकमेवाद्वितीयत्व अधोरेखित होते.

गणेशचतुर्थीचे व्रत कशाप्रकारे करावे?

गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेशचतुर्थीला तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अल्प झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही निर्बंध आहेत. या अनुषंगाने आपद्धर्म आणि धर्मशास्त्र यांची सांगड घालून देखावे, रोषणाई आदी न करता साध्या पद्धतीने पार्थिव सिद्धिविनायकाचे व्रत पुढील पद्धतीने करता येईल.

प्रत्येक वर्षी बर्‍याच घरात शाडूची माती, प्लास्टर ऑफ पॅरिस आदींपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा केली जाते. यावर्षी ज्या भागात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अल्प आहे, म्हणजेच ज्या भागात दळणवळण बंदी नाही, अशाठिकाणी नेहमीप्रमाणे गणेशमूर्ती आणून तिची पूजा करावी. (धर्मशास्त्रानुसार शाडूमातीची गणेशमूर्ती का असावी, याविषयीचे विवरण लेखाच्या शेवटच्या सूत्रात दिले आहे.)

ज्यांना काही कारणास्तव घराबाहेर पडणेही शक्य नाही, उदा. कोरोनाच्या संसर्गामुळे आजूबाजूचा परिसर अथवा इमारत ‘प्रतिबंधात्मक क्षेत्र’ म्हणून घोषित झाले असेल, तेथील लोक ‘गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा’, यासाठी आपल्या घरातील गणेशाची मूर्ती अथवा गणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतात. हे पूजन करत असताना पूजेतील ‘प्राणप्रतिष्ठा’ हा विधी करू नये, हे लक्षात घ्यावयाचे महत्त्वाचे सूत्र आहे.

ज्येष्ठा गौरी व्रत कशाप्रकारे करावे?

काही घरांमध्ये भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमीच्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे पूजन केले जाते. हे काही घरांमध्ये खड्यांच्या स्वरूपात, तर काही घरांमध्ये उभे मुखवटे करून त्यांची पूजा केली जाते. कोरोनाच्या संकटामुळे ज्यांना प्रतिवर्षाप्रमाणे खड्यांच्या स्वरूपात अथवा मुखवट्यांच्या स्वरूपात त्यांची पूजा करणे शक्य नाही, ते आपल्या घरातील देवीच्या एखाद्या मूर्तीची अथवा चित्राची पूजा करू शकतात.

विशेष सूचना: गणेशमूर्ती आणताना तसेच तिचे विसर्जन करताना घरातील मोजक्याच व्यक्तींनी जावे. मूर्तीचे विसर्जन करताना आपल्या घराजवळील तलाव किंवा विहीर यामध्ये विसर्जन करावे. या काळात गर्दी होण्याचा धोका अधिक असल्याने शासनाने कोरोनाच्या संदर्भात सांगितलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे तंतोतंत पालन करणे, हे आपल्या सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे.

गणेशमूर्ती शाडूमातीची का असावी?

धर्मशास्त्रानुसार शाडूमातीची मूर्ती पूजल्यास त्याचा आध्यात्मिक स्तरावर अत्यधिक लाभ होतोअसे हिंदूंच्या धर्मशास्त्रीय ग्रंथात सांगितले आहे.

‘धर्मसिन्धु’मध्ये ‘गणेशचतुर्थीला गणपतीची मूर्ती कशी असावी?’, याविषयी पुढील नियम दिला आहे.

तत्र मृन्मयादिमूर्तौ प्राणप्रतिष्ठापूर्वकं विनायकं षोडशोपचारैः सम्पूज्य – धर्मसिन्धु, परिच्छेद २.

अर्थ: यादिवशी (भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला) श्री गणेशाची माती इत्यादींपासून बनवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापना करून षोडशोपचार पूजा करून..

दुसर्‍या एका संदर्भानुसार ‘स्मृतिकौस्तुभ’ नामक धर्मग्रंथामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्याविषयीचा उल्लेख आहे. यात मूर्ती कशी असावी, याचे सविस्तर वर्णन आले आहे.

स्वशक्त्या गणनाथस्य स्वर्णरौप्यमयाकृतिम्।

अथवा मृन्मयी कार्या वित्तशाठ्यं न कारयेत्॥ – स्मृतिकौस्तुभ

अर्थ: या (सिद्धिविनायकाच्या) पूजेसाठी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे सोने, रूपे (चांदी) अथवा माती यांची मूर्ती बनवावी. यामध्ये कंजूषपणा करू नये.

यामध्ये सोने, चांदी अथवा माती यापासूनच मूर्ती बनवावी, असा स्पष्ट उल्लेख असल्याने याव्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे.

श्री गणेशाची पूजा कशी करावी? साहित्य कोणते असावे?, यासंदर्भात ज्यांना अधिक माहिती हवी असेल, त्यांनी सनातनचे ‘गणेश पूजा आणि आरती’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे अथवा ‘सनातन संस्थे’च्या www.Sanatan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

गणेश पूजा आणि आरती’ हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठीच्या मार्गिका

१. Android App : sanatan.org/ganeshapp

२. Apple iOS App : sanatan.org/iosganeshapp

हरितालिका  

भाद्रपद शुद्ध तृतीयेला म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणार्‍या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात. हे व्रत करण्यामागील शास्त्र आणि या व्रताचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.

इतिहास आणि उद्देश- पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.

व्रत करण्याची पद्धत- प्रातःकाळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पूजल्या जातात. रात्री जागरण करतात. दुसर्‍या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंग आणि मूर्ती विसर्जित करतात. हरितालिकेच्या पूजनाच्या वेळी 16 शक्तीस्वरूप नाममंत्रांचे पठण करत 16 पत्री शिवपिंडीवर वाहतात. त्यामुळे शिवपिंडीत शिवस्वरूप शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो. पत्रीपूजनातून अधिक प्रमाणात शक्तीची स्पंदने निर्माण होतात.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

संपर्क क्रमांक: 9920015949  

Continue reading

चला.. रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया!

श्रीराम जन्मभूमीवर 490 वर्षांच्या वनवासानंतर भव्य श्रीराममंदिर उभे राहत आहे. संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साहाचा संचार झाला आहे. अमेरिकेमध्ये हिंदूंकडून श्रीराम मंदिरानिमित्त फेर्‍या काढण्यात येत आहेत. संपूर्ण भारत राममय झाला आहे. 22 जानेवारी जशी जवळ येत आहे, तशी भारतियांमध्ये रामभक्तीची ज्योत अधिक तेजस्वीपणे...

‘काश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने…

विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. १९९०मध्ये काश्मीरच्या खोर्‍यात धर्मांधतेने कळस घातलेला असताना काश्मिरी पंडितांच्या नरकयातनांचे सत्यान्वेषण करणार्‍या या ‘काश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने.... १९९०मध्ये काय घडले? १९९०मध्ये काय घडले?, याविषयी दुर्दैवाने आधुनिक भारतीय पिढीला काहीही माहीत...

आपत्काळात अशी साजरी करा महाशिवरात्र!

देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. (या वर्षी ११ मार्च २०२१ या दिवशी महाशिवरात्र आहे.) उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची ३ अंगे आहेत. ‘माघ कृष्ण...
Skip to content