भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांची केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काल सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच नितीन नबीन यांनी ही घोषणा केली. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे केरळमध्ये तावडे यांच्याबरोबर निवडणूक सहप्रभारी असतील. केरळच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच तावडे यांच्यावर चंदीगडमध्ये होत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे पर्यवेक्षक म्हणूनही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बिहारमध्ये अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तावडे यांच्याकडे भाजपाचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत भाजपा सत्तेवर आली आहे.
भाजपाच्या संघटनात्मक कामात राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या आणखी दोन नेत्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यावर तेलंगणात येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष राहिलेले शेलार यांच्यावर नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकांचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुंबई महापालिकेत भाजपा-शिवसेना युतीला चांगले यश मिळाले असून भाजपाचा महापौर लवकरच मुंबईत दिसेल. राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक पारनामी आणि राज्यसभा सदस्य रेखा शर्मा तेलंगणामध्ये भाजपाचे निवडणूक सहप्रभारी असतील.
मुंबई भाजपात संघटनात्मक कार्य करणारे बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्यावर काल बेंगळुरू महापालिका निवडणुकीचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपाचे माजी राष्ट्रीय सरचिटणिस राम माधव या निवडणुकीत भाजपाचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. उपाध्याय यांच्यासमवेत भाजपाचे राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया बेंगळुरू महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे सहप्रभारी असतील.

