Homeमाय व्हॉईसमहापालिका निवडणुकीत ठाकरे...

महापालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा वाजला बँड! मिळाली जेमतेम 6 टक्के मते!!

संपूर्ण राज्यात झालेल्या २९ महानगरपालिकांच्या मध्ये एकंदरित २८६९ जागा आहेत. त्यापैकी शिवसेना (उबाठा) म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला फक्त १५५ जागांवर विजय मिळाला आहे. मुंबईवर राज्य करण्याच्या टिमक्या वाजवणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेला अख्ख्या महाराष्ट्रात फक्त तेरा जागांपर्यंत पोहोचता आले. हे कशाचे लक्षण आहे? मुंबई ठाकरेंच्या हातातून गेली. आता या महानगराच्या कारभारातील कोणत्याच समित्यांची अध्यक्षपदे सेना उबाठाकडे राहणार नाहीत. महापौरपद तर नाहीच नाही. ठाकरेंचा महापौर आता तिकडे दूर मराठवाड्यातील एका छोट्या मनपात दिसण्याची शक्यता आहे. या 65 जागांच्या क वर्गातील परभणी मनपात ठाकरेंनी 25 जागा घेतल्या आहेत तर त्यांच्याबरोबर तिथे युतीत लढणाऱ्या काँग्रेसने 12 जागा घेतल्या आहेत. त्यामुळे तिथे हे दोघे मिळून सत्तेत राहू शकतील. बाकी मुंबईत त्यांनी 64 जागा घेतल्याने त्यांच्याकडे इथे विरोधी पक्षनेता हे पद येईल. तोच काय तो ठाकरेंच्या पक्षाचा बरा आवाज दिसला आहे. ठाकरे ब्रँडचा दुसरा अर्धांश असणाऱ्या राज ठाकरेंकडे मुंबईत नगरसेवकपदाच्या फक्त सहा जागा आल्या असून ती त्यांच्या पक्षाची नीचांकी कामगिरी आहे. उद्धव ठाकरेंकडे राज यांच्या दसपटीने अधिक नगरसेवक आहेत. हे दोन्ही भाऊ मिळून भाजपा आघाडीच्या निम्यांपर्यंतच जेमतेम पोहोचले आहेत. ठाकरे ब्रँडचा मोठाच गाजावाजा या निवडणुकांत होत राहिला. पण त्या ब्रँडचे पूर्ण बारा वाजलेले आहेत.

नगरपालिका व नगरपंचायतींच्या पंधरा दिवस आधी झालेल्या निवडणुकांमध्ये ठाकरे उबाठाला फक्त नऊ शहरांमध्ये थेट निवडणुकीतील नगराध्यक्षपदे जिंकता आली होती. त्यांची नगरसेवकांची संख्या अल्पच राहिली. एकूण 288 नगरपालिकांमधील 6851 नगरसेवकांच्या जागांपैकी भाजपाने 2431 जिंकल्या. धनुष्यबाण मिरवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 1025 नगरसेवक आले तर सेना उबाठाला फक्त 244 पदे मिळाली. म्हणजे प्रमाण बघा! तीन टक्क्यांच्या आसपास नगरसेवकपदे उबाठाकडे आली. तोच घसरतीचा गणनाक्रम आता महापालिकांच्या पदांमध्येही सुरु राहिलेला दिसतो आहे. उबाठाची संख्या इथेही राज्याच्या मानाने अतिशय कमी जेमतेम पाच टक्के राहिली आहे. एकूण 2869 नगरसेवकपदांसाठी या निवडणुका झाल्या. त्यातील फक्त 153 जागा उद्धव ठाकरेंना मिळवता आल्या. उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पिंपरी चिंचवड, सोलापूर, मालेगाव, धुळे, सांगली, लातूर, नांदेड व जालना या सर्व मनपांमध्ये उबाठाची शून्य (0) कामगिरी झाली. ठाणे, जळगाव, पुणे, नगर, कोल्हापूर, चंद्रपूर व इचलकरंजी या सर्व मनपांमध्ये ठाकरेंच्या सेनेला प्रत्येकी एक (1) जागा मिळाली. नवी मुंबई, अकोला प्रत्येकी दोन (2), पनवेलला पाच (5), छ. संभाजीनगर, अमरावती व नागपुरात प्रत्येकी सहा (6), कल्याण-डोंबिवली 10, नाशिक 15, परभणी 25 (महापौरपद शक्य) आणि मुंबईत सर्वोच्च कामगिरी पण फक्त विरोधी पक्षनेतेपद (64) ठाकरेंच्या सेनेला मिळाल्या. मनसेला मुंबईत 6, कल्याण 5, नवी मुंबई, नाशिक, उल्हासनगरला प्रत्येकी एक जागा सोडता इतर सर्व 24 मनपांमध्ये भोपळाही फोडता आला नाही. त्यांना एकूण 13 जागा मिळाल्या.

मुंबईत त्यांनी 64 नगरसेवक सेना उबाठा नावावर आणि मशाल चिन्हावर निवडून आणले. त्यामुळे इथे त्यांची इज्जत वाचली म्हणता येईल. पण 25 वर्षांची अखंड सत्ता संपली. सद्दीही संपली. राज्यात शिवसेनेने भरारी घेतली होती, ती मुंबई मनपातील सत्तेच्या जोरावरच. मुंबई व मुंबईच्या वेशीवरचे ठाणे महानगर व संपूर्ण ठाणे जिल्हा, हा ठाकरेंचा बालेकिल्ला होता. खरेतर मुंबईच्या आधी ठाण्याचे नगराध्यक्षपद बाळासाहेब ठाकरेंना सतीश प्रधानांच्या रूपाने मिळाले होते. नंतर महापौरही अखंड शिवसेनेचाच येत राहिला. “जिथे सोनं वेचले तिथे गोवऱ्याही दुरापास्त” झाल्यासारखी आज ठाकरेंची अवस्था ठाण्यात आहे. ठाणे जिल्ह्यात कुठेही त्यांना चमक दाखवता आली नाही. ठाकरेंचे ‘ठाणे’दार एकनाथ शिंदे संपूर्ण पक्षच घेऊन बाहेर पडल्यानंतर झालेल्या पहिल्याच मनपा निवडणुकीत ठाकरेंना ठाणे अजिबातच सांभाळता आलेले नाही. नव्या ठाणे मनपा सभागृहात मातोश्रीचा केवळ एक नगरसेवक दिसेल. इथेही त्यांची मनसेबरोबर ठाकरे ब्रँडची युती होती. ठाकरेंचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव, हे दोन कथित चमकते, तळपते चेहरे या निवडणुकीत फिरत होते. पण मनसेला तर इथे शून्य जागा लाभल्या आहेत!

महानगरपालिकांमध्ये पुणे हे मुंबई, ठाण्याच्या खालोखालचे मोठे शहर. इथे नगरसेवकांची १६५ पदे आहेत. त्यातील केवळ एका जागेवर ठाकरे दिसले. बाकी सर्वत्र मशाल विझली! मनसेचा पुण्यातील स्कोअरदेखील शून्यच राहिला आहे. एक शून्य बाजीराव, अशी राज ठाकरेंची स्थिती आता झाली आहे. तीच स्थिती पिपंरी-चिंचवड या तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरात झाली आहे. पिंपरी-चिंचवड मनपात ठाकरे बंधुंच्या हाती मोठ्ठा भोपळा लागला आहे. हे असे का झाले, याचा विचार आता तरी ठाकरे करणार का? आता उद्धव व राज ठाकरेंची पुढची वाटचाल काय असणार? राज ठाकरे, पक्षस्थापनेनंतर २० वर्षांनी आपला पक्ष पुन्हा मातोश्रीच्या हवाली करण्यासाठी सेनाभवनात दाखल झाले होते का? त्यांची पावले तर या निवडणुकीत तशीच पडलेली दिसली. मग हे कथित विलिनीकरण राज पूर्ण करणार का? त्यांच्या पक्षाची दर निवडणुकीत अधिकाधिक अधोगती होताना दिसते आहे. एकही खासदार, आमदार वा विधान परिषद सदस्य त्यांच्या चिन्हावर सध्या नाही. तरीही, “भगवा गार्डची व मतदारांनाच फटाकवून काढण्याची” भाषा त्यांचे चिरंजीव अमित निवडणुकीच्या आदल्या दिवशी करत होते! पण त्या धमक्यांचा उलटाच परिणाम मुंबईकर मतदारांवर झाला असल्यास नवल नाही.

ठाकरे

चुका करण्याचा हा सिलसिला राज ठाकरेंनी असाच सुरु ठेवला तर लवकरच रामदास आठवलेंप्रमाणे राज ठाकरेही चमकदार बोलणारे नेते म्हणून फक्त उरतील! त्यांचा पक्ष अस्तित्त्व गमावून बसलेला असेल. लोकसभा व विधानसभांना सलग तीन-तीन निवडणुकांत शून्य कामगिरी करणाऱ्या राज ठाकरेंना जी थोडीपार आशा, मातोश्रीच्या आधाराने, मुंबईत गरजण्याची होती, तीही संपुष्टात आल्याने आता पुढच्या काळात “मनसे”कार काय करतील? जसे रामदास आठवले विनोदी कवितांसाठी प्रख्यात आहेत, तसे ठाकरे बंधु टोमणे व तिरकस जोक्ससाठी प्रसिद्धी मिळवतील! मात्र राजकीय पक्ष म्हणून त्यांचे दोघांचेही अस्तित्त्व लयाला जाण्याची भीती या निवडणुकीने दिसू लागली आहे. खरेतर असा कोणताच पक्ष संपत नसतो. काही ना काही रूपात कोणा ना कोणा नेत्याच्या माध्यमातून पक्ष जिवंत राहतो. पक्षाचे शीर्षस्थ नेते जनतेत मिसळले, लोकांशी बोलू लागले, लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर सरकारशी भांडू लागले तर तो पक्ष पुन्हा जिंवतही होतो. जसे मुंबईत ठाकरेंना चांगले यश मिळाले. कारण इथे दोन्ही ठाकरे बंधु गल्लोगल्ली फिरले. तसेच ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले असते तर आजचे चित्र निराळे आले असते.

मुख्यमंत्री फडणवीसांनी 35 सभा राज्यात घेतल्या. ते अनेक शहरांत जाहीर मुलाखती देत होते. सर्वत्र फक्त विकासाचीच भाषा करत होते. एकनाथ शिंदेंनी राज्यभरात 51 सभा घेतल्या. भाजपाचे प्रांताध्यक्ष रविन्द्र चव्हाण यांच्या भाषणाने लातूर मनपा भाजपाने हातची घालवली खरी, पण त्यांनीही राज्यभरात 35 सभा घेतल्या. हे महायुतीचे सारे नेते राज्य पिंजून काढत असताना, ठाकरे बंधुंनी जेमतेम चार सभा घेतल्या. त्यातील दोन मुंबईतच झाल्या. दोन मुंबईबाहेर झाल्या. बाकी ठिकाणी ते कुठेही गेलेच नाहीत. बरे, ते समजा फिरू शकले नाहीत तरी मनसेचे व सेना उबाठाचे दुसऱ्या, तिसऱ्या फळीचे नेते तरी कुठे फिरताना दिसले? तुमच्याकडे जी काही विकासाची संकल्पना असेल, व्हीजन असेल, ते तुम्ही जनतेला दाखवलीत तरच जनता मते देईल, हेच ठाकरे विसरलेत की काय? या २९ मनपांच्या निवडणुकांमध्ये एकूण २८६९ जागा होत्या. त्यापैकी भारतीय जनता पक्षाने तब्बल १४२५ जागी विजय मिळवला आहे. शरद पवारांची अवस्था दीन झालेली दिसली. जवळपास मनसेच्या जवळ जाईल असा त्यांचा वाईट परफॉर्मन्स निवडणुकीत दिसला. त्यांच्याकडे राज्यभरात मिळून फक्त ३५ इतकीच नगरसेवकपदे आली आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने काही मनपांमध्ये चांगल्या तर काहींमध्ये बऱ्या जागा मिळवल्यामुळे त्यांची संख्याही चारशेजवळ गेली. भाजपानंतर त्यांचाच क्रमांक राज्यात लागतो.

अजितदादांच्या राष्ट्रवादीने बहुतेक सर्व मनपांमध्ये भाजपाच्या विरोधात निवडणुका लढवल्या. एक-दोन ठिकाणी ते महायुतीत राहिले. त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांच्या रा.काँ.श.प.बरोबर आघाडी केली होती. जशी मुंबईत ठाकरे ब्रँडची हवा माध्यमांमध्ये चढवली, वाढवली गेली होती, टीव्हीवाले जिथे ठाकरे बंधु जातील त्या-त्या ठिकाणी त्यांच्या मागेच कॅमेरे घेऊन पळत होते, तसाच काहीसा “हाईप” करण्याचा प्रकार अजितदादा व शरद पवारांच्या या आघाडीच्या बाबतीत पुण्यात केला गेला. पण त्यांचा फुगा निकालात फुटला. शिंदेंनी मुंबई, ठाण्यासह काही महानगरपालिकांमध्ये भाजपाचे बोट धरून वाटचाल केली. त्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या. अजित पवारांनी भाजपाच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न केला. त्यांना मतदारांनी जागा दाखवली. पूर्ण राज्यात अजितदादांकडे नगरसेवकपदाच्या १६१ जागा आल्या आहेत. या सर्वात काँग्रेसचा झेंडा मात्र बऱ्यापैकी डौलदारपणाने फडकला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे दोर कापून टाकले. स्वबळाचा नारा दिला आणि आपल्या दलित, मुस्लीम व्होटबँकेला शाबूत ठेवण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीशीही गट्टी जमवली. आंबेडकरांनी मुंबईत सन्मानकारक जागा देण्याची मागणी केली होती. काँग्रेसने त्यांना तब्बल ६५ जागांचा नजराणाचा भेट दिला. पण आंबेडकरांना तितके उमेदवारही सापडले नाहीत! त्यांनी वीस जागा लढता येत नाहीत म्हणून काँग्रेसला परत करून टाकल्या! या घोळात त्या वीस-पंचवीस मतदारसंघात ना आंबेडकर लढले, ना काँग्रेस! त्या जागांवर उद्धव ठाकरेंना फायदा झाला असे दिसते. ठाकरेंना मुंबईत जागांची साठी ओलांडता आली त्यामध्ये आंबेडकर व काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, वर्षा गायकवाड यांची फसलेली वा मुद्दाम चुकवलेली रणनीतीच कामी आली आहे असेही दिसते.

शिंदेंची शिवसेना व काँग्रेस या मोठ्या पक्षांच्या बरोबरीने जागा राज्यभरात “इतर” या सदराखाली येणाऱ्या लहानमोठ्या पक्षांना लाभल्या आहेत. इतर पक्षांनी तब्बल ३३५ जागांची कमाई केली आहे. त्यातील प्रमुख आहे असुद्दीन ओवैसी यांचा हैद्राबादेतून महाराष्ट्रात घुसलेला पक्ष एआयएमआयएम. त्यांनी अनेक शहरांत मोठी मुसंडी मारली असून तब्बल 125 नगरसेवक पतंग चिन्हावर निवडून आणले आहेत. मुंबईत त्यांनी नऊ जागा घेतल्या तेव्हा मनसे फक्त सहावरच थांबली आहे, हेही खूप महत्त्वाचे आहे. मुंबईसह, छत्रपती संभाजी नगर, नांदेड वाघाळा, भिवंडी, मालेगावात मोठी मजल मारली. महाराष्ट्रात त्यांचा जम बसल्याचे दिसते. महाविकास आघाडीच्या फाटाफुटीचाही मोठा लाभ एमआयएमला झालेला आहे. मागील वेळी मविआमधील ठाकरेंकडे गेलेली मुस्लीम मते आता एमआयएमकडे वळल्याचाही निष्कर्ष यातून निघतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

विलासरावांवर बोलण्याइतके या चव्हाणांचे कर्तृत्त्व तरी आहे का?

राजकारणात कधी काय बोलावे हे अनेकांना समजते. पण कधी काय बोलू नये हे फार कमी लोकांना समजते. भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष रविन्द्र चव्हाण यांनी स्वतःचा वावदुकपणा अशा नको ते बोलण्यातून सिद्ध केला आहे. सरत्या स्पताहात त्यांनी बोलताना दोन मोठ्या...

मुंबई-मराठीच्या नावाने गळे काढून पक्ष जगवण्याची ठाकरेंची धडपड

जनतेला बुचकळ्यात पाडणाऱ्या युत्या-आघाड्यांचे पेव सर्वत्र उठलेले असताना, येणाऱ्या १५ जानेवारी रोजी करायच्या मतदानात, नेमके कोणते बटण दाबायचे या संभ्रमात मतादर अडकला आहे. चित्रविचित्र युत्यांच्या साठमारीत रडणारे उमेदवार आपण पाहिले. ज्यांना तिकिटे मिळालीच नाहीत असे निराश, हताश झालेले कार्यकर्ते...

अजूनही शून्याच्या गर्तेत अडकले महाराष्ट्रातले विरोधी पक्ष

रविवारी निवडणुकीची मतमोजणी सहसा होत नाही. यावेळी ती झाली. याचे कारण आधीच निकाल लांबले होते, त्यात आणखी उशीर नको होता. २ डिसेंबरला मतदान होऊन गेलेल्या दोनशेहून अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतींमधील राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि उमेदवार सारेच निकाल...
Skip to content