महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि मुंबईतल्या भाडेकरूंचे लोकप्रिय नेते राज के पुरोहित यांचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्याशी माझे संबंध 35 वर्षांपेक्षा जास्त काळाचे. त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी म्हणून काम करतानाच्या खूप आठवणी आहेत. त्यातल्या काही प्रकर्षाने सांगाव्याशा वाटतात.
1987 साली विद्यार्थी चळवळीत काम करत असताना आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक व्याख्यानमाला मारवाडी विद्यालयात आयोजित केली होती. तिचं उद्घाटन राज के. पुरोहित यांनी केलं. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याशी गप्पा रंगल्या असता त्यांनी विचारलं- काय म्हणताहेत भवन्स कॉलेजच्या निवडणुका? माझी कीर्ती त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचे बघून मला आश्चर्याचा धक्का बसला.तुझ्यासारख्या फायरब्रँड विद्यार्थी नेत्याने राजकारणात प्रवेश केला पाहिजे. कुठलंही काम असेल तर बेधडक माझ्याकडे ये.
काही दिवसांनी गिरगावातल्या एका शाळेत हिंदू संस्कृतीवर आधारित कार्यक्रम करण्याची परवानगी मागण्यासाठी आम्ही प्रिन्सिपॉलकडे गेलो असता त्यांनी चक्क “आम्ही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देत नाही” असं म्हणून नकार दिला. मी राज के पुरोहित ह्यांना जाऊन भेटलो आणि झाला प्रकार सांगितला. त्यांनी लगेच ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि मला घेऊन शाळेत आले. मुंबई महानगरपालिकेतले भारतीय जनता पक्षाचे गटनेते असलेले नगरसेवक राज के पुरोहित आले म्हणून प्रिन्सिपॉलनी त्यांचं स्वागत केलं आणि विचारलं “साहेब काय काम काढलंत?” त्यावर राज के पुरोहित तडक म्हणाले की “आपण आजकाल शाळा अधार्मिक तत्त्वांवर चालवत आहात आणि त्यामुळे आपण धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देत नाही, असे माझ्या कानावर आले आहे”. त्यावर प्रिन्सिपॉल खजील झाले. मला पाहिल्यावर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. प्रिन्सिपॉलनी हात जोडले आणि आपली चूक कबूल करत आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देऊन टाकली.

1988मध्ये, भारतीय जनता पक्ष – दक्षिण मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष मनोहर फडके यांच्याबरोबर मी, राज के पुरोहित ह्यांच्या काळबादेवीला असलेल्या कार्यालयात गेलो होतो. मला पाहताच ते म्हणाले- “राघवेंद्र आपका राजनीति में स्वागत है”. मी त्यांना हसून म्हटलं की, मी अजूनकाही राजकारणात प्रवेश केलेला नाही. त्यावर ते मिश्किलपणे म्हणाले की “अ डायनामिक स्टुडंट लीडर लाईक यु इज बाय डिफॉल्ट अ पॉलिटिशिअन”. त्यावर कार्यालयात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच हंशा पिकला.
1990 साली विधानसभेच्या निवडणुकीत राज के पुरोहित मुंबादेवी मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक ठाकूरद्वारच्या गायत्री हॉटेलजवळ आली होती. ते उघड्या जीपमध्ये होते. रस्त्याच्या कडेला जमलेल्या बघ्यांच्या गर्दीत मी उभा होतो. त्यांचं जेव्हा माझ्याकडे लक्ष गेलं, तेव्हा ते जीपमधून उतरून खाली आले. माझा हात धरून घेऊन गेले आणि स्वतःच्या बाजूला जीपमध्ये उभं केलं. स्वतःच्या गळ्यातल्या हारांपैकी एक हार माझ्या गळ्यात घातला. सगळे बघतच राहिले. मला मात्र थोडंसं ओशाळल्यासारखं झालं.
आज 35 वर्षांनी त्याच स्थानाकडे एक यात्रा आली. मीही त्या यात्रेचा साक्षीदार झालो. पण 35 वर्षांपूर्वीची यात्रा राज के पुरोहित ह्यांची “विजय मिरवणूक” होती.आणि आजची ही यात्रा होती त्यांची अंत्ययात्रा. 35 वर्षांपूर्वीचं ते गायत्री हॉटेल कधीच बंद झालं आहे. ठाकूरद्वार नाक्यावर पस्तीस वर्षांपूर्वी असलेली चेतना आता नाहीशी झाली आहे. राज पुरोहित यांच्यातली चेतनाही अनंतात विलीन झाली आहे… उरल्या आहेत त्या फक्त त्यांच्या मन सुन्न करणाऱ्या आठवणी…

