Homeब्लॅक अँड व्हाईटबेरंग झाली 'अॅशेस‌'...

बेरंग झाली ‘अॅशेस‌’ मालिका!

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बलाढ्य संघात नुकतीच झालेली, क्रिकेटविश्वात प्रतिष्ठेची म्हणून ओळखली जाणारी आणि शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेली, अशी मोठी पंरपरा लाभलेली पाच कसोटी सामन्यांची “अॅशेस” मालिका अगदीच एकतर्फी झाली. वास्तविक या मालिकेत रंगदार लढतीची अपेक्षा होती. पण यजमान ऑस्ट्रेलियाने फलंदाजी आणि गोलदांजी या खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात आपले वर्चस्व सिद्ध करून पाहुण्या इंग्लंड संघाला विजयाची फारशी संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी आरामात या मालिकेत बाजी मारली. अवघ्या ११ दिवसात‌ ३ कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका सहज खिशात टाकली. दोन कसोटी सामने तर अवघ्या दोन दिवसात संपले. त्यामुळे क्रिकेटचाहत्यांची मात्र चांगलीच निराशा झाली. इंग्लंडने चौथी कसोटी जिंकून “व्हाईटवॉश” टाळण्यात यश मिळवले हीच त्यांच्यासाठी थोडीफार जमेची बाजू म्हणावी लागेल. एरवी यजमान ऑस्ट्रेलियाचे चार सामन्यात पूर्ण वर्चस्व राहिले.

२०१०-११नंतर इंग्लंड‌ संघाला ऑस्ट्रेलियात अद्याप एकही मालिका जिंकता आली नाही. ऑस्ट्रेलियन‌ कर्णधार कमिन्स पूर्ण तंदुरूस्त नसल्याने या मालिकेत अवघा एक कसोटी सामना खेळला. त्यांचा दुसरा अनुभवी तेज गोलंदाज हेजलवुड दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकला. ते दोन ‌प्रमुख गोलंदाज नसतानादेखील इंग्लंडच्या फलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही. या मालिका विजयामुळे ऑस्ट्रेलियाने २०२७ साली होणाऱ्या “टेस्ट चॅम्पियन्सशिप”ची फायनल गाठण्याच्या दृष्टीने आपला दावा भक्कम केला आहे. गेल्या ८पैकी ७ कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. घरचे मैदान, प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा, फलंदाजी आणि गोलदांजी या खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात सात्यतपूर्ण शानदार कामगिरी, अनुभवी खेळाडूंची चमक, योग्य व्यूहरचना या साऱ्याच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत लीलया बाजी मारली. एक समतोल कसोटी संघ म्हणून ऑस्ट्रेलियन संघ पुढे येत आहे, ह्यात शंका नाही.

ऑस्ट्रेलियाचा बुजूर्ग डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजाची ही शेवटची कसोटी मालिका होती. ही मालिका जिंकून उस्मानला त्याच्या संघ सहकाऱ्यांनी मालिका विजयाची गोड भेट दिली. तेज गोलंदाज स्टार्क आणि फटकेबाज‌ फलंदाज हेड, हे दोघे त्यांच्या विजयाचे शिल्पकार होते. स्टार्कने ३१ बळी घेऊन सातत्याने प्रभावी मारा करुन इंग्लंड फलंदाजांना जेरीस‌ आणले. त्याने सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी चिवट फलंदाजी करुन आपले अष्टपैलूत्व‌ सिद्ध करून दाखवले. त्याने दिडशेपेक्षा जास्त धावा या मालिकेत केल्या. त्याने एकतीस बळी घेऊन गिफिन, लिली, जॉन्सन यांच्या पंक्तीत तो बसला. गिफिनने ३४, लिलीने ३९, जॉन्सनने ३७, असे एकाच अॅशेस मालिकेत ३०पेक्षा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला होता. स्टार्कला मालिकावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा मालिकावीर पुरस्कार मिळवला. कसोटी मालिकेत स्टार्कची ही सर्वोतम कामगिरी होती. याअगोदर त्याने २०१६मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांच्या मालिकेत २४ बळी घेतले होते. हेड इंग्लंडसाठी चांगलाच डोकेदुखी ठरला. त्याने या मालिकेत ६२९ धावा‌ काढल्या. कठिण समयी तो ऑस्ट्रेलियाच्या मदतीला धावून आला. त्यानेच बऱ्याच सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा घास हिरावून घेतला. त्याला शेवटच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने कसोटीत ११ वेळा सामनावीर पुरस्कार पटकाविला आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने ३ कसोटीत सामनावीर पुरस्कार मिळवला.

२०००नंतर अॅशेस‌ मालिकेत ६००पेक्षा जास्त धावा करणारा‌ तो ऑस्ट्रेलियाचा केवळ दुसरा फलंदाज ठरला. याअगोदर त्यांच्या स्टीव्ह स्मिथने दोन वेळा असा पराक्रम केला होता. दोन हजारनंतर चौथ्यांदा यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची मालिका चार किंवा जास्त कसोटी सामने जिंकून सहज मालिका विजय मिळवला. मेलबर्न कसोटीत इंग्लंडने तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर विजय मिळवत अखेर आपले ऑस्ट्रेलियन भूमीत परत एकदा विजयाचे खाते उघडले. ५४६८ दिवसानंतर इंग्लंडने पुन्हा विजय साजरा केला. हा विजय सोडता मालिकेत पाहुण्यांची कामगिरी अत्यंत सुमार होती. खासकरुन त्यांचा फलंदाजांनी पार निराशा केली. सातत्याने कुठलाच‌ एकही फलंदाज मालिकेत आपला ‌ प्रभाव पाडू शकला नाही. क्रावली, डकेत ही सलामीची जोडी चांगली सुरूवात करुन देण्यात अपयशी ठरली. त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे अर्धी लढाई इंग्लंड संघ तिथेच हरला. त्यामुळे मग गोलंदाजाच्या हातात फारसे काही राहिले नाही. खराब फटके मारुन बऱ्याचवेळा त्यांच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला आपल्या विकेट बोनस म्हणून दिल्या. दीर्घ काळ खेळपट्टीवर उभे राहण्याचा फारसा प्रयत्नच त्यांच्या फलंदाजांनी केला नाही. खेळपट्टया म्हणाव्यात एवढ्या धोकादायक नक्कीच नव्हत्या. पण इंग्लंड फलंदाजांनी संयम दाखवला नाही. तसेच तंत्रात ते नक्की कमी पडले. बॅझबॉलसारखी आक्रमक शैली कसोटीत कामाची नाही हे या मालिकेत बघायला मिळाले. इंग्लंड संघाचा हा पराभव कसोटी सामन्यांसाठी नक्कीच धोक्याचा इशारा आहे. गेल्या १० कसोटीत इंग्लंडला अवघे ३ सामनेच जिंकता आलेत. ६ सामन्यात त्यांना हार खावी लागली. अवघा १ सामना त्यांना अनिर्णित राखता आला. गेल्या सलग ४ कसोटी मालिकेत त्यांना पराभव पत्करायला लागलाय. नवे प्रशिक्षक मॅक्युलम इंग्लंड संघाला फारशी उभारी देऊ शकले नाहीत.

इंग्लंड‌च्या या दारुण पराभवाबाबत त्यांच्या आजी-माजी खेळाडूंनी संघव्यवस्थापन, प्रशिक्षक आणि सहाय्यक स्टाफ यांना लक्ष्य केलेय. तेव्हा मुख्य प्रशिक्षक मॅक्युलम आणि त्यांचा सहाय्यक स्टाफचे काही खरे नाही. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी इंग्लंडने काय तयारी केली होती हाच खरा प्रश्न इंग्लिश क्रिकेट वर्तुळात सध्या चर्चिला जात आहे. ईसीबी या दौऱ्याच्या कामगिरीची गंभीर दखल घेणार का हा खरा प्रश्न आहे. या दौऱ्यातून इंग्लंड क्रिकेट संघ काय बोध घेतो ते येणारा काळच ठरवेल. १८७७ साली उभय संघात ऐतिहासिक पहिला कसोटी सामना मेलबर्न स्टेडियममध्ये खेळला गेला. तो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. अॅशेस मालिकेला १८८२ साली सुरूवात झाली. तेव्हादेखील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियन संघानेच जिंकला होता. उभय संघात आतापर्यंत एकूण ३६६ कसोटी सामने झाले. त्यात ऑस्ट्रेलियाने १५६ तर इंग्लंडने ११३ सामने जिंकले. ९७ सामने अनिर्णित राहिले. आता उभय संघात २०२७मध्ये इंग्लंडमध्ये ही मालिका परत होईल. त्यावेळी तरी इंग्लंड संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा करुया.

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

रवींद्र जडेजाची जादू संपली! आली निरोपाची वेळ!!

पाहुण्या न्युझीलंड क्रिकेट संघाने भारताविरुद्ध झालेली ३ सामन्यांची वन डे मालिका २-१ अशा फरकाने जिंकून भारतभूमीत पहिल्यांदा असा पराक्रम करुन यजमान भारतीय संघाला आणखी एक धक्का दिला आहे. गतवर्षी त्यांनी भारताला कसोटी मालिकेत त्यांच्याच घरच्या मैदानावर ३-० असा "व्हाईटवॉश"...

भारतीय फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी फक्त खुर्चीच्या राजकारणात!

‌विश्व चषक फुटबाॅल स्पर्धेसाठी अवघ्या दीड लाखाची लोकसंख्या असलेला कुराकाओ हा छोटा देश पात्र ठरतो आणि या स्पर्धेच्या इतिहासात नव्या विक्रमाला गवसणी घालतो. त्याउलट आज महासत्तेकडे झेप घेण्याची स्वप्न बघणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा भारताचा फुटबाॅल संघ २०२६मध्ये...

वाढलेल्या गवतामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला ८० कोटींचा फटका!

कसोटी क्रिकेट विश्वात १०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा मोठा इतिहास असलेल्या प्रतिष्ठेच्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघात ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या अॅशेस मालिकेत जगप्रसिद्ध मेलबर्न स्टेडियममध्ये झालेला चौथा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला आणि क्रिकेटविश्वात कसोटी‌ सामन्यांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरु...
Skip to content