Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई मराठी माणसाचीच!...

मुंबई मराठी माणसाचीच! पण मराठी माणूस ठाकरे बंधूंचा आहे का?

मुंबई आणि मराठी माणूस हे नाते भावनिक आहे. या भावनिक नात्यावर गेली कित्येक वर्षे मुंबईचे राजकारण चालते. देशात जो राजकीय कल असतो तो मुंबईत लोकसभा निवडणुकीत परावर्तित होतो. अपवाद गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा. त्या निवडणुकीत ठाकरे यांच्या पाठीशी असलेल्या मराठी मतांमध्ये काँग्रेस पक्षाची तथाकथित धर्मनिरपेक्ष मते जमा झाली आणि दोन आघाड्यांमध्ये जनमत विभागले. विधानसभा निवडणुकीत मात्र राज्य पातळीवर जो कौल होता तोच मुंबई शहरात परावर्तित झाला. आता मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा वरचष्मा राहील असा विषय पुढे आला आहे. त्रयस्थपणे विचार करताना मी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात केवढी रक्कम आहे हा विषय महत्त्वाचा मानत नाही. राजकीय पक्ष किंवा नेते अर्थसंकल्पात असलेल्या योजनांमध्ये हात मारतात अशा स्वरुपाची ही चर्चा आहे. त्यावर काही भाष्य करणे तितकेसे योग्य नाही. फक्त मुंबई कोणाच्या ताब्यात राहावी एवढाच भावनिक मुद्दा आहे.

मराठी

बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबई शहरावर दीर्घकाळ प्रभाव राहिला. त्याचा परिणाम ठाणे भागातही जाणवला. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात झालेला असला तरी पुण्यात त्यांच्या शिवसेनेस मिळालेले यश कायमच मर्यादित राहिले. उद्धव ठाकरे यांना तर पुण्यात फारसा रस नसावा अशी परिस्थिती आहे. भाजपशी युती असण्याचा फायदा पुण्यात शिवसेनेस मिळाला, किंवा दोन पक्ष एकत्र आल्याने दोघांनाही लाभ झाला असे म्हणता येईल. आता ठाकरे बंधू एकत्र होताना दिसत आहेत ते मुख्यतः मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात राहवी यासाठी. पण यावेळी संदर्भ वेगळे आहेत. मुंबई महानगरपालिका ठाकरे यांच्या ताब्यात जाण्याआधी तिथे काँग्रेस आणि काही काळ कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव होता. पूर्वीच्या जनसंघाची ताकद कुठकुठे होती. २०१२च्या महानगरपालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेना असताना बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत फारशी चांगली नसतानादेखील त्यांनी दोन सभा घेतल्या किंवा त्यांना घेणे भाग पडले. त्या भावनिक वातावरणाचा फायदा झाला आणि मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमध्ये शिवसेनेची सत्ता राहिली. २०१७च्या निवडणुकीत मात्र भाजपने मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळविले. तरीही सत्ता मात्र शिवसेनेच्या ताब्यात दिली. अर्थात तेव्हा शिवसेना एकत्र होती हा संदर्भ महत्त्वाचा.

मराठी

आज परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेचे विभाजन झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव राहिले आहे, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. आता उद्धव आणि राज एकत्र आले आहेत असे दिसते. त्यांनी मराठीचा भावनिक मुद्दा केला आहे. केवळ त्याच विषयावर निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस आहे असे दिसते. यावरुन मराठी हा एक विषय निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल असे वाटते. पण तो अस्मितेचा विषय करता येईल एवढा मसाला ठाकरे यांच्या हाती आहे असे वाटत नाही. मुंबईवर परप्रांतीय आक्रमण करतील हा प्रचार नव्या सहस्रकाच्या प्रारंभी होता. तो काँग्रेसच्या बाबतीत येत होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कृपाशंकर सिंग हे मूळचे उत्तर प्रदेशचे नेते गृहराज्यमंत्री होते. त्यांचा मोठा प्रभाव होता. पुढेमागे काँग्रेसच्या राज्यात उत्तर प्रदेशी नेता महाराष्ट्रात मुख्यमंत्री होईल ही एक छुपी भीती होती. त्याचा फायदा ठाकरे यांना झाला होता. मुंबई काँग्रेसच्या ताब्यातून निसटण्यास जी कारणे झाली त्यामध्ये हे एक कारण होते. आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. पण भाजपच्या राजकारणातील बारकावे काँग्रेसच्या नेत्यांना त्या काळात जमले नाही. मराठी आणि उत्तर प्रदेशी असा समन्वय काँग्रेसने कधी साधला नाही. याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षात राष्ट्रीय पातळीवर धोरणात सुसूत्रता नसे. हंगामी पद्धतीने राजकारण केले जात असे.

मराठी

काँग्रेसचा प्रभाव होता त्या काळात उत्तर प्रदेशी आणि बिहारी लोकांच्या बाबतीत असलेल्या तिरस्काराच्या वातावरणाचा फायदा एकत्रित शिवसेनेस होत असे. महाराष्ट्राच्या इतर भागातही परप्रांतीय लोकांच्या बाबतीत तसेच वातावरण होते. आज शिवसेनेच्या दोनही गटांनी हे मुद्दे सोडले आहेत. महाराष्ट्रात छटपूजा हा विषयदेखील वादाचा असे. राज ठाकरे तर छटपूजा कशी करता ते बघतो असे म्हणत. आता परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार केला. महाराष्ट्रातील बिहारी लोकांना एक आश्वासक वातावरण त्यामुळे लाभले. हा वर्ग आगामी निवडणुकीत मुंबई आणि ठाणे परिसरात महायुतीच्या बाजूला निश्चितपणे राहील. पण ठाकरे हे काही या वर्गाच्या विरोधात उभे नाहीत. त्या भावनिक वातावरणात मराठी लोकांना एकत्र करण्याची त्यांची धडपड आहे असे दिसत नाही. याऊलट भाजपने योग्य असा समन्वय साधला असून मराठीविरोधी परप्रांतीय असा कोणताही मुद्दा निवडणुकीत येऊ नये एवढी काळजी भाजपकडून घेतली जाईल असे दिसते. देवेंद्र फडणवीस हेच एनडीएचा मुख्य चेहरा आगामी महानगरपालिका निवडणुकीत राहणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुंबई आणि ठाणे भागात स्थानिक परिस्थिती कशीही असली तरी भाजपशी जमवून घेणे हेच फायद्याचे आहे.

मराठी

निष्कर्ष काढायचा तर भाजपला मुंबई आणि ठाणे भागात मोठे पाठबळ असल्यामुळे आणि ठाकरे बंधूंना प्रतिकार करण्यासाठी मराठी मराठी माणसांची अधिक मदत होणार आहे. त्यामुळे दोनही बाजूंकडून मराठी माणसाच्या हिताचे रक्षण कसे होईल हेच बघितले जाईल. उत्तरेकडील बहुतेक सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता असल्यामुळे मुंबईत स्थायिक झालेले तेथील नागरिक भाजपच्या पाठीशी उभे राहण्यात आपले हित बघतील. दुसरीकडे परप्रांतीय लोकांच्या बळावर निवडणूक लढवून मुंबईत आपली मांड बसवावी असे वाटणारा एकही पक्ष नाही. समाजवादी पक्ष आपल्या अल्प पाठिंब्यावर दोनचार जागा मिळवील एवढेच. यामुळे स्थानिक आणि परप्रांतीय असा वाद मुंबईत निर्माण होणार नाही आणि त्याचवेळी मराठी माणसाचाच प्रभाव मुंबई शहरावर राहील ही जमेची बाजू. फक्त ठाकरे बंधूंसाठी परिस्थिती फारशी सकारात्मक आहे असे आजतरी दिसत नाही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मुलामुलींसाठी आधी करिअर की लग्न?

मी एका विवाहविषयक काम करणाऱ्या संस्थेत काम केलेले आहे. मासिकात विवाहोत्सुक मुलामुलींची माहिती प्रसिद्ध होत असे. त्यावरुन अनुरुप स्थळाचा पत्ता मिळत असे. हजारो लग्नं (विवाह) त्या माध्यमातून जमले. दोन दिवसांपूर्वी कोणा जाणकार व्यक्तीने विवाहाचे वय किती असावे, म्हणजे किती...

शरद पवार आणि न संपणारी काँग्रेस!

भारतीय राजकारणात डावपेच जाणणारे सर्वात अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांच्या नावाची सतत चर्चा असते. किंबहुना चर्चेत कसे राहायचे याची कला शरद पवार यांना चांगली अवगत आहे. त्यातही पुण्यात कधी आणि कुठे बोलले की भरपूर प्रसिद्धी मिळते, याचे गणितदेखील...
Skip to content