Homeटॉप स्टोरीराज्य सरकारकडून कृषी...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा यंत्रांसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पुढील ३ वर्षांसाठी ५ हजार ६६८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या अनुषंगाने कृषी विभागाने राबविलेली ही कृषी समृद्ध योजना शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाच्या कृषि विभागाच्या प्रचलित योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी आणि मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन हे घटक अधिक विस्तृत स्वरुपात राबवून जास्तीतजास्त लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्याच्या दृष्टीने त्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजनेत ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे. यामध्ये २५ हजार रुंद सरी वरंबा यंत्रासाठी १७५ कोटी, १४ हजार वैयक्तिक शेतळ्यासाठी ९३ कोटी, शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी ५ हजार कोटी आणि ५ हजार ड्रोनसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्र पुरवणे, जैविक निविष्ठ निर्मिती केंद्र उभारणे, प्लास्टिक अस्तरीकरण, शेततळे, एकात्मिक कीड नियंत्रण, अन्नद्रव्य घटक व्यवस्थापन, मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणी, शेतीसाठी ड्रोन या आदी बाबींचा समावेश आहे, असे भरणे म्हणाले.

राज्यभरात २५,००० बीबीएफ यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी एक यंत्र दर हंगामात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर काम करू शकते. परिणामी २५ लाख हेक्टर क्षेत्रावर ही पद्धत लागू करता येईल. तसेच बियाण्याचा वापर ३०-४० टक्के कमी आणि उत्पादनात १५-२० टक्के वाढ अपेक्षित असून यंत्राच्या किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ७० हजार रुपये देण्यात येणार आहे. राज्यात १४,००० शेततळ्यांच्या बांधकामासाठी मान्यता दिली गेली आहे. त्याचसोबत, काळी चिकणमाती असलेली जमीन प्राधान्याने निवडली जाईल. वाहत्या पाण्यात किंवा दलदलीच्या भागात कुंड्या घेता येणार नाहीत. यामध्ये शेडच्या आकारानुसार १६ हजार ८६९ ते १ लाख ६७ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारने २ हजार ७७८ शेतकरी सुविधा केंद्रे उभारण्यास मान्यता दिली आहे. प्रत्येक केंद्रासाठी सरासरी प्रकल्प खर्च ३ कोटी रुपये असून कमाल सरकारी अनुदानमर्यादा १ कोटी ८० लाख रुपये ठेवण्यात आले आहे. यामध्ये मृद परीक्षण प्रयोगशाळा, जैविक खत उत्पादन केंद्र, भाडेतत्त्वावर अवजारे व ड्रोन उपलब्धता केंद्र, गोडाऊन व शीतसाखळी सुविधा, कीडनियंत्रण सामग्री व अन्नद्रव्य घटक याचा समावेश आहे. या नव्याने उभारण्यात येत असलेल्या शेतकरी सुविधा केंद्रांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच, केंद्र शासनाच्या नमो ड्रोन दिदी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन याअंतर्गत राज्यात ५ हजार कृषी ड्रोन अनुदानावर दिले जातील. यामध्ये, ड्रोन किमतीच्या ५० टक्के किंवा ८ लाख रुपये अनुदान कृषी पदवीधरांना दिले जाईल. इतर लाभार्थ्यांना ४० टक्के किंवा ४ लाख रुपये अनुदान दिले जाईल आणि ड्रोन खरेदीसाठी, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

योजनेसाठी कोण पात्र?

२०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून अर्जदार राज्यातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याकडे अॅग्रीस्टॅक फार्मर नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्याने कृषी विभागाच्या महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज केल्यावर प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ या तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना डीबीटीतून थेट बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या महाडीबीटीवर अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

डॉक्टरांचा संप, वाहतुकीचा खेळखंडोबा ते जरांगेंना नोटीस!

काम करताकरता अचानक संपावर जाणारे डॉक्टर, वाहतुकीचा खेळखंडोबा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना नोटीस.. मुंबई आणि महाराष्ट्र, हे एक असे क्षेत्र आहे जिथे प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन घडत असते. या धावपळीच्या जीवनात, राजकीय वादविवादांपासून ते रस्त्यावरील सामान्य माणसाच्या...
Skip to content