दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत साधारण 5 कोटी रुपये आहे. सिलिकॉन सीलंट गनच्या कव्हर कार्गोसह हा साठा जप्त करण्यात आला आहे.
14 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी तुतीकोरिन येथे आयातदाराला अटक केली. पुढील तपासानुसार, चेन्नई आणि तुतीकोरिन येथून आणखी तीन व्यक्तींना ( दोन मुंबईतील) अटक करण्यात आली आहे. सर्व चार आरोपींना या तस्करी प्रकरणात त्यांच्या संशयित भूमिकेसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

फटाक्यांची आयात ही परराष्ट्र व्यापार धोरणातील आयटीसी (एचएस) वर्गीकरणानुसार प्रतिबंधित असून यासाठी विदेश व्यापार महासंचालनालय आणि पेट्रोलियम आणि खोटके सुरक्षा संस्था यांच्याकडून स्फोटक नियम, 2008 अंतर्गत परवाना घेणे आवश्यक आहे. अशी बेकायदेशीर आयात आणि खोटी बतावणी केवळ परराष्ट्र व्यापार आणि सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन नाही तर फटाक्यांच्या अत्यंत ज्वलनशील स्वरूपामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि बंदराच्या पायाभूत सुविधांना गंभीर धोका निर्माण करते. त्यामुळे फटाक्यांच्या तस्करीवर महसूल गुप्तचर संचालनालय बारकाईने लक्ष ठेवून असते.