Homeटॉप स्टोरीपुणेकरांची करोडोंची होणारी...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची “दिवाळी लूटमार” यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक आणि घरगुती अनियमितता, अतिरिक्त बांधकाम, परवाना तपासणी, नॉन-ट्रेड झोनचा वापर, फायर फायटर अशा एक ना अनेक त्रुटी दाखवून प्रत्येकी 500-1,000 रुपयांपासून तीन-पाच हजार ते कितीही, अशी ग्राहक बघून गेली अनेक वर्षे “दिवाळी लूटमार” केली जात होती. दररोजचा हा शहरभरातील वसुलीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाणारा होता. आता पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे, अशा भामट्यांकडून होणारे आर्थिक लुबाडणुकीचे हे प्रकार यंदापासून बंद होणार आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्त, उपयुक्त आणि काही कर्तव्यदक्ष, जागरूक प्रशासनिक अधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायला हवेत.

यासंदर्भात गेले काही वर्षे महापालिका प्रशासनासह, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री ते थेट उपमुख्यमंत्री-मुख्यमंत्री यांच्यापर्यंत तक्रारी जात होत्या. अर्थात, निनावी आणि तोंडी तक्रारी असल्याने त्यावर कधी काही कार्यवाही झाली नाही. बाल्कनीत केलेले बांधकाम, अतिरिक्त भिंत, टेरेसवर अनधिकृत शेड अशा कारणांमुळे अनेक नागरिकही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते. विशेष म्हणजे, महापालिकेतच कार्यरत एक टोळी आणि काही कर्मचारी या भामटेगिरी अन् पुणेकरांच्या दिवाळी लुटमारीत सामील असल्याचेही आरोप केले जात होते. अर्थात, तसा कोणताही पुरावा समोर आला नाही. मात्र, यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः यात लक्ष घातले. महापालिका आयुक्तांसह टॅक्स विभाग व सर्व विभागाचे प्रमुख, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन हे प्रकार थांबविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

दिवाळी

टॅक्स विभागाचे बनावट आयकार्ड दाखवून केली जात होती दिवाळी लूटमार!

भामट्यांची ही टोळी एकाचवेळी शहरातील सर्व भागात विखरून वसुली करायची. त्यासाठी भागनिहाय वसुलीसाठी बोली लागत होती, अशाही चर्चा आहेत. हे भामटे महापालिकेच्या टॅक्स विभागातील कर्मचारी-अधिकारी असल्याचे बनावट आयकार्ड दाखवायचे. ते खरे समजून व्यावसायिक, सर्वसामान्य पुणेकर नागरिक प्रतिसाद द्यायचे आणि घाबरून केस न करता “मिटवामिटवी”साठी तडजोड रक्कम मान्य करून भामट्यांना रोखीत द्यायचे. त्यासाठी कुठलीही पावती वैगेरे दिली जात नव्हतीच. यंदा हे सर्व पूर्णतः थांबणार आहे, कारण महापालिकेचे बनावट ओळखपत्र बनवणे आता शक्य नाही. पुणेकर व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी फक्त अशी वसुली करायला कुणी आले की, त्याच्याकडे पालिकेचे ओळखपत्र मागायचे आहे! आता महापालिकेचे ओळखपत्र पूर्वीसारखे साधे फोटो चिकटवून गोल शिक्का मारलेले नाही. तशा ओळखपत्रात सहज बनावटगिरी व्हायची. भामटे बनावट शिक्के बनवून घेऊन, महापालिकेच्या टॅक्स विभागातील असल्याचे बनावट ओळखपत्र बनवून घ्यायचे. आता तसे या भामट्यांना आणि लुटारू टोळीला आजिबात शक्य नाही.

पुणे महापालिकेच्या ओळखपत्राची बनावट नक्कल करणे आता का शक्य नाही?

चंद्रकांतदादा पाटील आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बनावट ओळखपत्राची बाब गांभीर्याने घेतल्यानंतर गेले दोन-तीन वर्षे महापालिकेत नव्या अल्ट्रा-स्मार्ट ओळखपत्र योजनेवर काम सुरू आहे. आता पुणे महापालिकेच्या सर्वच अधिकारी-कर्मचारी यांना क्रेडिट कार्डाच्या धर्तीवर अल्ट्रा-स्मार्ट, हाय-टेक ओळखपत्र देण्यात आले आहेत. कर्मचारी-अधिकारी यांची श्रेणी, क्रमवारी आणि दर्जा यानुसार ओळखपत्र पाच-सहा रंगात आहेत. आयुक्तांसह अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना पिवळ्या रंगातील स्मार्ट ओळखपत्र आहे. चतुर्थ अन् तत्सम श्रेणीतील कर्मचाऱ्यांना निळे, जांभळे अशा रंगातील स्मार्ट ओळखपत्र देण्यात आलेले आहे. हे नुसते साधे ओळखपत्र नाही, तर ती त्या कर्मचाऱ्याची संपूर्ण कौटुंबिक डिजिटल कुंडली आहे. हे हायटेक स्मार्ट कार्ड RFID एनेबल्ड असून त्यात 4B हाय एंड डेटा चीप आहे. टोल नाक्यावर फास्टॅग जसे रीड केले जाते, तसे विशिष्ट RFID रीडरने महापालिका स्मार्ट आयकार्ड रीड करता येऊ शकते. प्रत्येक कर्मचाऱ्याचे आयकार्ड हे महापालिका रेकॉर्डला आणि एम्प्लॉयी डिटेल्सला लिंक आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या आधार आणि पॅन डेटाबेसला लिमिटेड आयडेंटीफिकेशन ऑथरायजेशन ॲक्सेससुद्धा आहे. भविष्यात कोणत्याही आरोग्य सुविधा तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीसुद्धा या स्मार्ट ओळखापत्रामधील एकत्रित डेटाचा डिजीलॉकरप्रमाणे वापर करता येणे शक्य होणार आहे.

दिवाळी

RFID चीपमुळे मेट्रो ट्रेन कार्ड जसे रिचार्ज करून वापरता येते, त्या धर्तीवर NCPI शी इंटीग्रेशन करून पेमेंट सोल्यूशन म्हणूनसुद्धा या कार्ड वॉलेटचा वापर करणे शक्य होणार आहे. एकूणच पुणे महापालिकेच्या या अशा अल्ट्रास्मार्ट, हाय-टेक कर्मचारी ओळखपत्राची बनावटगिरी करणे, आता दिवाळी लूटमार व एरव्हीही महापालिका कर्मचारी असल्याचे सांगून पुणेकरांची लुबाडणूक करणाऱ्या भामट्यांना आजिबात शक्य नाही. यापुढे कुणी असा प्रयत्न केल्यास, एक सजग पुणेकर म्हणून आपण तुमच्या दारात येणाऱ्याचे आयकार्ड जरूर मागून तपासून खात्री करून घ्या. शंका आल्यास महापालिकेशी किंवा आपल्या भागातील लोकप्रतिनिधींशी संपर्क करा. जर तपासणी करणारे खरोखरच वैध आयकार्डधारक, अधिकृत महापालिका कर्मचारी-अधिकारी असल्यास त्यांना संपूर्ण सहकार्य करा. पुणे महापालिकेच्या नवीन आयकार्डसबाबत आपले शेजारी, मित्र, आप्तस्वकीय, नातेवाईक यांना जागरूक करा. कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला आजिबात बळी पडू नका. महापालिका प्रशासनानेही आता यासंदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे, असे जाणकारांनी सांगितले.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content