Homeमाय व्हॉईसमीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना...

मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना ठाकरे ब्रँडच्या प्रमोशनसाठी?

दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवाजीपार्क मैदानाच्या वेशीवर असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या अर्धपुतळ्यावर लाल रंग टाकून त्याची विटंबना करण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला. खरेतर कोणाच्याही पुतळ्याची विटंबना करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. त्यात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे काही कारणच असू नये. मीनाताई ठाकरे या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी. संपूर्ण आयुष्य त्यांनी बाळासाहेबांची सावली म्हणूनच घालवले. राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात त्या कधीच नव्हत्या. कधीही सार्वजनिक व्यासपीठावर त्या दिसल्या नाहीत. राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणे, आपल्या पती वा मुलाच्या राजकीय भवितव्याबद्दल कमालीच्या महत्त्वाकांक्षी असणे त्यांच्या व्याक्तिमत्वापासून कोसो दूर होते. कोणत्याही विषयावर भाष्य करणे, मत व्यक्त करणे, कोणत्याही समाजाबद्दल काही भावना व्यक्त करणे, असे कोणतेही प्रकार त्यांनी कधीच केले नाहीत. मग अशा व्यक्तीच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे कारण काय?

राहता राहिला प्रश्न मीनाताईंच्या पुतळ्याचा, तर ज्या व्यक्तीचा सार्वजनिक जीवनाशी काहीही संबंध नाही, समाजसेवा किंवा राजकारण अशा कोणत्याही बाबतीत जी व्यक्ती कधीच समाजासमोर आली नाही त्यांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणी उभारणे हेच मुळात चुकीचे आहे. प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या कुटुंबियांविषयी असलेली आत्मीयता लक्षात घेता त्यांनी आपल्या कुटुंबापुरता, असे पुतळे आपल्या घराच्या प्रांगणात किंवा खोलीत उभारावेत, हेच योग्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही मत साधारणतः असेच होते. प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेबांचे वडील. अत्यंत सडेतोड मत व्यक्त करणारे, रीतीरिवाज आणि रूढीविरोधात लढा देऊन खऱ्या अर्थाने समाजाचे प्रबोधन करणारे म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा पुतळा दादरमध्येच उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्यावर एक कावळा बसला होता आणि पुतळ्यावर कावळ्याने टाकलेली शीट ओघळलेली होती. बाळासाहेबांनी स्वतःच्या डोळ्याने हा प्रकार पाहिला आणि त्यांनी पुतळ्यांची एकूणच होत असलेल्या हेळसांडीबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. ज्या भावनेने आपण पुतळे उभारतो, त्या भावनांची होत असलेली परवड याबद्दल खंत व्यक्त केली होती. पुतळे जर संभाळता येत नसतील तर ते उभारू नका, अशा स्पष्ट शब्दांत बाळासाहेबांनी आपले मत व्यक्त केले होते. त्यानंतर प्रबोधनकारांच्या पुतळ्यावर एक छत्रीसारखी शेड उभारण्यात आली. सांगायचे काय तर ज्यांचा समाजकारणाशी थेट संबंध नाही अशा व्यक्तींचे पुतळे सार्वजनिक ठिकाणी उभारायचे की नाही याचा आता विचार करण्याची वेळ आली आहे.

रात्री उशिरा मीनाताईंच्या पुतळ्याचे विटंबना केली गेली. मग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच त्यावरून राजकारणाला ऊत आला. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलतबंधू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मेतकूट जमतेय. मीनाताई उद्धवजींच्या मातोश्री तर राजजींच्या मावशी आणि काकू. दोन्हीकडे सख्खे नाते. त्यामुळे या दोन्ही बंधूंनी घटनास्थळी धाव घेतली नसती तरच नवल होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत पोलिसांना 24 तासांत आरोपीला अटक करण्याचे फर्मान सोडले तर उद्धव ठाकरे यांनी यावर दोन मुद्दे माध्यमांसमोर मांडले. हा अत्यंत गलिच्छ प्रकार आहे. ज्यांना आपल्या आई-वडिलांचे नाव लावायला लाज वाटते अशा लावारिस व्यक्तीने हा प्रकार केला असावा किंवा जसे बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या विषयावर वादग्रस्त मत व्यक्त करून बिहार पेटवण्याचा प्रयत्न झाला तसा प्रयत्न महाराष्ट्र पेटवण्यासाठी केला जाऊ शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुळात बिहारचा विषय हा पूर्णपणे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने निर्माण केला होता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मोदींची आई साकारत त्यावर एक व्हिडिओ त्यांनी तयार केला होता. मोदींची आई त्यांच्या स्वप्नात येते आणि आपल्या मुलाने कसा गैरकारभार चालवला आहे याबद्दल मत व्यक्त करते, अशा आशयाचा हा व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रदर्शित केल्यावरून तेथे वादंग निर्माण झाला होता. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांकडून मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना करून महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान केले जाईल असे म्हणणे वा तसे चित्र उभे करणे बालिशपणाचे लक्षण आहे.

मुळात आज उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त ‘शिल्लक’ सेना आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदीच्या काळात पक्षविरोधी मतदान केले म्हणून ठाण्यातल्या श्रीधर खोपकर, या शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्त्या झाली होती. छगन भुजबळ शिवसेनेतून फुटले तेव्हा त्यांनाही फुटीसाठी नागपूरची भूमी पसंत करावी लागली होती. ती रग बाळासाहेबांच्या हयातीतच निकालात निघाली. त्यामुळेच नारायण राणे फुटले तेव्हा काहीही विपरीत घडले नाही. गणेश नाईक बाहेर गेले, काहीही झाले नाही. राज ठाकरे बाहेर पडले, स्वतःचा पक्ष स्थापन केला. या सर्व घडामोडीतही शिवसेनेकडून किंवा शिवसैनिकांकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. तब्बल चाळीस आमदार त्यांच्यासोबत गेले. पक्षाचे नाव तसेच चिन्ह सध्या शिंदेंकडेच आहे. उद्धव ठाकरे किंवा त्यांचे समर्थक स्वतःच्या पक्षाला शिवसेना म्हणवून घेत असले तरी वस्तूस्थिती अशी आहे की शिवसेना पक्ष त्यांच्याकडे नाही. या सर्व स्थितीतही कोणत्याही प्रकारची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्याची क्षमताही आता उद्धवजींच्या कार्यकर्त्यांमध्ये राहिलेली नाही. त्यामुळे मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर महाराष्ट्र पेटेल वगैरे म्हणणे फक्त गप्पांपुरता ठीक आहे.

ठाकरे

असो. पोलिसांनी याप्रकरणी उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला तातडीने अटक केली आहे. या व्यक्तीचा चुलतभाऊ उद्धवजींचा जवळचा कार्यकर्ता आहे. उद्धवजींच्या आजूबाजूला असणारे कथित अंगरक्षकांमध्ये त्याचा समावेश असल्याचे बोलले जाते. उपेंद्रने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे आणि त्याच्या चुलतभावाचे मालमत्तेवरून काही वाद चालू आहेत. या वादामुळे उपेंद्र अनेकदा पोलिसठाण्यामध्ये चुलतभावाविरोधात आणि या प्रकरणांमध्ये थेट हस्तक्षेप करत असल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. ठाकरे पिता-पुत्राकडून दबाव टाकला जातो आणि याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण हे कृत्य केल्याचं उपेंद्रने पोलिसांना सांगितल्याचे बोलले जाते. ही जर वस्तुस्थिती असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. अनेक नेते आपापल्या कार्यकर्त्यांसाठी ठिकठिकाणी फोन करून दबाव टाकतच असतात. त्यात ठाकरे परिवाराचे नाव अनेक ठिकाणी घेतले जाते ही वस्तुस्थिती आहे. दादरच्या रमेश किणी हत्त्या प्रकरणातही राज ठाकरे यांचे नाव घेतले जात होते. हा विषय फार गाजला. पुढे न्यायदानाच्या प्रक्रियेत राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता झाली तो भाग वेगळा. परंतु रमेश किणी म्हटल्यानंतर राज ठाकरे यांचे नाव आपसूकच लोकांच्या ओठावर येत होते.

उपेंद्र पावसकर यांनी दिलेले कारण जर खरे असेल तर हा विषय तिथेच संपतो. पण राजकीयदृष्ट्या विचार केला आणि त्याचे संदर्भ पाहिले तर या पुतळ्याच्या विटंबनेमागे मोठे षडयंत्र असल्याचाही संशय निर्माण होऊ शकतो. ही घटना घडली त्याच्या आदल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा एक विजयी संकल्प मेळावा वरळीच्या डोममध्ये झाला. भाजपा नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ठाकरेंचा खरपूस शब्दात समाचार घेतला. साधी बेस्टमधल्या एका पतपेढीची निवडणूक होती. पण आमचा ब्रँड आहे, ब्रँड आहे असे म्हणत काही जणांनी ही निवडणूक लढवली. यात राजकारण नको, असा प्रयत्न आम्ही केला. पण हे ऐकतच नाहीत म्हटल्यावर काय झाले? आमचे शशांक राव, लाड, दरेकर यांनी या ब्रँडचा पुरता बँड वाजवला. अहो हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते. नुसते आडनाव आहे म्हणून कोणी ब्रँड होत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे ब्रँडची खिल्ली उडवली. इतकेच नव्हे तर कोविडच्या काळात घरात बसून लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारे हे कफनचोर कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर मते मागणार, असे बोलत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. आणि दुसऱ्याच दिवशी मीनाताईंच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे यानिमित्ताने ठाकरे बंधू नव्याने आपला ठाकरे ब्रँड एस्टॅब्लिश करण्याच्या प्रयत्नात तर नाही ना, असा प्रश्न पुढे येऊ लागला. शिवसेना (उबाठा)चे नेते, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही फडणवीस यांच्या भाषणानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडतो यावरून संशय व्यक्त केला होता. भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त दिवसभर दूरचित्रवाणीवरून दिसणारे कार्यक्रम कमी करण्यासाठी ठाकरेंच्या समर्थकांकडूनच मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना केली गेली असावी असा संशय व्यक्त केला गेला. सकाळचा भोंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या नेहमीच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी ठाकरे हाच एक ब्रँड असून इतर सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत, असे मत व्यक्त केले. या सर्व पार्श्वभूमीवर मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना नेमकी कशासाठी झाली, हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. यामागचा कर्ता आता सापडलाय. पण करविता कोण हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. ते झाल्यानंतरच अशा वृत्तीला आणि प्रवृत्तीला आळा बसू शकतो. अन्यथा अशा घटनांनी काही काळापुरते वातावरण तापते. नंतर निवळते आणि त्याचे दूरगामी परिणाम मात्र सर्वसामान्य भोगत राहतात.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

आशिया कप फायनलमध्ये रंगला ‘क्रिकेट मानापमान’चा प्रयोग!

बिहार, पश्चिम बंगाल विधानसभा आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीवर झालेल्या राजकीय रंगरंगोटीच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला आशिया टी-20 क्रिकेट चषक (कप) अखेर दुबईतच राहिला. दुबईमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर दोन चेंडू राखून सनसनाटी...

‘ठाकरे’ ब्रँड मराठी माणसांचा नाही, तर फक्त बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरेंचे चालले तरी काय, हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घुटमळतोय. त्याचं कारणही तसंच आहे. जो विषय प्रत्यक्षात उतरलाच नाही, त्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रणकंदन करत आहेत, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत...

इलेक्ट्रिक वाहनधारकांकडून सक्तीची टोलवसुली सुरूच! शासननिर्णय केराच्या टोपलीत!!

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूरदरम्यान असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू यावर 100% पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय होऊन आज दोन महिने झाले तरीही या मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनधारकांकडून पथकर उकळून...
Skip to content