पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 13 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरदरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. या भेटींदरम्यान पंतप्रधान 71,850 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी करणार आहेत. आज ते मिझोराम, मणिपूर तसेच आसामचा दौरा करणार आहेत.
मिझोराममध्ये आयझॉल येथे ते 9000 कोटींहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मिझोरामला पहिल्यांदाच राष्ट्रीय रेल्वे जाळ्यासोबत जोडणाऱ्या बैराबी-सैरांग या नव्या रेल्वेमार्गाचे उद्घाटन करणार आहेत. मणिपूरमध्ये ते 8500 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. आसाममध्ये गुवाहाटी येथे मोदी भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या 100व्या जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होतील. आसाममध्येच पंतप्रधान 18,350 जास्त खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचेदेखील उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
आज सकाळी 10 वाजता आयजॉल येथे पंतप्रधान 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका सार्वजनिक सभेलाही संबोधित करतील. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मणिपूरला भेट देतील आणि चुराचांदपूर येथे 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकासप्रकल्पांची पायाभरणी करतील. यानिमित्ताने ते सभेलाही संबोधित करतील. त्यानंतर, दुपारी अडीच वाजता इंफाळ येथे 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. त्यानंतर, पंतप्रधान मोदी आसामला भेट देतील आणि गुवाहाटी येथे संध्याकाळी 5 वाजता भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100व्या जयंती सोहळ्यात सहभागी होतील. यावेळी ते या कार्यक्रमालाही संबोधित करतील.
उद्या, 14 सप्टेंबरला पंतप्रधान आसाममध्ये 18,530 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रमुख पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सकाळी 11 वाजता ते दरांग येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. त्यानंतर, दुपारी पावणेदोनच्या सुमारास ते गोलाघाटच्या आसाम बायो-इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड, नुमालीगढ रिफायनरी प्लांटचे उद्घाटन करतील. ते गोलाघाट येथे पॉलिप्रॉपिलीन प्लांटची पायाभरणीही करतील. 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालला भेट देतील आणि सकाळी साडेनऊ वाजता कोलकाता येथे 16व्या संयुक्त कमांडर्स परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर, पंतप्रधान बिहारला भेट देतील आणि दुपारी पावणेतीनच्या सुमाराला पूर्णिया विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. पूर्णिया येथे ते सुमारे 36,000 कोटी रुपयांच्या अनेक विकासप्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. त्यानंतर ते उपस्थितांना संबोधितही करतील. बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाचेही ते उद्घाटन करतील.
मिजोराममध्ये पंतप्रधान 9,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा व इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत. तसेच ते 8,070 कोटी रुपये किंमतीच्या बैराबी-सैरंग नवीन रेल्वेमार्गाचे उद्घाटन करतील. त्यामुळे मिजोरामच्या राजधानीला पहिल्यांदा भारतीय रेल्वेजाळ्याशी थेट जोडले जाईल. आव्हानात्मक डोंगराळ प्रदेशात बांधलेल्या या रेल्वेमार्गावर 45 सुरूंग, 55 मोठे पूल आणि 88 लहान पूल आहेत. मिझोरम आणि देशाच्या उर्वरित भागांमधील थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे या प्रदेशातील लोकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि किफायतशीर प्रवासाचे पर्याय उपलब्ध होतील. अन्नधान्य, खते आणि इतर आवश्यक वस्तूंचा वेळेवर खात्रीशीर पुरवठा सुनिश्चित होईल. त्यामुळे एकूण लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि प्रादेशिक सुलभता वाढेल.
याचवेळी पंतप्रधान तीन नवीन एक्स्प्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. ज्यात सैरंग (आयझॉल) – दिल्ली (आनंद विहार टर्मिनल) राजधानी एक्सप्रेस, सैरंग-गुवाहाटी एक्सप्रेस आणि सैरंग-कोलकाता एक्सप्रेस यांचा समावेश आहे. आयझॉल आता राजधानी एक्सप्रेसद्वारे थेट दिल्लीशी जोडले जाईल. सैरंग-गुवाहाटी एक्सप्रेस मिझोराम आणि आसाम दरम्यान वाहतूक सुलभ करेल. सैरंग-कोलकाता एक्सप्रेस मिझोरामला थेट कोलकात्याशी जोडेल. या कनेक्टिव्हिटीमुळे रुग्णालये, विद्यापीठे व बाजारपेठांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक संबंध बळकट होतील, रोजगार निर्मिती वाढेल आणि पर्यटनाला चालना मिळेल.
मोदी ईशान्य क्षेत्र विकास उपक्रमांतर्गत अनेक रस्तेप्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यात ऐझॉल बायपास रोड, थेनझॉल–सियालसुक रोड आणि खांकावन–रॉंगुरा रोड यांचा समावेश आहे. 45 किमी लांबीचा आणि 500 कोटी रुपये किंमतीच्या ऐझॉल बायपास रोडमुळे ऐझॉल शहरातील गर्दी कमी होईल आणि लुन्गलेई, सियाहा, लॉंगतलाई, लेंगपुई विमानतळ व सैरांग रेल्वे स्थानकाशी कनेक्टिव्हीटी सुधारेल. यामुळे दक्षिणेकडील जिल्ह्यांपासून ऐझॉलपर्यंत प्रवासाचा वेळ सुमारे दीड तासांनी कमी होईल. ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत थेन्झॉल-सियालसुक रस्ता थेनझॉल–सियालसुक रोड अंतर्गत बागायतदार, ड्रॅगन फ्रूट उत्पादक, तांदुळ शेती करणारे व आले प्रक्रिया करणाऱ्यांना लाभदायी ठरेल. ऐझॉल–थेनझॉल–लुन्गलेई महामार्गाशी संपर्क मजबूत करेल. ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत खांकावन–रॉंगुरा रोड सेरचिप जिल्ह्यातील बाजारपेठेत प्रवेश सुधारेल.
पंतप्रधान लॉंगटलाई-सियाहा मार्गावरील छिमतुइपुई नदी पुलाची पायाभरणीदेखील करणार आहेत. या पुलामुळे सर्व प्रकारच्या हवामानात देखील कनेक्टिव्हिटी लाभेल आणि प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होईल. कलादान मल्टीमॉडल परिवहन चौकटीअंतर्गत हा पूल सीमापार व्यापाराला देखील चालना देईल. क्रीडा विकासाच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या खेलो इंडिया बहुउद्देशीय इनडोअर कक्षाचीदेखील पंतप्रधान पायाभरणी करतील. तुइकुअल येथील हॉलमध्ये मिझोरामच्या तरुणांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांकरता पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांना सक्षम करण्यासाठी आवश्यक बहुउद्देशीय इनडोअर संकुलासह आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.