Homeमाय व्हॉईसफडणवीसांच्या जाळ्यात अडकले...

फडणवीसांच्या जाळ्यात अडकले उद्धव ठाकरे!

कम ऑन किल मी.. हा प्रहार चित्रपटातला डायलॉग मारत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गटाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या हव्यासापोटी आणि पुत्रप्रेमाच्या लालसेपोटी भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक लढवून आणि जिंकूनही ज्यांच्याविरोधात निवडणूक लढली त्यांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे उपभोगलेल्या उद्धव ठाकरे यांना आता मुंबई महापालिका जिंकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. हा एकमेव ऑक्सिजन त्यांच्या दृष्टीक्षेपात आहे, जो जी काय उरलीसुरली सेना आहे तिला संजीवनी देऊ शकतो. त्याचमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीच्या टाळीला प्रतिसाद दिल्यानंतर उद्धव ठाकरे राज यांच्या मराठी भाषेसंदर्भात जे काही ‘आंदोलन’ केले त्यामध्ये सहभागी झाले. मराठी विषयावरील राज ठाकरे यांचे हे कथित आंदोलन मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून लावण्यात आलेला एक सापळा होता. या सापळ्यामधले सावज होते ते राज ठाकरे. बकरी बघितली की भुकेपोटी तळमळणारा उद्धव ठाकरे नामक वाघ तिकडे पोहोचणारच याची खात्री भाजपाचे महाराष्ट्रातले नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होतीच. राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून आता 19 वर्षे झाली आहेत. आजपर्यंत त्यांनी कधीही सत्ता मिळवावी यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नाहीत. त्यांच्याकडून कायम सुपाऱ्या वाजत राहिल्या, असे कायम जाणवत राहिले आहे. यावेळी सुपारी होती भाजपाची आणि अडकित्ता होता राज ठाकरेंचा.. राज ठाकरेंनी जी भाषा सक्तीची केलेलीच नव्हती त्या भाषेच्या सक्तीविरोधात आंदोलन छेडले आणि त्या सापळ्यात शिवसेनेच्या उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे अलगद अडकले.

ठाकरे

तसे पाहिले तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. प्रसिद्धी माध्यमांसमोर काही निवडक वेळी एक खेळी म्हणून हे नेते एकमेकांना भेटत असतील ते वेगळे. परंतु अनेकदा ज्या गोष्टी माध्यमांसमोर आणायच्या नसतात त्या फोनवर सहजपणे बोलल्या जातात, चर्चिल्या जातात, हे सांगण्यासाठी माझी गरज नाही. परंतु हे वास्तव आहे. एका डिजिटल वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या, पर्यायाने महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सर्व रागलोभ बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्याभोवती जाळे टाकले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या साथीने राहून फारसे काहीही साध्य होत नाही हे लक्षात घेत उद्धव ठाकरे यांनी स्वतःच या जाळ्यात उडी घेतली आणि अलगदपणे अडकले. त्यांच्या लक्षात आले नाही की, हे जाळे राज ठाकरे यांनी जरी टाकले असले तरी ते देवेंद्र फडणवीस या चाणाक्ष राजकीय नेत्याने विणले आहे. ते लगेच बोलते झाले की माझ्या काही अटी आहेत. या अटी त्यांना मान्य असतील तर महाराष्ट्रासाठी आम्ही जरूर एकत्र येऊ.. काय होत्या या अटी? राज ठाकरे यांनी भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांशी संबंध ठेवायचा नाही. त्यांच्याबरोबर भेटीगाठी करायच्या नाहीत. राज ठाकरे यांनी उद्धवजींच्या या अटींकडे कटाक्षही टाकला नाही. याउलट त्यांना डिवचण्यासाठी राज ठाकरे वांद्र्याच्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. इकडे उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते, माऊथपिसच म्हणा.. खासदार संजय राऊत सकाळ-संध्याकाळ ठाकरे ब्रँडचा नारा देत होते. दोन्ही ठाकरे एकत्र येतील याचा माध्यमांना विश्वास देत होते. राज ठाकरे हे फडणवीसांचे एक प्यादे आहेत हे उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांनाही ठाऊक आहे. परंतु मरता क्या नही करता? आपल्या गटाला संजीवनी देण्यासाठी, मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरेंच्या मागे फरफटत जावेच लागेल, हे या दोन्ही नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. मराठी भाषेच्या विषयावर राज ठाकरे यांनी पुकारलेले आंदोलन ही एक संधी त्यांना मिळाली आणि शिवसेनेच्या उबाठा गटाचे नेते राज ठाकरेंच्या चालत्या गाडीला लटकले.

ठाकरे

महाराष्ट्र सरकारने राज्यात त्रिभाषिक सूत्र स्वीकारण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना म्हणजेच त्यांच्याच कारकीर्दीत डॉ. माशेलकर यांच्या समितीची स्थापना केली होती. या समितीत 18 सदस्य होते. त्यात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचाही समावेश होता. या समितीने जो अहवाल दिला त्यात हिंदी ही तिसरी भाषा पहिलीपासून सक्तीची करावी असे सुचवले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने हा अहवाल स्वीकारला. नुसता स्वीकारलाच नाही तर त्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून पुढची प्रक्रिया सुरूही झाली. 2022मध्ये त्यांचे सरकार पडले. त्यानंतरही ही प्रक्रिया चालूच राहिली आणि आता फडणवीस सरकारने या शिफारशींची अंमलबजावणी करताना हिंदी व अन्य कोणतेही भाषा स्वीकारण्याचे स्वातंत्र्य देत एक नवा पर्याय खुला केला. पहिली भाषा मराठी जी सक्तीची आहे. दुसरी भाषा इंग्रजी जी महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय पक्षांना तसेच त्यांच्या नेत्यांना आवश्यक वाटते, ती आहे. त्यानंतर एखाद्या वर्गात जर वीस विद्यार्थी असतील आणि त्यांनी जर एखादी भाषा हवी असे म्हटले असेल तर ती भाषा तिथे शिकवली जाईल, मग ती हिंदी का असेना, असा पवित्रा घेत सध्याच्या सरकारने शासन निर्णय जारी केला. परंतु ही आडमार्गाने होत असलेली हिंदीची सक्ती आहे, असा दावा करत राज ठाकरे यांनी याविरुद्ध दंड थोपटले. त्यांचा दावा कसा खोटा आहे हे दाखवण्याकरीता चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी फार कष्टही घेतले नाहीत.

ठाकरे

भाषणाच्या सुरुवातीला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो.. असे म्हणणारे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यापासून हिंदू हा शब्द विसरले होते. माझ्या तमाम देशवासियांनो.. माझ्या तमाम भारतीयांनो.. असा शब्दप्रयोग ते करू लागले होते. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून जरा दूर जाऊ लागले तर राज ठाकरे यांनी आपला पक्षध्वज बदलत कडव्या हिंदुत्वाची कास धरली. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना याचा फायदा झाला. अनेक मतदारसंघात मुस्लीम मतदारांनी उद्धवजींची पाठराखण केली. विधानसभा निवडणुकीतही मुस्लीमबहुल मतदारसंघात त्यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले. परंतु एकूणच निवडणुकीचा आढावा घेतला तर हिंदुत्वाच्या भूमिकेत एकनाथ शिंदे उद्धवजींना भारी पडले. जेमतेम 20 आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीत हा जो त्यांना फटका बसला की, त्यांच्या तोंडातून पुन्हा हिंदू शब्द बाहेर पडू लागला. शिवसेनेच्या उबाठा गटाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा तमाम हिंदू बंधू-भगिनींनो.. असा शब्दप्रयोग केला. नव्याने कडव्या हिंदुत्वाची कास धरत त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला साथ देत त्यांच्या वळचणीला जाण्याचा प्रयत्न चलवला. परंतु त्यांच्या हे लक्षात आले नाही की महाविकास आघाडीच्या सानिध्यात राहून ज्या मुसलमानांनी त्यांच्यावर विश्वास टाकत मतदान केले त्यांच्याशी ते प्रतारणा करत आहेत. त्यामुळे झाले असे की, त्यांची दुरावलेली हिंदू मते पुन्हा त्यांच्याकडे येण्याची शक्यता कमी असतानाच सोबतीला आलेली मुसलमानांची मतेही दूर गेली. हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव पूर्णपणे यशस्वी झाला.

ठाकरे

आता भाजपाला हिंदूंमधल्या मराठीतर समुदायाचे ध्रुवीकरण करायचे होते. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी फक्त मराठी मते कामाची नाहीत तर मराठी नसलेली मते जास्त उपयोगी आहेत हे भाजपाला चांगलेच ठाऊक आहे. आज मुंबईत जेमतेम दहा टक्के मराठी मतदार आहे. तरीही मराठी मनाला दुखावण्याचे टाळताना हिंदीच्या अप्रत्यक्ष सक्तीला साथ देणारे शासननिर्णय रद्द केले. त्यामुळे ठाकरे बंधुंच्या एकत्रित मोर्चातली हवा निघाली. आता ते विजयी मेळावा घेणार आहेत. ठाकरे बंधु मराठी भाषेचा कैवार घेत असले तरी मराठी मतांत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शप) असे सारेच वाटेकरी आहेत. अशा स्थितीत अमराठी मतदार आपल्या पाठिशी उभा करण्यात भाजपाला यश आले. राज ठाकरेंच्या माध्यमातून फेकलेल्या मराठी-हिंदी वादाच्या जाळ्यात उद्धव ठाकरे फसल्यामुळे मुंबई महापालिकेतला भाजपाचा सत्तेकडे जाणारा मार्ग जास्त सोपा झाला. याउलट राज ठाकरेंच्या मागे उद्धवजी गेल्यामुळे काँग्रेस आता मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची भाषा करू लागले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांची गोची होणार हे नक्की!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

स्था. स्व. संस्था निवडणुकीत सेना-मनसे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?

महाराष्ट्रात येत्या चार महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सत्ताधारी महायुती तसेच विरोधातली महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर दोन्ही बाजूंकडून सत्तेसाठी महायुती वा महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाईल, असे जाणकारांनी सांगितले. या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे यांची...

महाराष्ट्रात लागू झाले नवे ३ फौजदारी कायदे! काय त्याचे फायदे?

केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन तीन फौजदारी कायदे निकालात काढत अस्सल भारतीय असे तीन नवे कायदे तयार केले आहेत. या तीन नव्या कायद्यांची म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे महाराष्ट्रात लागू...

ठाकरे परिवाराची ‘दहशत’ संपली!

जिथे क्राईम ब्रँच ब्रांचचा सीनियर इन्स्पेक्टर क्राईम ब्रँचचेच अंग असलेल्या व्हिजिलन्स ब्रँचच्या सीनियर इन्स्पेक्टरविरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू शकतो तिथे पोलीस काहीही करू शकतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असला तर पोलीसच काय प्रत्येक...
Skip to content