Homeकल्चर +'नाफा' महोत्सवात झळकणार...

‘नाफा’ महोत्सवात झळकणार स्नोफ्लॉवर, मुक्ताई, छबीला आणि रावसाहेब!

परदेशात मराठी चित्रपटसृष्टीचा टक्का वाढवण्यासाठी अभिमानास्पद कार्य करत, गेल्यावर्षी प्रथमच ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ने (नाफा) ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करून मराठी चित्रपटांचा भव्य कौतुक सोहळा साजरा केला होता. यंदा हा महोत्सव अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूपात सॅन होजेतील कॅलिफोर्निया थिएटरमध्ये २५ ते २७ जुलैदरम्यान साजरा होणार आहे. यावर्षीच्या महोत्सवासाठी प्रख्यात दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘स्नोफ्लॉवर’, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘मुक्ताई’, अनिल भालेराव दिग्दर्शित ‘छबीला’ आणि निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’ या चित्रपटांची निवड करण्यात आली असल्याचे ‘नाफा’तर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक वैभव मिळवून देण्यासाठी, ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेते निर्माते अभिजित घोलप यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून उदयास आलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ अर्थात ‘नाफा’द्वारे मराठी चित्रपटांना अमेरिका-कॅनडामध्ये भव्य कॅनव्हास प्राप्त झाला आहे. हॉलिवूडच्या बेव्हर्ली हिल्सपासून अवघ्या काही मैलांवर असलेल्या ‘सॅन होजे’ येथे ‘नाफा’चा यावर्षी तीन दिवसांचा अनोखा सोहळा संपन्न होणार आहे. मराठी तारे-तारकांसोबत हॉलिवूडमधील दिग्गजांचीही उपस्थिती या महोत्सवात असणार आहे.

दिग्दर्शकांनी व्यक्त केला आनंद

‘स्नोफ्लॉवर’, ‘मुक्ताई’, ‘छबीला’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांची ‘नाफा २०२५’ मराठी चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याबद्दल या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘स्नोफ्लॉवर’ चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणाले की, हा चित्रपट, मानवी भावना आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, कायदा माणसासाठी आहे, की माणूस कायद्यासाठी आहे? हा गहन प्रश्न विचारतो. ही कथा NAFAसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर प्रदर्शित होणे ही विलक्षण गोष्ट आहे. मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी NAFA महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा चित्रपट नाफाच्या प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा अनुभव देईल.

‘मुक्ताई’ चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले की, दुरितांचे तिमिर जावो.. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात.. पसायदानातील ही ओळ म्हणजे ज्ञानेश्वर-मुक्ताई यांचा सार आहे. त्यांचा विश्वास होता की हे आत्मज्ञान जगभर पोहोचायला हवं आणि NAFA फेस्टिवलमुळे ते खऱ्या अर्थाने पोहोचत आहे. या अध्यात्मिक प्रवासाला व्यासपीठ मिळवून दिलं, याबद्दल NAFA चे मनःपूर्वक आभार.

‘छबीला’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल भालेराव म्हणाले की, या चित्रपटाच्या कथेची सुरुवात रघुवीर तांडा या छोट्याशा गावापासून झाली, ज्या गावात आजही रस्ता, लाईट, पाणी नाही. येथील समाज आजही खाणीत दगड फोडून हलाखीत जीवन जगत आहे. छबीलाद्वारे ही कथा आज सातासमुद्रापार पोहोचली याचा मला अभिमान आहे. यासाठी मी नाफाचे मनापासून आभार मानतो.

‘रावसाहेब’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले की, माझा चित्रपट अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी NAFA मध्ये प्रदर्शित होणार आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. ही फिल्म मोठ्या पडद्यावर पाहण्याचीच आहे आणि अशी मराठी फिल्म तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल, याची मला खात्री आहे.

नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये चार उत्कृष्ट मराठी चित्रपटांचे अमेरिकन प्रीमियर, ही केवळ एक कलाकृतींची प्रदर्शने नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी अमेरिकन आणि कॅनेडियन मंच खुले करण्याची ऐतिहासिक नांदी आहे, असे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले.

‘नाफा’मध्ये यावर्षी २५ जुलैला ‘गाला डिनर’ सोबतच ‘अ‍ॅवॉर्ड्स नाईट’ रंगणार असून २६ व २७ जुलै रोजी मुख्य ‘कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात होईल. महोत्सवासाठी निवडलेल्या चार मराठी चित्रपटांचे ‘वर्ल्ड प्रीमियर शोज’, त्यासोबत १६ शॉर्ट फिल्म्सचे प्रीमियर, ४ आंतरराष्ट्रीय भाषिक चित्रपट, ‘स्टुडंट्स सेक्शन’, ‘मास्टर क्लासेस’, ‘मीट अ‍ॅण्ड ग्रीट’, ‘लाईव्ह परफॉर्मन्सेस’ आणि बरंच काही या महोत्सवात असणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर या प्रमुख सेलिब्रिटींची उपस्थिती यावेळी असणार आहे. ‘नाफा’ महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

1 COMMENT

  1. वाह वाह! अभिनंदन! ग्रेट! टीव्ही वर दाखवतील ka? दाखवायला पाहिजे. म्हणजे इथल्या नागरिकांना ही त्याचा आनंद घेता येईल.

Comments are closed.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content