जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टूनिस्ट्स कंबाईन, या संस्थेतर्फे येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईतल्या ओला वाकोला हॉल, सांताक्रूझ पूर्व येथे व्यंगचित्र संमेलन आयोजित करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते सुभाष देसाई यांची या संमेलनाला विशेष उपस्थिती असणार आहे. दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत रसिकांसाठी हे व्यंगचित्र प्रदर्शन विनामूल्य खुले आहे.

कार्टूनिस्ट्स कंबाईन ही १९८३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे स्थापन केलेली अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांची संस्था असून संस्थेतर्फे दरवर्षी विविध शहरांतून भव्य व्यंगचित्रकार संमेलने घेतली जातात. या वर्षी मुंबईत हे संमेलन होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन कार्टूनिस्ट्स कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, शिवसेना (उबाठा) आमदार संजय पोतनीस, ओला वाकोलाचे संदेश चव्हाण यांनी केले आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यंगचित्र प्रदर्शन, व्यंगचित्र स्पर्धा, व्यंगचित्रविषयक प्रशिक्षण देणारी नामवंत व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिकांसह व्याख्याने, परिसंवाद असे आहे. रसिकांना स्वतःचे कार्टून काढून घेण्याची संधीही या संमेलनात मिळणार आहे. व्यंगचित्र प्रदर्शनात शंभर वर्षांपूर्वीचीही दुर्मिळ व्यंगचित्रेही पाहण्याची संधी रसिकांसाठी असेल.