Monday, April 28, 2025
Homeमाय व्हॉईसडोळे लावून बसणार...

डोळे लावून बसणार भारतीय, मेहुल चोक्सीच्या परतण्याकडे..

पंजाब नॅशनल बँकेत (PNB) १३,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा करुन भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६५) याला युरोपमधील बेल्जियममध्ये अटक करण्यात आली असून त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्यामुळे प्रत्यक्ष प्रत्यार्पणाला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. ही अटक केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी यावर्षी १२ एप्रिलला केली. अटक केल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन चोक्सीने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो बेल्जियमच्या कोर्टाने नुकताच फेटाळून लावून त्याची रवानगी पुन्हा कोठडीत केली.

बेल्जियम

बेल्जियममधील ‘रेसिडेन्सी कार्ड’ मिळवल्यानंतर चोक्सी त्याची पत्नी प्रीतीसोबत बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये राहत होता. त्याची पत्नी बेल्जियमची नागरिक असल्याचे सांगितले जाते. त्याच्यावर तो अँटिग्वा (कॅरेबियन बेट)मध्ये असतानाच तपासयंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी  बारीक नजर ठेवली होती. दरम्यान, तो अँटिग्वामधून बेल्जियमला (वायव्य युरोप) पळून गेल्याचे तपासयंत्रणेला समजले. त्यानंतर तपासयंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या फसवणूक प्रकरणाची कागदपत्रे बेल्जियम सरकारकडे सोपवली. अखेर बेल्जियम पोलिसांनी त्याला मुंबई न्यायालयाने २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी केलेल्या वॉरंटच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, तो बेल्जियममधून स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

प्रत्यार्पण

ब्रिटिश राजवटीत 1901मध्ये भारत आणि बेल्जियममध्ये प्रत्यार्पण करार झाला होता. बेल्जियमसोबतच्या करारानुसार आर्थिक गुन्ह्यांसह “दुहेरी गुन्हेगारी”च्या आधारावर प्रत्यार्पणाची परवानगी आहे. दुहेरी गुन्हेगारीचा अर्थ असा आहे की, एखाद्या व्यक्तीचे प्रत्यार्पण तेव्हाच केले जाऊ शकते जेव्हा तिचा गुन्हा दोन्ही अधिकारक्षेत्रात शिक्षापात्र असेल. या करारानुसार राजकीय स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी किंवा ज्या प्रकरणांमध्ये प्रत्यार्पण केल्या जाणाऱ्या देशात राजकीय कारणांसाठी खटला चालवला जात असेल तर प्रत्यार्पण करता येत नाही. या कराराशिवाय २०२०मध्ये, भारत आणि बेल्जियमने फरार गुन्हेगारांवरील चांगल्या सहकार्यासाठी परस्पर कायदेशीर सहाय्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

युक्तिवाद

भारतीय तुरुंगांमध्ये अमानवीय स्थिती असल्याचा युक्तिवाद चोक्सीच्या वकिलांनी केला आहे. अशा परिस्थितीत चोक्सी, बेल्जियममध्ये जामिनासाठी अर्ज करून भारत सरकारच्या प्रत्यार्पण करण्याच्या आग्रहाला विरोध करू शकतो. त्याने असाही युक्तिवाद केला आहे की, भारत सरकारने त्याला अद्याप “फरार आर्थिक गुन्हेगार” घोषित केलेले नाही. शिवाय २०२१मध्ये, चोक्सीच्या वकिलाने त्याचे अँटिग्वामधून दोन भारतीयांद्वारे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी चोक्सी अँटिग्वातून, डोमिनिकन रिपब्लिक (उत्तर अमेरिका)मार्गे, क्युबाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु त्याला १५ जून २०२१ रोजी डोमिनिकन रिपब्लिकमध्ये ताब्यात घेण्यात येऊन त्याला अँटिग्वाला परत पाठवण्यात आले. त्यानंतर मार्च २०२३मध्ये चोक्सीविरुद्ध जारी केलेली नोटीस इंटरपोलने मागे घेतली. चोक्सीच्या वकीलातर्फे या मुद्द्यावर जोर दिला जाण्याची दाट शक्यता आहे.

पीएनबी घोटाळा

पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी, चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे दोघेही २०१८मध्ये देश सोडून पळून गेले. चोक्सी अँटिग्वामध्ये स्थायिक झाला आणि त्याने तिथले नागरिकत्व मिळविले. त्यानंतर एक वर्षानंतर त्याचा भाचा नीरव मोदीला लंडनमधील मेट्रोपॉलिटन पोलिसांनी अटक केली आणि तेव्हापासून तो त्याच्या भारतातल्या प्रत्यार्पणाविरुद्ध लढत आहे. सध्या मोदी युकेमध्ये (वेंड्सवर्थ जेल) कोठडीत आहे. बेंगळुरू येथील उद्योजक हरी प्रसाद एसव्ही यांनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) मोठ्या प्रमाणात घोटाळ्याबद्दल पत्र लिहून बॅलन्सशीटमध्ये विसंगती असल्याचे स्पष्ट केल्यानंतर २०१८मध्ये पीएनबी घोटाळा उघडकीस आला. यानंतर, मेहुल चोक्सी, त्याचा भाचा नीरव मोदी आणि पीएनबीच्या अनेक अधिकाऱ्यांवर ईडी आणि सीबीआयने गुन्हा दाखल केला. तपासात असे दिसून आले की, त्यांनी बँक कर्मचाऱ्यांशी संगनमत करून दक्षिण मुंबईतील पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेतून बनावट लेटर ऑफ अंडरस्टँडिंग (एलओयू)  जारी करून घेतले. या पत्रांत “गीतांजली जेम्स” (आता बंद पडलेली) कर्ज परत करेल अशी हमी दिली होती. या पत्रांच्या आधारे त्यांनी परदेशी बँकांकडून भरमसाठ कर्ज मिळवले. नंतर चोक्सीने गीतांजली ग्रुपच्या नेतृत्त्वाखाली भारत आणि परदेशात फॅन्सी स्टोअर्स उघडून आपल्या कुटुंबाचा व्यवसाय वाढवला. शिवाय पुतण्या नीरव मोदीसोबत मार्केटिंग आणि जाहिरातींमध्ये मोठा वाटा उचलला आणि “केट विन्सलेट” आणि “रोझी हंटिंग्टन-व्हाइटली”सारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांना आकर्षित केले.

बुडीत कर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकदा फसवणूक झाल्याची तक्रार आली की, संपूर्ण कर्जाची रक्कम पैसे परत मिळणार नाही असे गृहीत धरुन तो तोटा म्हणून चिन्हांकित (राईट ऑफ) करावी लागतो. परिणामी, रिझर्व्ह बँकेला पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदीच्या समूह कंपन्यांसाठी जारी केलेल्या एलओयूमधून संपूर्ण $2 अब्जांची, नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) (कार्य न करणारी मालमत्ता) म्हणून नोद करावी लागली. एनपीए म्हणजे मुद्दलाची परतफेड होत नाही आणि कर्जदार घेतलेल्या कर्जावर व्याजही देत नाहीत.

मालमत्ता

जून २०२०मध्ये अमंलबजावणी संचलनालयाने हाँगकाँगमधून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपन्यांचे १,३५० कोटी रुपयांचे २,३०० किलोहून पॉलिश केलेले हिरे आणि मोती परत आणले. मात्र प्रयोगशाळेतील तपासणीत बहुतेक हिरे बनावट असल्याचे आढळून आले. याशिवाय गुन्हा दाखल झाल्यानंतर, ईडीने चोक्सीचे प्लॅट्स आणि गोदाम अशी १२५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. चोक्सीच्या सर्व मालमत्ता आणि गुंतवणुकींसह त्याच्या मालमत्तेचे खरे मूल्य आज सुमारे २,५६६ कोटी रुपये आहे असे म्हटले जाते. यात अंधेरीतील सीप्झ येथील ऑफीस, सांताक्रूझ येथील खेनी टॉवर्समधील ७ फ्लॅट्स, दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील गोकुळ अपार्टमेंटमधील तीन माळे, बीकेसीमधील भारत डायमंड बोर्समध्ये एक गाळा आणि डायमंड पार्क, सूरतमध्ये ४ ऑफिसेस यांचा समावेश आहे.

कॅनरा बँक घोटाळा

चेकसीवर पीएनबीचे कर्ज बुडविण्याबरोबर बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बॅंक यांच्या संयुक्तसंघाचे ५५.२७ कोटी रुपये बुडविल्याचाही आरोप आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रने (३० कोटी) आणि कॅनरा बॅंकेने (२५ कोटी) चोक्सीच्या “बेझेल ज्वेलरी” या दागिने तयार करणाऱ्या कंपनीसाठी कर्ज म्हणून दिले होते. परंतु कर्जाची परतफेड झाली नाही. आता अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी सीबीआयने कोर्टात धाव घेतली आहे.

प्रत्यार्पण ही सामान्यतः लांब कायदेशीर प्रक्रिया असते. युरोपमध्ये हे विशेषतः खरे आहे. नीरव मोदी आणि किंगफिशर एअरलाइन्सचे माजी मालक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचा युकेसोबतचा अनुभव फारसा चांगला नाही. मल्ल्या २०१६मध्ये भारत सोडून गेला आहे. हा अनुभव लक्षात घेता चोक्सी भारतात लवकर येण्याची शक्यता कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

बाळासाहेबांच्या हयातीत झाले नाही ते उद्धव-राजचे मनोमीलन आता होणार?

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, दोन्ही नेत्यांना भूतकाळ विसरुन, समान धोरण आखून आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच मार्गक्रमण करावं लागेल. कधी मोदींना पाठिंबा, कधी विरोध, पुन्हा मोदींना बिनशर्त पाठिंबा, असे मुद्दे...

भारतावर काय होणार परिणाम सीरियातल्या सत्तापरिवर्तनाचा?

मध्य पूर्वेतील सीरियात क्रांती होऊन असद परिवाराची पाच दशकांहून अधिक काळ सुरु असलेली  राजवट मोडीत निघाली. राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर “हयात तहरीर अल शाम”चा अध्यक्ष आणि बंडखोरांचा नेता अबू मोहम्मद अल जोलानी याच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता...

वैद्यकीय उपकरणांच्या देशांतर्गत निर्मितीसाठी नवी योजना

वैद्यकीय उपकरणांसाठी भारत इतर देशांवर अवलंबून असतानाच परकीय आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशाला वैद्यकीय उपकरण निर्मितीच्या केंद्रात रूपांतरित करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांची योजना नुकतीच जाहीर केली आहे. यामुळे स्थानिक उत्पादनाला चालना मिळून जागतिक मेडटेक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढू शकते. सध्या...
Skip to content